आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील-भावाने 5 वर्षांपूर्वी केली एकत्र अात्महत्या; त्याच तणावात धाकट्या मुलानेही घेतला गळफास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पाच वर्षांपूर्वी वडिल आणि मधल्या भावाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सतत त्याच तणावामध्ये वावरणाऱ्या एका अभियांत्रिकीच्या तरुणाने शुक्रवारी आसोदा शिवारातील एका शेतात सकाळी ९ वाजता झाडाला दोरी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दुर्देवाची गोष्ट अशी की, प्रकृती बिघडली म्हणून त्याने डॉक्टरकडे जाण्याची इच्छा गुरुवारी आईजवळ व्यक्त केली होती. त्यानुसार मुलास सकाळी दहा वाजता डॉक्टरकडे नेण्यासाठी त्याची आई शुक्रवारी सकाळी धुळ्याहून निघाली होती परंतु अर्ध्या रस्त्यातच तिला मुलाच्या आत्महत्येची बातमी कळाली. 


संगणक शाखेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या या तरुणाचे नाव प्रदीप समाधान कोळी (वय २७ ) असून तो मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी गावचा मूळचा रहिवासी होता. शहरातील केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. मानसिक स्थिती बिघडल्याने त्याच्यावर उपचारदेखील सुरू होते. प्रदीप याचे वडील समाधान कोळी व मधला भाऊ अमरदीप या दोघांनी सन २०१३ मध्ये स्वत:च्या शेतातील झाडाला दोरी बांधून एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 


या घटनेनंतर कोळी कुटंुबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. वडील व एक भाऊ गेल्यानंतर कुटंुबात आई, मोठा भाऊ भगवान अाणि धाकटा प्रदीप हे तिघेच होते. वडिल आणि भावाच्या आत्महत्येमुळे प्रदीपवर मानसिक आघात झाला होता. त्यानंतर देखील ताे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत हाेता. शेवटच्या वर्षाच्या एका विषयात नापास झाल्यामुळे तो गुरुवारी तो पेपर देण्यासाठी जळगावात आला होता. पेपर झाल्यानंतर त्याने काही मित्र, कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. रात्री ७.१३ मिनिटांनी प्रदीप त्याच्या बहिणीशी मोबाइलवरून बोलला. त्यानंतर त्याने मोबाइल फ्लाइट मोडवर टाकला. तत्पूर्वी त्याला आलेले अनेक कॉल त्याने उचलले नाहीत. शुक्रवारी सकाळी ९ वाजता आसोदा शिवारातील तुषार काळे यांच्या शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास घेेतल्याच्या अवस्थेत प्रदीप आढळून आला. 


घटनास्थळी गर्दी
प्रदीपचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यानंतर शेतमालक तुषार काळे यांच्यासह परिसरातील काही नागरिक शेतात आले. दुपारी ११.३० वाजता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवला. दरम्यान, तरुण मुलाने आत्महत्या केल्याचे वृत्त आसोदा, भादली या गावांमध्ये पसरल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. 


आधार कार्डवरून पटली अाेळख 
शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी येऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. प्रदीपच्या खिशात आढळून आलेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना घटनेबद्दल माहिती दिली. दुपारी ३ वाजता प्रदीपचा भाऊ भगवान जळगावात दाखल झाला. कुटंुबीय जळगावात पोहचल्यानंतर दुपारी प्रदीप याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन कुटंुबिय सायंकाळी धुळ्याकडे रवाना झाले. 

 

सिव्हिलमध्ये प्रदीपचा मृतदेह पाहून अाईने फाेडला हंबरडा 
प्रदीपने गुरुवारी त्यांच्या अाईला फाेन करून प्रकृती खराब असल्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार शुक्रवारी त्याची आई धुळे येथून जळगावला येणार होती. सकाळी १० वाजता जळगावच्या बसस्थानकात भेटल्यानंतर डॉक्टरांकडे जाऊ, असे दोघांमध्ये ठरले होते. ठरल्यानुसार शुक्रवारी आई एसटी बसने जळगावी येण्यास निघाली; पण अर्ध्या रस्त्यात असतानाच तिला प्रदीपने आत्महत्या केल्याचा निरोप मिळाला. यामुळे प्रचंड धक्का बसलेली प्रदीपची आई जळगावात येऊन बसस्थानकातच थांबून होती. दुपारी मोठा मुलगा भगवान जळगावात आल्यानंतर तिने त्याच्यासोबत जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. याठिकाणी प्रदीपचा मृतदेह पाहून तिने हंबरडा फाेडला. या वेळी नातेवाइकांनी त्यांची समजूत काढली. 

बातम्या आणखी आहेत...