आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू झाल्याची बतावणी करून फरार खुनातील आरोपी जेरबंद; वर्धा येथे दुसरे लग्न करुन थाटला संसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एका तरुणाच्या खून प्रकरणात न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झालेला एक अारोपी तब्बल १२ वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. दरम्यान, पॅरोलवर बाहेर अाल्यानंतर फरार झाल्यावर काही दिवसांनी या आरोपीच्या नातेवाइकांनी त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. 


भुसावळ येथील वाल्मीकनगरमधील मूळ रहिवासी व सध्या वर्धा येथे स्टेशन फाइलमध्ये राहणारा जितेंद्र श्रावण जावळे (वय ५१) असे फरार आरोपीचे नाव आहे. जितेंद्र जावळे याने ३१ डिसेंबर १९९३ रोजी साकेगाव येथील आकाश शिवा उपासे याचा चाकूने भोसकून खून केला होता. यात जावळे याच्यासह त्याचा भाऊ रवींद्र श्रावण जावळे, राजेंद्र श्रावण जावळे व विजय देवचंद सोनवाल या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात २००३मध्ये न्यायालयाने जितेंद्र जावळे याला दोषी ठरवून ७ वर्ष कैदेची शिक्षा ठोठावली होती. तर उर्वरित संशयितांना निर्दोष मुक्त केले होते. दरम्यान, शिक्षा ठोठावल्यानंतर जावळे हा नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात होता. सन २००६मध्ये तो १५ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. यानंतर तो पुन्हा कारागृहात परतलाच नाही. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. परंतु, तो सापडला नव्हता. त्यानंतर त्याचा नागपुरात मृत्यू झाल्याची माहिती त्याच्याच कुटुंबीयांसह नातेवाइकांनी पसरवली होती. दरम्यान, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर अनिल इंगळे, अनिल देशमुख व संतोष मायकल या तिघांच्या पथकाने सोमवारी रात्री जावळे याला वर्धा शहरातून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, जावळे याने वर्धा शहरात दुसरे लग्न केले होते. त्याच्या दुसऱ्या पत्नीस तीन मुले अाहेत. 


मृत्यूच्या नोंदीसाठी नागपूरला धुंडाळल्या फायली 
जावळे हा जिवंत असून वर्धा शहरात राहत असल्याची माहिती पाेलिस निरीक्षक कुराडे यांना महिनाभरापूर्वी मिळाली होती. त्यानंतर नातेवाइकांकडे चौकशी केली असता, जावळे याचा नागपूरात मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी नागपूर मनपाच्या दप्तरात जावळेच्या मृत्यूची नोंद आहे काय? याचा शोध घेतला; पण तशी कोणतीच नोंद पाेलिसांना अनेक फायली धुंडाळून मिळाली नव्हती. 

बातम्या आणखी आहेत...