आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अादेशबाबाची कबुली : समतानगर भागातील बालिकेचा अत्याचार करून गळा अावळून खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील समतानगरातील नऊ वर्षीय बालिकेचा अर्धनग्न मृतदेह १२ जून राेजी शेजारील टेकडीवर अाढळला हाेता. पीडित मृत बालिकेचे केसांचे क्लचर याच भागात राहणाऱ्या अानंदा तात्याराव साळुंखे (वय ५६) उर्फ अादेशाबाबा याच्या अंगणात अाढळल्याने पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले हाेते. सायंकाळी अंगणात खेळताना या बालिकेला घरात नेऊन अत्याचार केला. बाेभाटा हाेऊ नये म्हणून तिचा गळा अावळून खून केला. त्यानंतर रात्री ९.३० वाजता तिचा मृतदेह पाेलिस टेकडीवर अाणून टाकला, अशी कबुली या नराधमाने पाेलिसांना तपासात दिली. 


पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन समतानगरातील नऊ वर्षीय बालिकेच्या खून प्रकरणाचा उलगडा केला. उपअधीक्षक सचिन सांगळे, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. जी. रोहम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे उपस्थित होते. मृत बालिका नेहमी आदेशबाबाच्या घराजवळ खेळत असे. घटनेच्या दिवशी १२ जून रोजी सायंकाळी ती तेथेच खेळत होती. त्या दिवशी आदेशबाबा घरात एकटाच होता. तिला खेळताना बघून त्याच्या मनात दृष्ट विचार आला. सायंकाळी सहा वाजेनंतर ती बालिकता बेपत्ता झाली होती. या दरम्यान, आदेशबाबाने त्याच्या स्वत:च्या घरात बालिकेवर अत्याचार केला. बोभाटा होऊ नये म्हणून तिचा गळा आवळून घरातच खून केला. एव्हाना मुलगी बेपत्ता असल्यामुळे आई व नातेवाईक तिचा शोध घेत होते. याची भनक आदेशबाबाला लागली. त्याने घरातच बालिकेचा मृतदेह दडवला. त्यानंतर आजूबाजूला कुणी नसल्याची खात्री करून रात्री उशीरा  साडेनऊ वाजेच्या सुमारास बालिकेचा मृतदेह पोत्यात कोंबून शेजारील टेकडीवर आणून टाकला. त्याने तशी कबूली तपासात दिली. अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

अाराेपीच्या नातलगांची चाैकशी 
आदेशाबाबा वयोवृद्ध असल्याने त्याने हे कृत्य केले असेल काय? त्याची शारीरिक क्षमता लक्षात घेता पोलिसांनी या घटनेचे इतर पदरही तपासले. अागपेटीवर नाव लिहिण्यात आलेल्या करण अहिरे या तरुणाचाही या गुन्ह्यात सहभागाबाबत तपासणी करण्यात आली. झोपडपट्टीचा भाग असल्याने व्यसनाधीन, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा येथे वावर आहे. त्या अनुषंगाने २० ते २५ जणांची चौकशी करण्यात आली. नात्यातील लोकांनाही तपासण्यात आले. शेवटी मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तीचे हे कृत्य असावे, या दृष्टिकोनातूनही तपास करण्यात आला. 


गुन्हा सिद्ध होण्याइतके पुरावे 
घटनेनंतर मुलीच्या आईने आदेशबाबावर संशय व्यक्त केला होता. चौथ्या दिवशी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचे वय पाहता त्याला अटक करणे अवघड होते. घटनेनंतरचे ४८ तास पोलिसांचे असतात. त्याला अटक केली असती तर न्यायालयीन कोठडी मिळाली असती. त्याला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. अटक न करता हे उपचार करण्यात आले. या दरम्यान पुरावे जमा करून पाेलिसांनी २५ जून राेजी त्याला अटक केली. 


वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वाढीव कलम 
तपासणीत आदेशबाबाच्या घरात बिबट्याची कातडी, हरणाची शिंगे आढळून आले. त्याचप्रमाणे सिद्धी, मनोकामना मंत्र व इतर वस्तू आढळून आल्या होत्या. जादुटोणा व नरबळीच्या अनुषंगाने या गुन्ह्याबाबत पत्रकारांनी पोलिस अधीक्षकांना विचारले. या प्रकारातून खून झाल्याचे त्यांनी नाकारले. आदेशबाबाच्या घरात आढळून आलेल्या वन्यप्राण्यांच्या अवशेषाबाबत वाढीव कलम लावण्यात येणार अाहे. 


आदेशबाबा नामसाधर्म्यामुळे संभ्रम 
आदेशबाबाचा जळगावात येण्यापूर्वी २० वर्षे नाशिक जिल्ह्यातील वणीच्या गडावर रहिवास होता. तेथेही पोलिसांच्या पथकाने तेथे जावून कसून चौकशी केली. या गुन्ह्यापूर्वी त्याच्यावर गुन्हे दाखल नाहीत. जळगाव जिल्ह्यातील बोदवड, मुक्ताईनगर येथेही एक आदेशबाबा आहे. प्रारंभी या गुन्ह्यात नातेवाइकांनी आदेशबाबावर संशय व्यक्त केला. त्या वेळी पोलिसांना तो आदेशबाबा बोदवड येथील असल्याचे वाटले हाेते. परंतु, कसून तपास केला असता हा आदेशबाबा तो नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले अाहे. 


नागरिकांनी बाळगला संयम 
गुन्हा घडल्यानंतर जनप्रक्षोभ उसळण्याची शक्यता हाेती. पण नागरिकांची संयम दाखवला. आरोपी मिळवून देण्यात नागरिकांनीच सहकार्य केले. पोलिसांचे काम सोपे झाले. मुलीचे वडील अमरावती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तो गुन्हेगार असला तरी एका मुलीचा बाप असल्याने कारागृह प्रशासनाशी संपर्क साधून पेरोल मिळण्यासाठी प्रयत्न केले. पीडितेच्या कुटुंबीयांना मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करीत अाहेत, असे अधीक्षक कराळेंनी सांगितले. 


कुकर्म पत्नीपासून लपवले; भीतीपोटी घर सोडण्याचाही लावला हाेता तगादा 
समतानगरात अत्याचाराची घटना घडली त्यादिवशी (१२ जून) आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा याची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. याचदरम्यान आदेशबाबाने पीडित नऊ वर्षीय चिमुकलीला घरात घेऊन जात तिच्यावर अत्याचार करुन खून केला. त्यानंतर मृतदेह घरात लपवून ठेवला होता. पत्नी घरी आल्यानंतर देखील त्याने हे कुकर्म तिच्यापासून लपवून ठेवले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी आदेशबाबावर संशय घेत त्याची विचारपूस केली. त्यामुळे आदेशबाबाने नागरिकांचा मार वाचवण्यासाठी अाणि केलेले कुकर्म उघडकीस येऊ नये, या भीतीपाेटी पत्नीस घरातून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर तो स्वत: देखील निघून गेला, अशी माहिती आदेशबाबाने पोलिसांना दिली.


घटनाक्रम 
१२ जून : सायंकाळी ६ वाजेपासून मुलगी बेपत्ता. 
१३ जून : सकाळी ७ वाजता घराजवळच असलेल्या एका टेकडीवर अर्धनग्न अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळला. 
१४ जून : सकाळी ७ वाजता संशयित आदेशबाबाला गिरणा नदीपात्रातील नागाई-जोगाई मंदिराजवळून घेतले ताब्यात. 
१५ जून : हाताला दुखापत झाल्यामुळे आदेशबाबास सिव्हिलमध्ये दाखल करून त्याचे डीएनए नमुने घेतले. 
१८ जून : आदेशबाबाच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 
२४ जून : आदेशबाबाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अटक केली. 
२५ जून : न्यायालयात हजर करुन ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळवली. 
२६ जून : आदेशबाबाने गुन्ह्याची कबुली दिली. 


२५ रोजी रात्रीच गुन्ह्याचे प्रात्यक्षिक 
आदेशबाबा यानेच हा गुन्हा केल्याचे ठोस पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार पोलिसांनी २५ रोजी रात्री आदेशबाबा याच्याकडून गुन्ह्याचे प्रात्यक्षिक करवून घेतले होते. मुलीचा मृतदेह पोत्यात कसा बांधला? काखेत उचलून टेकडीपर्यंत कसा नेला? या गोष्टी त्याच्याकडून जाणून घेतल्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...