आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांच्‍याविरोधात अमळनेर पोलिसांत गुन्‍हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याबाबत व्हायरल झालेल्या कथित क्लिप प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्‍याविरोधात अमळनेर पोलीस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. त्‍यांच्यासह जिल्हा बँक संचालक व राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील, भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष लालचंद सैनानी या तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याबाबत एक क्लिप व्‍हायरल झाली होती. यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी याविषयी तक्रार दिली होती.

 

काय आहे प्रकरण
गांजा विक्री प्रकरणात अटक झालेल्याकडून 5 लाख रूपये प्रोटेक्शन मनी घेतल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. यावर खोटे आरोप करून बदनामी केल्याची तक्रार उदय वाघ यांनी अमळनेर पोलिसात दिली हेाती. त्यावरून भाजपचे कोषाध्यक्ष लालचंद हेमनदास सैनानी यांच्यासह राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांत दिलेल्‍या फिर्यादीनूसार, लालचंद सैनानी यांना पदावरून दूर केल्याने त्यांनी आरोपीशी संगनमत करून ध्वनीफित तयार केली. अनिल भाईदास पाटील यांनी सोशल मीडिया व वृत्तपत्रांच्‍या माध्‍यमातून आपल्‍यावर खोटे आरोप केले. या आरोपामुळे माझी बदनामी झाली, असा आरोप उदय वाघ यांनी केला आहे. ध्वनीफितीतील व्यक्ती हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात चार महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल आहे. माझी व पोलीस अधिकार्‍यांसह पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी कटकारस्थान करून जनतेत संभ्रम निर्माण व्हावा, म्हणून हे गंभीर स्वरूपाचे कृत्य केले गेले आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सखोल तपास करावा. अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे. यावरून अमळनेर पोलिसात आयपीसी ४९९, ५००, १२० ब, ३४ सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...