आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमवि सिनेट मतमाेजणी: जामनेरातील बाेगस मतदानावरून खडाजंगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तर महारष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर गटाच्या १० जागांसाठी खान्देशातील तीन जिल्ह्यांतील ६६ केंद्रांवर रविवारी मतदान झाले. या निवडणुकीची मतमाेजणी गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून विद्यापीठाच्या कर्मचारी भवनात करण्यात अाली. मतमाेजणीसाठी मतपेट्या उघडल्या जात असताना जामनेर केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप करीत फेरमतदान घ्यावे, किंवा महिला मतदारांनी भरून दिलेले हमीपत्र दाखवावे ही मागणी करीत विद्यापीठ विकास आघाडी, विद्यापीठ परिवर्तन मंच व अपक्ष उमेदवारांनी जोरदार आक्षेप घेतला. तर विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांनी ही मागणी अयोग्य असल्याचा युक्तिवाद केला. या आक्षेपांमुळे उमेदवार आक्रमक झाले होते. तसेच मतमाेजणीवेळी तीनही गटात शाब्दिक चकमक, खडाजंगीदेखील झाली. या सर्व गाेंधळामुळे मतमोजणी प्रक्रिया सुमारे दीड तास थांबली होती.

 

बोगस मतदान करून लोकशाहीवर घाला : विकास आघाडी, परिवर्तन मंचाचा अाराेप
जामनेरला एकाच केंद्रावर सर्वाधिक मतदान होणे ही संशयास्पद बाब आहे. 'तथाकथित घोषणापत्रावर' मतदान करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या केंद्रावर निःपक्ष प्रक्रिया झाल्याचे दिसून येत नाही. बोगस मतदान करून लोकशाहीवर घाला घालण्याचे काम झाले आहे. त्यामुळे सर्व हमीपत्र तपासले पाहिजे, निवडणूक प्रक्रिया पुन्हा घ्यावी, असे मत विद्यापीठ विकास आघाडी व परिवर्तन मंचतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
मतमाेजणीवेळी निवडणूक अधिकारी यांना जाब विचारतांना उमेदवार विष्णू भंगाळे, प्रीतेश ठाकूर, सत्यजित पाटील, अॅड. जमील देशपांडे, अॅड. अंकुश कटारे व इतर.

 

हरकत घेण्याची वेळ नाही :विद्यापीठ विकास मंच
मतदान प्रक्रियेवर संशय होता तर त्याचवेळी हरकत घेतली पाहिजे होती. मतदान झाल्यानंतर त्यावर हरकत घेणे म्हणजे मतदारांचा अपमान असल्याचे मत ठाकूर यांनी व्यक्त केले. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी योग्य त्या पद्धतीचा सर्वानुमते अवलंब करावा लागतो. निवडणूक निर्णय अधिकारी याचा निर्णय घेतात. नावात बदल झालेल्या महिला मतदारांनी स्वत: हमीपत्र भरून देत मतदान केले आहे. ही योग्य पद्धत असल्यामुळे त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे. असे विकास मंचच्या सदस्यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...