आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : मंत्री महाजनांची 'दादागिरी'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागांतील ७५ नगरसेवकपदाच्या जागांसाठी १ आॅगस्टला निवडणूक होत आहे. राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर जळगाव ही राज्यातील पहिलीच महापालिका असेल जिथे एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. यापूर्वी एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले जात होते. त्यामुळे आता प्रत्येक प्रभाग हा २० ते २५ हजार मतदार संख्येचा असणार आहे. साहजिकच प्रत्येक उमेदवाराला देखील या सर्वच मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. जळगाव महापालिकेची निवडणूक प्रक्रिया ही राज्यभरातील अन्य महापालिकांसाठी एक अनुभव ठरणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम टप्पा सुरू असताना निवडून येणाऱ्या उमेदवारांची आयात‌ करण्याचा फाॅर्म्युला भाजपने येथेही अवलंबला आहे. त्यामुळे शहरात राजकीय वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे. जळगाव महापालिकेवर सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची सत्ता होती. राष्ट्रवादी आणि मनसेनेदेखील सभापती, महापौरपदासारखी पदे भोगून सत्तेची चव घेतली आहे. भाजप हा मात्र एकमेव महापालिकेतील विरोधी पक्ष होता. 


केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या प्रभावाचा लाभ उठवत जळगाव महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने निवडणुकीआधीच फिफ्टी प्लसची आखणी केली होती. कोणत्याही स्थितीत जळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचाच, असा मानस शहराचे आमदार सुरेश भोळे यांचा होता. दरम्यान, सुरेश जैन, मंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि भाजपने खान्देश विकास आघाडीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे भाजप- शिवसेना (खान्देश विकास आघाडी) अशी युती होईल आणि विरोधकांना निवडणुकीपूर्वीच धोबीपछाड देता येईल, असा घाट घातला होता. मंत्री महाजन आणि सुरेश जैन हे युतीसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र आमदार भोळे आणि एकनाथ खडसे हे युतीला विरोध करणारे सूर आवळत होते. त्यामुळे युतीचा बँड वाजणार हे कळून चुकले होते. 


भाजपकडे सद्य:स्थितीत केवळ १५ नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांची ताकद महापालिकेत तशी कमीच होती. या संपूर्ण परिस्थितीची जाणीव गिरीश महाजन यांनादेखील होती. म्हणूनच त्यांनी युतीसाठी होकार दिला होता. तथापि, शेवटच्या टप्प्यात महाजन यांनी मनसेतून शिवसेनेत म्हणजे खान्देश विकास आघाडीत गेलेले महापौर ललित कोल्हेे अाणि राष्ट्रवादी, खाविअासह अन्य १६ नगरसेवकांना भाजपत प्रवेश देऊन पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या या कृतीमुळे सुरेश जैन आणि त्यांचे समर्थक काहीसे नाराज असले तरी त्यांनी सर्वच जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी तरी युतीची शक्यता मावळली आहे. 


जळगाव महापालिका निवडणुकीची भाजपची सूत्रे एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांच्याकडे राहतील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते; पण खडसेंनी घेतलेली बघ्याची भूमिका पाहता निवडणुकीची सूत्रे मंत्री महाजनांकडेच आली आहेत. युतीची भाषा करणाऱ्या महाजनांच्या गळाला निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार लागताच, त्यांचा उत्साह वाढला आणि जळगावातील त्यांचे संपर्क कार्यालय हे उमेदवारांची आयात करणारे केंद्र बनले. 


खडसे मंत्रिमंडळातून बाहेर पडले आणि चौकशांचा ससेमिरा मागे लागल्यामुळे अापसूक महाजनांचा पक्षात आणि जिल्ह्यात भाव वधारला आहे. पक्षाने त्यांच्यावर पालघर लोकसभेची पोटनिवडणूक, अण्णा हजारेंचे नवी दिल्लीतील आंदोलन, आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा, या सर्वच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई करण्यासाठी पाठवले होते. यात महाजनांची सरशी झाली. त्यामुळे त्यांच्याकडेच जळगाव महापालिकेच्या निवडणुकीची सूत्रे येणार हे उघड होते. नुकताच त्यांना त्यांच्याच मतदारसंघातील जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीतील अनुभव पाठीशी आहे. तेथेही भाजप विरोधी पक्षात असताना त्यांनी केवळ एकहाती सत्ता नाही, तर विरोधकही शिल्लक न ठेवता निवडणूक जिंकली. जामनेरचाच फाॅर्म्युला ते जळगावात राबवतील, असे दिसत आहे. 

 

भाजपचा महापौर होण्यासाठी ते साम, दंड, भेद वापरून निवडणूक जिंकण्याच्या तयारीत आहेत. जळगाव शहरात एकेकाळी जैन यांची राजकीय 'दादागिरी' होती. पण, राजकारणातील चित्र सारखे बदलत असते. कधीकाळी जैन होते, नंतर खडसे आणि आता मंत्री महाजन यांची जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात 'दादागिरी' वाढली आहे. तथापि, महाजन यांनी काही नगरसेवक फोडून पक्षाची आणि आपली ताकद विरोधकांना दाखवून दिली असली तरी जळगाव महापालिकेची निवडणूक जामनेरएवढी सोपी नाही, हे मात्र तेवढेच खरे आहे. 

- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव 

बातम्या आणखी आहेत...