आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : वाढती सरासरी, घटती चिंता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी पाऊस सरासरी गाठणार. त्यामुळे बळीराजा आणि सरकारला फार चिंता करण्याची गरज नाही, असा हवामानाचा अंदाज होता. अंदाजाप्रमाणे पावसाने जून महिन्यात सर्वदूर हजेरी लावली. पाऊस वेळेवर आल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणीही केली. जेथे पाऊसच आला नाही, तेथील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र, ज्यांनी पेरणी केली, त्यांना पुन्हा पाऊस वेळेवर येईल की नाही, याची चिंता लागून होती. पाऊस लांबल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली. वेळेवर हजेरी लावून गेलेला पाऊस महाराष्ट्रात फिरकलाच नाही. गेल्या अनेक दिवसांपासून तो मुंबई आणि कोकणात दबा धरून बसला होता. मुंबईची तंुबापुरी झाली आणि कोकण जलमय. उर्वरित महाराष्ट्र मात्र आज येणार, उद्या येणार म्हणून आशा लावून बसला होता. आठवडाभरात पाऊस आलाच नाही तर दुबार पेरणीचे संकट अटळ आहे, याची जाणीव बळीराजाला झाली होती. महागडे बियाणे आणि खते तो शेतात टाकून बसला होता. राज्यात जवळपास ८० टक्के पेरा पहिल्याच पावसाच्या भरवशावर करण्यात आला होता. बातम्यांमधून दिसणारा मुंबईचा पाऊस पाहताना त्याची सारखी तगमग सुरू होती. मनोमन हा पाऊस आपल्या गावात आणि शेतात धरून आणता आला असता तर किती बरे झाले असते? असेही त्याला सहज वाटून गेले असेल. अखेर शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे. ती कधीही शाश्वत होऊ शकत नाही, याची जाणीव निसर्गानेच पुन्हा एकदा करून दिली. तथापि, नैर्ऋत्य मोसमी पावसाने मुंबईला सोडले आणि महाराष्ट्राची वाट धरली, हळूहळू महाराष्ट्र व्यापला. 


प्रतीक्षा लागून असलेल्या मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतही हजेरी लावली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्यामुळे आणखी पुढील आठवड्यात पाऊस राज्यात सर्वदूर राहील, असा हवामानाचा अंदाज आहे. ते जर खरे ठरले तर पिकांची वाढ होईल, भरघोस उत्पन्नाची हमीही देता येऊ शकते. त्यामुळे सध्या सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी प्रथमच पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर सोशल मीडियातून टीकाही झाली की, पावसाचा पत्ता नाही आणि चालले नागपूर अधिवेशनाला. दरम्यान, नागपूर अधिवेशन काळात एवढा पाऊस झाला की, धोका नको म्हणून विधिमंडळाचे कामकाज दोन दिवस बंद ठेवावे लागले. भले कामकाज दोन दिवस बंद झाले, पण पावसाने टीकाकारांना उत्तर दिले ते चांगलेच झाले, असे फडणवीसांना निश्चितच वाटले असणार. कारण गतवर्षीचे कर्जमाफीचे गुऱ्हाळ अजून संपलेले नाही, त्यातच दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैसे द्या, पंचनामे करा, या मागणीने जोर धरला असता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसाने राज्यभरात सरासरी गाठली आहे. गेल्या वर्षापेक्षा अधिकचा पाऊस आज अखेर राज्यभरात झालेला आहे. या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील सर्वच मोठ्या धरणांत जलसाठा वाढला आहे. 


अनेक धरणांमधून विसर्ग सोडावा लागला आहे. त्यामुळे नदी- नालेही अोसंडून वाहत आहेत. गेल्या काही वर्षांत प्रथमच राज्यभर अशी परिस्थिती एकाच वेळेस पाहायला मिळाली आहे. राज्यातील ३७५ तालुक्यांपैकी ५० टक्के तालुके असे आहेत की, जेथे पावसाने ११० टक्क्यांपेक्षा अधिकची सरासरी गाठली आहे. अन्य तालुक्यांमध्येही ७५ टक्क्यांपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. राज्यात खरिपाचे क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर आहे. या सर्वच क्षेत्रांत पेरा झाला असून पिकांची वाढही आता या पावसाने चांगली होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सक्रिय झालेल्या पावसाने पिके तर वाचवली आहेतच; पण धरणांमध्येही साठा चांगला झाला आहे. नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडून तेथील धरणे अोसंडून वाहिली तरच मराठवाड्यातील जायकवाडी भरते. तसेच तापीवरील हतनूर धरण भरून त्याचे दरवाजे उघडले तरच तापीवरील महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील धरणे भरतात. यातूनच सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. त्यामुळे यावर्षी निसर्गाने अनुकूल वातावरण केले. हवामान खात्यालाही पूर्णत: खोटे ठरवले नाही. याचा परिणाम म्हणून पावसाची सरासरी वाढली आणि बळीराजासह सर्वांची चिंता कमी झाली. 
- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...