आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या लग्नासाठी सुटीवर आलेल्या अभियंत्याचा उष्माघाताने मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मित्राच्या लग्नासाठी मूळगावी साकरी (ता. भुसावळ) येथे दोन दिवसांच्या सुटीवर आलेल्या, पुणे येथील खासगी कंपनीतील आयटी इंजिनिअरचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीदेखील उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. साकरी येथील रहिवासी तथा भोरगाव लेवा पंचायतीचे सदस्य शरद भोजराज फेगडे यांचा मुलगा अभय फेगडे (वय २५) हा पुणे येथे आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. मित्राच्या लग्नासाठी दोन दिवसांची सुटी काढून तो शुक्रवारी सकाळी साकरीत आला होता. भुसावळातील लग्न सोहळा आटोपून साकरी येथे घरी परतल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. 


शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक उलटी झाल्याने त्याला उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आयटी इंजिनिअर असलेला अभय पुणे येथे वातानुकूलीत कार्यालयात काम करीत असल्याने त्याला गावाकडील उच्च तापमान सहन झाले नसावे, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. 


शवविच्छेदनानंतर शनिवारी(दि. ५) सकाळी साकरीत त्याच्यावर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अभयच्या अकाली निधनामुळे साकरी गावावर शोककळा पसरली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...