आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: गुजरातकडे जाणाऱ्या दोन लाख लिटर दुधाचे संकलन रखडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - दुधाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या अांदाेलनाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला अाहे. जिल्ह्यातून गुजरातच्या वसुधरा डेअरीतर्फे एक लाख लिटर दुधाचे संकलन दरराेज केले जाते. संपामुळे डेअरीतून दुधाचे टँकरच रवाना झाले नाही. वसुधरा दूध डेअरीच्या व्यवस्थापनाने दोन दिवसांपासून दूध संकलन थांबवलेले आहे.

 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आंदोलनात सक्रिय सहभाग नाही. तरी दूध संकलनावर परिणाम झालेला आहे. गुजरातच्या वसुधरा दूध डेअरीतर्फे जिल्ह्यातून सर्वाधिक दूध संकलन होते. हे दूध मुंबईकडे टँकरद्वारे पाठवण्यात येते.


मात्र संपाच्या कालावधीत दुधाचे टँकर मुंबईपर्यंत पोहाेचणे अवघड झाले आहे. यामुळे डेअरी व्यवस्थापनाने दोन दिवसांपासून गावपातळीवर असलेल्या दूध संकलन केंद्राकडून दूध घेणे बंद केले आहे. याचा प्रत्यक्ष फटका शेतकऱ्यांनाच बसत अाहे. वसुधरा दूध डेअरीकडे प्रतिदिवस सकाळ-सायंकाळ मिळून एक लाख लिटर दुधाचे संकलन होते. दोन दिवसांपासून तब्बल दोन लाख लिटर दूध संकलन झालेले नाही. दोन दिवसांत एकही टँकर मुंबईकडे रवाना झालेला नाही. दरम्यान स्थानिक दूध डेअरी तसेच किरकोळ विक्रेते व खरेदीदारांवर मात्र संपाचा परिणाम झालेला नाही. जिल्हा दूध उत्पादक संघ, तालुका दूध उत्पादक संघ, अहिराणी दूध उत्पादक संघ, गोकूळ दुग्धालय, महात्माजी दुग्धालय, महालक्ष्मी दुग्धालय या दुग्धालयांचे नियमित संकलन मात्र सुरू आहे.

 

दुधाचे करावे काय?
दोन दिवसांपासून दूध संकलन बंद आहे. परिणामी दररोजच्या दुधाचे करावे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. दूध नाशवंत पदार्थ आहे. शेतकऱ्यांच्या घरात दुधावर प्रक्रिया करण्याचे साधन सुविधा उपलब्ध नाहीत. शिवाय ग्रामीण भागात संकलन केंद्र चालक नुकसानीची झळ सहन करण्यासाठी सक्षम नसल्यामुळे शेतकऱ्यांचा पेच वाढलेला आहे. जर लवकरच तोडगा निघाला नाही तर शेतकरी तोंडघशी पडणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...