आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यास टँकरने चिरडले; नागरिकांची फोटाेसाठी घाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भुसावळ येथून मित्राच्या वाढदिवसाचा कार्यक्रम अाटाेपून जळगावात परतणाऱ्या शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भरधाव टँकरने मागून जाेरदार धडक दिली. त्यामुळे विद्यार्थी दुचाकीसह रस्त्यावर फेकला गेला. या वेळी त्यांच्या डोक्यावरून टँकरचे एक चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून चालकाने टँकर घटनास्थळी साेडून पळ काढला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता भुसावळ-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर घडली. नेहल गायधनी असे मृत विद्यार्थ्यांचे नाव अाहे. दरम्यान, अपघातानंतर महामार्गावर प्रचंड गर्दी झाली हाेती. मदत करण्याएेवजी बघ्यांची भूमिका घेऊन मोबाइलमध्ये फोटो काढणाऱ्यांमुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणी आल्या.

 

नेहल श्रीराम गायधनी (वय २१, मूळ रा.अमरावती) हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत हाेता. ताे सुदर्शन वानखेडे या मित्रासोबत विद्युत कॉलनी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. बुधवारी दुपारी १२.३० वाजता तो दुचाकीने (क्रमांक एमएच-२७, एके, ३८५६) भुसावळ येथे मित्राच्या वाढदिवसासाठी गेला होता.

 

सायंकाळी ५ वाजता तो भुसावळातून जळगावात परतीच्या प्रवासाला लागला. महामार्गावरील डॉ.पाटील रुग्णालयासमोर त्याच्या दुचाकीला मागून येणाऱ्या टँकरने (क्रमांक एमएच-०४, सीपी, ३३६५) जोरदार धडक दिली. यात तो दुचाकीसह रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यावरून भरधाव टँकरचे एक चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर प्रचंड गर्दी झाल्याने काहीवेळ वाहतूक ठप्प झाली हाेती. सायंकाळी ७ वाजता नेहलचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात अाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिसांनी ट्रक जप्त केला आहे.


पाेलिसांनी ट्रकचालकाचा केला पाठलाग : अपघातानंतर टँकरचालकाने जमावाला घाबरून टँकर घटनास्थळी साेडून पळ काढला. काही नागरिकांनी त्याला पकडण्यासाठी पाठलाग केला; परंतु ताे शेतांचा आडोसा घेत पसार झाला आहे. नशिराबाद पोलिसांनी अपघातग्रस्त टँकर जप्त केले अाहे.

 

परिसर मुलाखतीची तयारी करीत होता
नेहल हा अभ्यासात हुशार होता. तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी त्याची धडपड सुरू होती. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला 'सी डॅक' या अभ्यासक्रमाचे शिक्षण घ्यायचे होते. यासाठी तो पुण्यातील खासगी क्लासमध्ये प्रवेश घेणार होता. त्यानुसार ताे पुण्यातील क्लास चालकांच्या संपर्कात हाेता, असे त्याचा रुममेट सुदर्शन याने 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. तसेच बुधवारीच त्याने परिसर मुलाखतीसाठी अॅप्टिट्यूट टेस्टही दिली होती. बुधवारी दुपारी १२ वाजता नेहल याने सुदर्शनसह जेवण घेतले. जेवण झाल्यानंतर नेहल गायधनी दुचाकीने भुसावळकडे जाण्यास निघाला होता.

 

प्राध्यापक, मित्रांना अश्रू अनावर
अमरावती शहरातून शिक्षण घेण्यासाठी जळगावात आलेला नेहल मित्र, शिक्षकांचा लाडका होता. त्याच्या अपघाताची माहिती मिळताच अनेक मित्रांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. काही प्राध्यापकदेखील रुग्णालयात दाखल झाले होते. नेहलच्या मृत्यूमुळे अनेकांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे रुग्णालयात शोकाकूल वातावरण निर्माण झाले होते. नेहल सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण काढून त्याचे मित्र रडत होते.


 ५ दिवसात दुसरा अपघात; चौपदरीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
जळगाव-भुसावळ हा महामार्ग अत्यंत धोकदायक झाला आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनलेला अाहे. १६ फेब्रुवारी राेजी एमअायडीसीत सकाळी ५ वाजता रात्रीपाळीची ड्यूटी संपल्यानंतर घरी जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीची व जळगाव स्टेशनवरून नातेवाइकास कुसुंबा येथे ट्रिपल सीट घेऊन जाणाऱ्या एका तरुणाच्या दुचाकीची समाेरासमाेर जाेरदार धडक झाली. या भीषण अपघातात ड्यूटीवरून घरी जाणारा मूजे महाविद्यालयातील बीएसस्सी द्वितीय वर्षाला शिकणारा लैलेश अविनाश चौधरी हा जागीच ठार झाला हाेता. त्यामुळे या महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून असून या अपघातानंतर हा मुद्या ऐरणीवर आला आहे.

 

नेहलच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील अमरावती न्यायालयात कर्मचारी असून त्याची प्रकृती खराब आहे. नुकतेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर शस्त्रक्रियादेखील झाली आहे. त्यामुळे घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याची आई व काका जळगावात येण्यासाठी निघाले होते.

 

फाेटाे काढणाऱ्यांना खडसावले
अपघातानंतर डॉ.पाटील रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या वेळी अनेकजण मोबाइलमध्ये फोटो काढत हाेते. त्यांच्या गर्दीमुळे नेहलचा मृतदेह टँकरच्या खालून काढण्यास अनेक अडचणी येत हाेत्या. त्यामुळे संतापलेले रुग्णवाहिकाचालक अतुल चौधरी यांनी मोबाइलवर फाेटाे काढणाऱ्यांना खडसावले. त्यामुळे ते पटापट बाजूला झाले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात अाला.

 

बातम्या आणखी आहेत...