आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एरंडोल हत्येचे गूढ उकलले: मित्राच्या ११ वर्षीय मुलीवर अत्याचार करताना सापडला हाेता ज्ञानसिंग पावरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रात्र घालवण्यासाठी मित्राच्या घरात आसरा मिळवल्यानंतर त्याच्याच ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. विरोध केल्यानंतर या नराधमाने मित्राच्या कुटंुबाला संपवण्यासाठी कुऱ्हाडीने वार केले. यात मित्राचा जीव गेला व तिघे गंभीर जखमी झाले. अंगावर काटा आणणारे हे असे सत्य उत्राण (ता. एरंडोल) येथील घटनेचे आहे. ४ जुलै रोजी रात्री उत्राण येथील एका शेतात हा थरार घडला होता. 


मध्य प्रदेशातील इंदवी येथील एक पावरा कुटुंब दोन वर्षांपूर्वी उत्राण येथील राजेंद्र भागवत पाटील यांच्या निंबूच्या मळ्यात मजुरी करण्यासाठी अाले होते. तर या घटनेतील नराधम ज्ञानिसंग पालसिंग पावरा (वय ३८, रा. चिखली, वलवाडी, मध्य प्रदेश) हा देखील त्यांच्याच समाजाचा होता. तो उत्राण गावाजवळ असलेल्या भातखंडे (ता. भडगाव) येथील ज्ञानदेव महाजन यांच्या शेतात कामास होता. दारूच्या व्यसनापायी ज्ञानसिंग याची नोकरी गेली होती. त्यामुळेच ४ जुलै २०१८ रोजी तो उत्राण येथील मित्राकडे राहण्यासाठी आला होता. दरम्यान, रात्री दोन्ही मित्रांनी दारू प्यायल्यानंतर ज्ञानसिंग याने थेट मित्राच्या ११ वर्षीय मुलीवरच वाईट नजर टाकली. रात्री त्या मुलीवर अत्याचार केले. त्यामुळे मित्राचे कुटंुबीय जागे झाले. त्यांनी प्रचंड संतापात ज्ञानसिंग याला विरोध केला. याचा राग आल्यामुळे ज्ञानसिंगने घरात असलेली कुऱ्हाड घेत मित्राच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. 


अर्धांगवायुमुळे मित्राचा डावा हात काम करत नव्हता. ज्ञानसिंगने मित्राच्या डाव्या डोळ्यावर केलेल्या कुऱ्हाडीच्या वारने मित्र जागीच गतप्राण झाला. त्यानंतर ज्ञानसिंगने मित्राची पत्नी, ११ वर्षांची मुलगी व ७ वर्षाच्या मुलीकडे मोर्चा वळवला. त्यांच्यावर ही कुऱ्हाडीने वार करण्याच्या तयारीत तो होता. तत्पूर्वी कुऱ्हाडीचा दांडा तुटल्यामुळे लोखंडी पाते दूर फेकले गेले. त्यामुळेच तिघांचे प्राण वाचले. या घटनेनंतर बिथरलेला ज्ञानसिंगने तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वेरुळावर जावून धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. दारूच्या व्यसनापायी पत्नी, नोकरी गमावलेल्या ज्ञानसिंग याने एका कोवळ्या मुलीवर अत्याचार केले. कुऱ्हाडीने वार करुन मित्राचा खून केला. मित्राच्या पत्नीसह दोन मुलांना बेदम मारहाण केली. यानंतर स्वत: आत्महत्या केली. व्यसनामुळे ज्ञानसिंगने स्वत:सह मित्राचे कुटंुबही उद‌्ध्वस्त करुन टाकले. पतीच्या मृत्यूमुळे अाता संपूर्ण जबाबदारी पत्नीवर आली आहे. 


तिघांची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांनी घेतले जबाब 
४ जुलैच्या मध्यरात्री हा थरार घडला होता. घटनेत ३८ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला. तर शेतमजुराची पत्नी, ११ वर्षीय मुलगी, ७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले होते. ५ जुलै रोजी दिवसभर जिल्हा सामान्य रुग्णालयात तिघांवर उपचार करण्यात आले. ११वर्षीय मुलीवर अत्याचार झाला असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले होते. त्यानंतर त्याच दिवशी रात्री तिघांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. आठ-दहा दिवसांनंतर तिघांची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांनी त्यांचे जबाब घेतले. यात ज्ञानसिंग याने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यास विरोध केल्यानंतर त्याने कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा जबाब जखमींनी दिला आहे. याप्रकरणी कासोदा पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीने आत्महत्या केल्यामुळे या गुन्ह्याचा तपास आता संपला आहे. परंतु, या घटनेत मित्रास मदत करण्याच्या नादात एक कुटंुब पूर्णपणे उद‌्ध्वस्त झाले. 


जखमींचे जबाब घेतले 
उत्राण येथील घटनेत जखमी असलेले तिघे शुद्धीवर आल्यानंतर त्यांचे जबाब घेतले आहे. ज्ञानसिंग पावरा याने मुलीवर अत्याचार केला होता. तसेच त्यानेच कुऱ्हाडीने वार करून एकाचा जीव घेतला तर तिघांना जखमी केले. अशी माहिती जखमींनी दिली आहे. - प्रशांत बच्छाव, अपर पोलिस अधीक्षक 

बातम्या आणखी आहेत...