आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे हत्‍याकांड: घटनेस पोलिसांचा हलगर्जीपणाही कारणीभूत, वाचा प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेली मा‍हिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर- राईनपाडा येथे जमावाने केलेल्‍या 5 जणांच्‍या निर्घृण हत्‍येमध्‍ये पोलीसही काही प्रमाणात जबाबदार असल्‍याचे समोर येत आहे. माहिती देऊनही पोलीस घटनास्‍थळी तब्‍बल तीन ते साडेतीन तास उशीरा पोहोचले व 2 ते 3 हजारांचा जमाव असल्‍याचे सांगूनही पोलिसांनी फौजफाटा आणला नाही, अशी माहिती स्‍वत: या घटनेचे प्रत्‍यक्षदर्शी सखाराम पवार व विश्‍वास गांगुर्डे यांनी दिव्‍य मराठीला बोलताना दिली. त्‍यामुळे 5 भिक्षुकांच्‍या निर्घृण हत्‍येला पोलिसांचा हलगर्जीपणा भोवल्‍याचे दिसत आहे. 

 

नेमका कसा घडला प्रकार, वाचा प्रत्‍यक्षदर्शीने दिलेली माहिती
सखाराम यांनी सांगितले की, 'त्‍यादिवशी मला ग्रामपंचायतीसमोर गर्दी व गोंधळ चालू असलेला दिसला. त्‍यामुळे मी धावत तिकडे गेलो असता काही जणांना हाणामारी होत असल्‍याचे मी पाहिले. मी मारण्‍याचे कारण विचारल्‍यावर त्‍यांतील काहींनी सांगितले की, 'ही चोर आहेत. माणसाला मारतात. किडण्‍या काढतात. ते आपल्‍या माणसांना मारण्‍याचा प्रयत्‍न करताय. म्‍हणून आम्‍ही त्‍यांना मारून टाकतोय.' हे ऐकल्‍यावर मी त्‍यांना मारू नका अस सांगितल. आपण पोलिसांना बोलावू. त्‍यांच्‍यासमोर यांची चौकशी करू, अशी विनंती त्‍यांना केली. मात्र त्‍यांनी ऐकल नाही. उलट मलाच बाजूला ढकलल. जमावाला थांबवल नाही तर ते 5 जणांना मारून टाकतील या भीतीमुळे मी माझ्या सोबत असणा-या पंचायत सदस्‍य विश्‍वास गांगुर्डे यांना तातडीने ग्रामपंचायतीचे कुलूप उघडण्‍यास सांगितले व सुरक्षिततेसाठी 5 जणांना खोलीच्‍या आत ठेवून बाहेरून कुलुप लावल. तसेच पोलिसांनाही या घटनेबाबत फोन करून माहिती दिली व हेदेखील सांगितले की, 'जमाव 2 ते 3 हजाराच्‍या संख्‍येने उपस्थित आहे. त्‍यामुळे मोठा फौजफाटा घेऊन या.' हे ऐकूण पोलिसांनी आपण येतोय तोपर्यंत जमावाला धरून ठेवा असे सांगितले.


नंतर जे घडायला नको होते ते घडले
पुढे सखाराम यांनी सांगितले की, 'मी माहिती दिल्‍यानंतर तब्‍बल तीन ते साडेतीन तासांनी पोलिस घटनास्‍थळी आले. ते ही संख्‍येने केवळ 5 ते 6. आल्‍यानंतर त्‍यांनी ग्रामपंचायतीचे कुलुप उघडले. तेव्‍हा आतील पाचही जण जिवंत होते. मात्र पोलीस आत शिरताच जमावही आत शिरला. व त्‍याने सळयाने, लाकडाने पुन्‍हा मारण्‍यास सुरूवात केली. पोलिसांनी सुरूवातीला अडविण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र जमावाने त्‍यांनाही लोखंडाची गज, सळया दाखवत खोलीबाहेर हाकलले व दरवाजा लावत पुन्‍हा मारहाण सुरू केली. नंतर तर पोलिसांनाही जमावाने मारण्‍यास सुरूवात केली. त्‍यामुळे पोलीस चौकीकडे पळून गेले. त्‍यानंतर जमावाने त्‍या 5 जणांची क्रूरपणे हत्‍या केली.'  

 

 

बातम्या आणखी आहेत...