आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकास मिरगीचा झटका, भरधाव ट्रक दोन रिक्षांवर धडकला, शिक्षिकेचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीचा मृतदेह पाहताच दु:ख अनावर झालेले नितिन कोष्‍टी. - Divya Marathi
पत्नीचा मृतदेह पाहताच दु:ख अनावर झालेले नितिन कोष्‍टी.

जळगाव - गजबजलेल्या अजिंठा चौफुलीनजीक रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ शनिवारी दुपारी विचित्र अपघात झाला. महामार्गावरुन भरधाव निघालेल्या ट्रकचालकास मिरगीचा झटका आला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने रस्त्यावरील दोन रिक्षा आणि एका सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात एक शिक्षिका आणि ट्रकचालकास ५ प्रवासी जबर जखमी झाले. विशेष म्हणजे उपचाराकरिता जखमी शिक्षिका जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी पायी निघाली होती.परंतु अचानक काळाने घाला घातला. ग्लानी आल्यामुळे शिक्षिका जमिनीवर कोसळली आणि तिचा उपचारापूर्वीच दुर्देवी अंत झाला.

 

सीमा नितीन कोष्टी (वय ३२, रा.आदर्शनगर) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. तर रिक्षाचालक रामदास शिवाजी घोष (वय ४०, रा.रामेश्वर कॉलनी),दत्तात्रय नारायण घुगे (वय ५२, रा.मेहरूण), अख्तर शेख हुसेन उमर पिंजारी (वय ४१, रा.बॉम्बे बेकरी जवळ) व शेख हमीद शेख बशीर (रा.भुसावळ) व ट्रकचालक राधेश्याम गंगासागर (वय ३५, रा.रतसार बालिया, छत्तीसगड) हे जखमी झाले आहेत. यामध्ये किरकाेळ जखमी झालेल्या सायकलस्वार विद्यार्थ्याचे नाव कळू शकले नाही. मृत सीमा ह्या सुनसगाव (ता.जामनेर) येथील जि.प. शाळेत शिक्षिका होत्या. शनिवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर दुपारी १२ वाजता त्या एसटी बसने अजिंठा चौफुली येथे आल्या. तिथून रिक्षाने इच्छादेवी चौफुलीकडे निघाल्या होत्या. या वेळी ट्रकचालक राधेश्याम याला मिरगीचा झटका आल्यामुळे त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. ट्रकने (सीजी ०४ जेडी ६९५१) समोर धावत असलेल्या दोन रिक्षांना (एमएच १० व्ही ५१४१ व एमएच १९ व्ही ७७२७) जोरदार धडक दिली. भरधाव ट्रक अादळल्यामुळे रिक्षाचालकांसह प्रवासी जखमी झाले. दोन्ही रिक्षा चक्काचूर झाल्या. तर ट्रकदेखील रस्त्याच्या खाली सुमारे २० फूट खोल जाऊन थांबला. सुदैवाने या ठिकाणी मोठी झाडे, भंगारचे सामान असल्यामुळे ट्रक थांबला. अन्यथा समोरील घरांवरही ट्रक धडकण्याची शक्यता होती. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नागरिकांनी जखमींना रिक्षांमधून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. एमआयडीसी पोलिसांत नोंद केली आहे.

 

डोक्यास मार लागल्यामुळे सीमा यांचा मृत्यू : जखमी शिक्षिका सीमा यादेखील रुग्णालयात आल्या. रिक्षातून खाली उतरल्यावर त्या काही अंतर पायी चालत होत्या. नंतर अचानक त्यांना ग्लानी आल्यामुळे त्या कोसळल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला मुका मार लागल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला असावा, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या अपघातात रिक्षाचालक घोष यांच्या डोक्याला व पायाला मार लागला आहे. शिरसोली येथील जि.प. उर्दू शाळेत शिक्षक असलेले शेख अख्तर यांना दुखापत झाली. दरम्यान, मृत शिक्षिकेवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात अाले.

 

मिरगीची व्याधी; परवाना कसा ?
अपघातग्रस्त ट्रकचा चालक हा छत्तीगडचा असून त्याला मिरगीची व्याधी असल्यामुळे त्याला परवाना कसा मिळाला, हाच प्रश्न उपस्थित होत आहे. मिरगीचा झटका हा केव्हाही येऊ शकतो. त्यामुळे त्याचे वाहन चालवणे स्वत: व रस्त्यावरील इतर वाहने,नागरिकांसाठीही धोकादायक ठरते. यासंदर्भात काही नियमावली आहे का, अशी विचारणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांना केली असता ते म्हणाले, ट्रान्सपोर्टच्या संदर्भात वाहन चालवण्याचा परवाना काढताना चालकास वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. यानंतर दर ३ वर्षांनी परवाना नूतनीकरणासही प्रमाणपत्र द्यावे लागते. त्यानंतरच नूतनीकरण होते. शिवाय चालकासही फिटनेस प्रमाणपत्र देणे बंधनकारक अाहे.


दोन तासांनी ट्रक काढला बाहेर
अपघातानंतर एमआयडीसी व वाहतूक पोलिसांनी चक्काचूर झालेल्या दोन रिक्षांना रस्त्याच्या कडेला केले. यानंतर दोन क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या खाली उतरलेला ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यासाठी दोन तास लागले. या वेळी विजेच्या तारांना स्पर्श होऊ नये म्हणून विद्युत प्रवाह खंडीत केला होता. त्यामुळे अत्यंत सावधगिरी बाळगून हा ट्रक बाहेर काढला.

 

ट्रकचालक जिल्हा रुग्णालयात दाखल
मिरगी अाल्यामुळे ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटला होता. अपघातानंतर त्याला नागरिकांनी बाहेर काढले. या वेळी देखील त्याला प्रचंड प्रमाणात झटके येत होते. तशाच स्थितीत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे देखील झटके सुरूच असल्यामुळे त्याला पलंगास बांधून ठेवण्यात आले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...