आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले मार्केटमध्ये दुकानाला अाग; दारुड्यांनी पेटवल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - फुले मार्केटमधील दुसऱ्या मजल्यावरील मयूर टेलर या दुकानास रविवारी पहाटे आग लागली. मद्यपींनी दुकानाच्या बाहेर शेकोटी पेटवली होती. त्यानीच जळालेला कापडाचा एक तुकडा शटरच्या फटीतून दुकानात टाकल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

आदर्शनगरातील रहिवाशी राजेश वल्लभ हिंगू यांचे फुले मार्केटमधील दुसऱ्या माळ्यावर दुकान क्रमांक ४५ मध्ये मयूर टेलर्स नावाने दुकान आहे. शनिवारी रात्री ९ वाजता ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले. त्यानंतर रविवारी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या शेजारचे दुकानदार मार्केटमध्ये आले. मयूर टेलर या दुकानातून धूर बाहेर येत असल्याचे पाहून त्यांनी राजेश हिंगू यांच्याशी व अग्निशमन विभागाशी संपर्क साधला.


मध्यरात्री दुसऱ्या मजल्यावर दररोज भरते मद्यपी, गंजेटींची 'शाळा'
हिंगु यांच्या दुकानाच्या बाहेर रविवारी सकाळी दोन बियरच्या बाटल्या, वेफर्स, डाळीच्या पिशव्या, शेकोटीची राख आढळून आली. नेहमीप्रमाणे मध्यरात्री दुसऱ्या मजल्यावर कुणीही नसल्याची संधी साधून मद्यपींनी येथेच्छ दारू रिचवली असल्याचे हे पुरावे होते. याच मद्यपींनी शेकोटी पेटवून त्यातील एक कापड दुकानात टाकला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. फुले मार्केटमध्ये दररोज रात्री मद्यपी, गंजोटींचा वावर असतो. रात्रभरात वरच्या मजल्यावर दारुच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टीकच्या पिशव्यांचा खच पडलेला असतो. या प्रकारामुळे व्यापारी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. पाेलिसांनी मद्यपींचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली अाहे.


लग्नाच्या ऑर्डरचे ड्रेस जळून खाक
हिंगु यांच्या दुकानात लेडीज ड्रेस शिवण्याचे काम चालते. लग्नसराईमुळे काही दिवसांपासून ड्रेस शिवण्यासाठीच्या अॉर्डरमध्ये वाढ झाली हाेती. शनिवारी रात्री दुकानात ७० ते ८० ड्रेस शिवून तयार होते. तर १०० ड्रेसचे कच्चे मटेरीयल होते. या शिवाय मशिनरी, खुर्च्या, फर्निचर अादी वस्तू खाक झाल्या असल्याची माहिती हिंगू यांनी सांगितले.

 

बंब पोहचण्यास माेठी अडचण
फुले मार्केटमध्ये अत्यंत अरुंद भागात दुकाने थाटण्यात आली आहेत. रविवारी अागीची घटना घडल्यानंतर सकाळी अग्निशामक बंब आत येण्यास बरीच अडचण झाली. या शिवाय आग दुसऱ्या माळ्यावर लागलेली असल्यामुळे पाईपपर्यंत पोहचवण्यातही मोठी मेहनत घ्यावी लागली. आग विझवण्यासाठी व्यापाऱ्यांनी मदत केली.

 

बातम्या आणखी आहेत...