आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश जैन यांचा भाजप-शिवसेना युतीचा प्रस्ताव मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढणार आहे. जळगाव महापालिकेत यापुढे भाजपचाच महापौर होईल, असा विश्वास व्यक्त करून काँग्रेस-राष्ट्रवादी पाठोपाठ जळगाव जिल्हा 'मित्रपक्ष'मुक्त करण्याची घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी भाजप जिल्हा बैठकीत केली. मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची आणि जिल्हा 'मित्रपक्ष'मुक्त करण्याची घोषणा करून माजी मंत्री सुरेश जैन यांनी ठेवलेला भाजप-शिवसेना युतीचा प्रस्ताव सपशेल फेटाळून लावल्याचे संकेत दिले आहेत.

 

भाजप जिल्हा अाणि महानगर आघाडीची बैठक शनिवारी पक्षाच्या 'वसंत स्मृती' कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी बोलताना महाजन यांनी नेते, कार्यकर्त्यांना चिमटे काढतानाच महापालिका निवडणुकीत भाजपची काय भूमिका असेल याचेही संकेत दिले. महाजन यांनी थेट शिवसेनेचा उल्लेख केला नाही; परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी पाठोपाठ जिल्हा 'मित्रपक्ष'मुक्त करण्याची घोषणा केली. आगामी निवडणुकीनंतर जळगाव शहरात भाजपचाच महापौर होईल, असे सांगून भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले.

 

विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युतीसाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचे माजी मंत्री सुरेश जैन यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. बुलडाणा येथील एका कार्यक्रमात जैन यांनी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. राज्यात काहीही होवो,जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना -भाजपची युती करुया, असा प्रस्ताव जैन यांनी दिला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे जैन यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर आठवडाभरातच महाजन यांनी जैन यांचा युतीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

 

भाजपला युती का नकाे, त्याची ही पाच कारणे
१) आधी विरोधात घोषणा दिल्या, आता त्यांची सोबत नको : सुरेश जैन यांचा प्रस्ताव भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचे दिसत अाहे. चार वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा व त्यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये ज्यांच्या विरोधात घोषणा दिल्या त्या जैन व अन्य मंडळीसाेबत एकत्र आल्यास चुकीचा संदेश जाईल अशी भीती कार्यकर्त्यांना वाटते.
२) मतदारांना कसे समजावणार : मनपानंतर विधानसभा व लाेकसभा निवडणुका अाहेत. अाता युती करायची अाणि लाेकसभा, विधानसभेत पुन्हा एकमेकांच्या विराेधात रस्त्यावर उतरायचे ही भूमिका याेग्य नसल्याचे मत कार्यकर्त्यांचे अाहे. मतदारांना यासंदर्भात काय उत्तर देणार असाही प्रश्न उपस्थित केला जात अाहे.
३) घरकुल घोटाळा भ्रष्टाचाराचा मुद्दा : जैन यांच्या विरोधात घरकुल घोटाळ्यासह पाच गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्यभरात जळगाव महापालिकेची बदनामी झाली अाहे. गतकाळात महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढली हाेती. भ्रष्टाचाराचा इतिहास असल्याने त्यांच्यासाेबत जाणे कितपत याेग्य ठरेल असाही मतप्रवाह अाहे.
४) पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय : भाजपच्या अडचणीच्या काळात पक्षासाेबत राहुन शहरात अामदार व खासदाराला मताधिक्य मिळवून देण्यात कार्यकर्त्यांचा माेठा वाटा अाहे. गेली साडेचार वर्ष जनतेत जाऊन पक्षासाठी काम करणाऱ्या व निवडणुकीची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांवर युतीमुळे अन्याय हाेईल अशीही भावना व्यक्त हाेत अाहे.
५) फिफ्टी प्लसचे टार्गेट : गत मनपा निवडणुकीत भाजपच्या ७ ते ८ उमेदवारांचा अत्यंत कमी फरकाने पराभव झाला हाेता. अन्यथा सभागृहातील भाजपचे संख्याबळ हे २२ ते २५ पर्यंत पाेहचले असते. अाता राज्यात व केंद्रात सत्ता अाहे. पक्षासाठी देशभरात चांगले वातावरण असल्याने स्वबळावर लढल्यास 'फिफ्टी प्लस'चे उद्दीष्ट साध्य हाेईल असा विश्वास व्यक्त हाेत अाहे.


सुरेश जैन यांच्यासमोर पेच
जळगाव मनपा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीस मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे जैन यांनी गेल्या शनिवारी सांगितले होते. आठवडाभरातच महाजन यांनी युतीची शक्यता नाकारल्याने जैन यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. शिवसेना- भाजप युती केल्यास आगामी मनपा व लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत खाविआ व जैन यांनाही फायदा झाला असता. युतीचा प्रस्ताव नाकारल्याने खाविआचे स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे की शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवायची, असा पेच निर्माण होऊ शकतो.

 

अनिकेत पाटलांना भाजपची उमेदवारी
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव अनिकेत पाटील यांनी शनिवारी महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री महाजन यांनी अनिकेत पाटील यांना नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर केली.


जिल्हा 'मित्रपक्ष'मुक्त करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपची सत्ता अाहे. त्रिपुरातील विजय अापल्यासाठी प्रेरणादायी अाहे. महाराष्ट्रात मोठ्या महापालिकांवर भाजपची सत्ता आहे. नाशिक, पुणे, पिंपरी -चिंचवड, पश्चिम महाराष्ट्रात देखील माेठ्या महापालिका भाजपच्या ताब्यात अाहेत. अापल्याला जळगाव महापालिकेत देखील भाजपची सत्ता हवी अाहे. येथे भाजपचाच महापाैर करण्यासाठी आणि जळगाव मनपा ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. काँग्रेस- राष्ट्रवादीच नव्हे तर जिल्हा मित्रपक्ष मुक्त करण्यासाठी कामाला लागा.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री.


मंत्री महाजनांनी काढले राजकीय चिमटे
अापण काेणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षासाठी स्वत: वाहून घेतले. काेणतेही पद मागितले नाही किंवा मंत्रिपदाची लालसा ठेवली नाही. जे मिळाले ते पक्षाने दिले अाहे. काही लाेक मात्र माेठ्या अपेक्षा ठेवून असतात. अलीकडे ग्रामपंचायतीपासून पुढच्या टप्प्याची अपेक्षा ठेवली जाते. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य पुढे अध्यक्ष झाल्यावर थेट विधानसभेची स्वप्ने पाहु लागतात, असा चिमटा काढत मंत्री महाजन यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे बघत मी तुमच्याबद्दल नव्हे तर सर्वांबद्दल बाेलत असल्याचे म्हटले. या वेळी एकच हशा पिकला. भाजप जिल्हा अाणि महानगर अाघाडीची बैठक शनिवारी पक्ष कार्यालयात अायाेजित करण्यात अाली हाेती. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, महानगराध्यक्ष अामदार सुरेश भाेळे, विभाग संघटनमंत्री अॅड. किशोर काळकर यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा मंडल आढावा घेतला. या वेळी प्रदेश चिटणीस अामदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, खासदार ए.टी.पाटील, अामदार चंदुलाल पटेल, जिल्हा परिषद सभापती प्रभाकर सोनवणे, जळगाव मनपा विरोधी पक्षनेते वामनराव खडके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, तारा पाटील, डॉ.अस्मिता पाटील, गोविंद अग्रवाल, डॉ.मिलिंद वायकोळे, पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस पोपट भोळे, हर्षल पाटील, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी यांच्यासह ग्रामीण जिल्हा व महानगरचे सर्व मंडल अध्यक्ष तालुकाध्यक्ष, विस्तारक तसेच नगरसेवक बैठकीस उपस्थित होते. महानगर अध्यक्ष अामदार सुरेश भाेळे यांनीदेखील स्वबळावर लढण्यासाठी पक्षीय संघटना सज्ज असल्याचे सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...