आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात बँड, घोडा, जेवणावळी, बडेजाव टाळून वाचवले एक लाख रुपये; ११५ दत्तक मुलांच्या शिक्षणासाठी हातभार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवड- तालुक्यातील नांदगाव येथील आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजयसिंग ईशवरसिंग पाटील व शुभांगी यांचा विवाह नांदुरा येथील तिरुपती मंदिरा १९ एप्रिलला पार पडला. नवविवाहित दांपत्याने लग्नात पत्रिका, बँड, घोडा आणि जेवणावळीवर खर्च न करता एक लाख रुपये वाचवले. साध्या पद्धतीने लग्न लावून वाचवलेले पैसे त्यांनी दत्तक घेतलेल्या ११५ मुलांच्या शिक्षणासाठी दिले. त्यांच्या या आदर्श उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. 


बहुतेक लग्नांमध्ये बडेजाव आणि मानपानावर मोठा खर्च केला जातो. मात्र, नांदगाव येथील विजय पाटील यांनी या प्रथेला फाटा दिला. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी औरंगाबाद येथील चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावी परतण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये काही मित्रांना सोबत घेऊन त्यांनी आत्मसन्मान फाउंडेशनची स्थापना केली. संस्थेमार्फेत गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा उपक्रमदेखील त्यांनी सुरू केला. सद्यस्थितीत आत्मसन्मान फाउंडेशनने ११५ मुलांना दत्तक घेतले असून, या सर्व मुलांचा शैक्षणिक खर्च संस्थेतर्फे केला जात आहे. संस्थेने वाढदिवस, लग्न, व्यसन आदी बाबींवरील खर्च टाळून गरजूंना मदत करण्याबाबत जागृती केली होती. त्यानुसार समाजातील अनेक मदतीचे हात संस्थेच्या कार्यात हातभार लावत आहेत.
 

कुटुंबाचे सहकार्य 
गावोगावी फिरून लोकांना अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन करणाऱ्या विजय पाटील यांनी स्वतःचे लग्न आदर्श पध्दतीने लावले. लग्नातील बडेजाव आणि मानपान टाळून साध्या पद्धतीने सोहळा पार पडला. त्यातून वाचलेला निधी दत्तक घेतलेल्या ११५ मुलांच्या शिक्षणावर खर्च होणार आहे. या समाजकार्यात पाटील यांना त्यांच्या कुटुंबाचेही सहकार्य लाभत आहे. 

बातम्या आणखी आहेत...