आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडात पीठ कोंबून पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जीवाच्या आकांताने करून घेतली सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शिक्षिका पत्नीने कामावर जाण्यास सांगितल्याचा राग आल्यामुळे पतीने तिच्या तोंडात गहू, पीठ कोंबत गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याचा पाय घसरल्याने तिने जीवाच्या आकांताने प्रयत्न करून स्वत:ची सुटका करून घेतली. शुक्रवारी रात्री ८ ते ८.३० वाजेदरम्यान शिवाजीनगरात ही थरारक घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रिजवानाबी मोहम्मद उमेर (वय २४) असे पीडित शिक्षिकेचे नाव आहे. मूळ भुसावळ येथे राहणाऱ्या रिजवानाबी यांचे तीन वर्षांपूर्वी मोहम्मद उमेर मोहम्मद जावेद (वय ३४, रा.ख्रिश्चन कब्रस्तानजवळ, शिवाजीनगर) याच्याशी लग्न झाले आहे. दोघांना एक मुलगा असून तो रिजवानाबी यांच्या माहेरी भुसावळ शहरात राहताे. लग्नाच्या वेळी उमेर याची पीठाची गिरणी असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले होते; परंतु, तो कोणत्याही प्रकारचे काम करीत नसल्याचा अारोप रिजवाना यांच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.


रिजवाना यांनी सहा महिन्यांपूर्वी एका शाळेत कंत्राटी शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली. त्या पगारात भागत नसल्यामुळे त्या दररोज शाळेतून आल्यानंतर सायंकाळी घरात मुलांचे क्लास घेऊन दोन पैसे कमावत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी उमेर यास कामाला जाण्याबद्दल विचारणा केली होती. याचा राग आल्यामुळे त्याने क्लासमधील मुलांना घरी पाठवून दिले. यानंतर घराचे सर्व दरवाजे बंद करून तसेच मोबाइल स्विच ऑफ करून देत रिजवाना यांना स्वयंपाक खोलीत घेऊन गेला. तेथे त्याने रिजवाना यांच्या तोंडात गहू व पीठ कोंबले. यानंतर त्याने तिचा गळा दाबण्यास सुरुवात केली होती. गळ्यावर दाब पडल्यामुळे त्या सुन्न पडल्या. सुदैवाने पाय घसरल्यामुळे त्याचा तोल गेला, हीच संधी साधून त्यांनी लाथ मारून त्याला बाजूला फेकले. स्वत:ची सुटका करून घेत त्या घराबाहेर पळत सुटल्या. यानंतर तोदेखील त्यांच्या मागे पळाला होता. या वेळी त्याच्या अंगावर कपडेदेखील नव्हते असे रिजवाना यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.

 

तर घटना टळली असती
उमेर याने पहिल्यांदा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याचा मोठा भाऊ घरी आला होता. हे पाहून त्याने रिजवानाची सुटका केली. कोणाला काही सांगू नको, मी आता तुला मारणार नाही, अशी गयावया त्याने केली होती. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तिने जेठाकडे उमेरची तक्रार केली नाही. त्यांनीदेखील उमेरला कामाला जाण्याचे सांगितले होते. ते बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा रिजवाना यांना मारण्याचा प्रयत्न केला. आधीच जेठाकडे उमेरची तक्रार केली असती तर कदाचित ही प्राणघातक घटना घडली नसती, असे रिजवाना यांनी सांगितले.

 

प्रचंड दहशतीने मनात भीती भरली
पती उमेर हा जीवे ठार मारणार असल्याच्या दहशतीने रिजवाना यांच्या मनात भीती भरली आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता त्या शहर पोलिस ठाण्यात आल्यानंतर दहशतीतच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. आपबीती सांगत असताना त्या रडत होत्या. गळ्यावर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांना बोलताना खूप त्रास होत होता. अशा अवस्थेत माहेरच्या मंडळींनी त्याना धीर दिला. शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना सिव्हिलमध्ये दाखल केले अाहे. घटनेनंतर उमेरला समज देण्यासाठी पोलिस त्याच्या घरी गेले होते; परंतु तो बेपत्ता झाल्याने मिळून आला नाही. शनिवारी दिवसभर तो रिजवाना यांच्या मोबाइलवर फोन करीत होता.

बातम्या आणखी आहेत...