आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे- माजी शिक्षणमंत्री तथा विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह त्यांच्याशी भागीदारीत असलेल्या कंपन्या व त्यांच्या संचालकांवर बुधवारी आयकर विभागाने छापे टाकले. धुळे शहर व शिरपूर येथे एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले. भागीदारी असलेल्या कंपन्यांचे मुख्य कार्यालय चेंबूर येथेही अायकरच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेली ही कारवाई सुमारे अकरा तास उलटूनही सुरू होती. यातून फाइल, खतावळींची चाचपणी सुरू होती. तर या कारवाईबद्दल स्थानिक पथकाने मात्र तोंडावर बोट ठेवले आहे.
आयकर विभागाने माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व माजी शिक्षण मंत्री अमरीश पटेल यांच्या घरी सकाळी छापे टाकले. त्यासाठी मुंबई, पुणे व नाशिक येथील सुमारे १०५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक सकाळीच धुळ्यात पोहाेचले. सकाळी साडेसात वाजता धडक देत पथकाने आपले काम सुरू केले. याशिवाय डिसान कंपनीतही सुमारे ५० अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली. याशिवाय आमदार पटेल, कदमबांडे व त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजू भंडारी, बबन अग्रवाल, संतोष अग्रवाल, पसारी, देवता गारमेंटस, प्रभाकर चव्हाण, परम टेक्स्टाइल, अशोक कलाल, अॅड. सी. व्ही. अग्रवाल, सीए विजय राठी यांच्या निवासस्थानीही चौकशी करण्यात आली. या कारवाईबद्दल मात्र मौन बाळगले जात होते.
समर्थकांकडून बचाव, विराेधकांकडून टीका
आमदार पटेल व कदमबांडे यांच्या समर्थकांनी मात्र ही नियमित कारवाई असल्याचे सांगितले आहे. शिवाय चौकशीचा भाग असल्यामुळे वरिष्ठही त्यांना सहकार्य करत असल्याचा खुलासा केला आहे. तर काही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा प्रकार लक्षात येताच सकाळपासून सोशल मीडियावर मेसेज टाकले. शिवाय इतरांनाही फोन करून छापा कारवाईत घबाड सापडल्याच्या बिनबुडाच्या बातम्यांना हवा दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.