आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक बाजारपेठेत भारताची विक्रेते म्हणून संख्या लहान : डाॅ. काकोडकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जागतिक बाजारपेठेत भारतीयांची खरीददार म्हणून मोठी संख्या असली तरी विक्रेते म्हणून संख्या फारच छोटी आहे. हे चित्र बदलण्यासाठी विक्रेते म्हणून आपण मोठे व्हायला हवे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित नवीन वस्तू आणि सुविधा आणायला हव्यात. पूर्वी शेतीत आपण जगाच्या पुढे होतो. तो काळ आता मागे पडला. उद्योग युगात आपण मागे पडलो पण आता हळूहळू सावरत असलो तरी तळाला आहोत, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे व्यक्त केले.


डॉ. काकोडकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्तीनिर्मिती' या विषयावर शनिवारी परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाच्या उद््घाटनसत्रात डॉ.काकोडकर बोलत होते. कुलगुरू प्रा.पी. पी. पाटील अध्यक्षस्थानी होते. मंचावर प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. जे. बी. जोशी, सचिव डॉ. ए. पी. देशपांडे, कुलसचिव भ. भा. पाटील उपस्थित होते.


डॉ.काकोडकर म्हणाले, शेती प्रधान आणि उद्योग प्रधान युग आता हळूहळू मागे पडून ज्ञानाधिष्ठीत युग सुरू झाले असून या युगात ज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची निर्मिती करुन स्पर्धात्मक युगात टिकाव धरावा लागेल. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामीण भागाचा विचार करणे अपरिहार्य आहे. पुढारलेले देश व भारत यामधील दरी भरुन काढावी लागणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. अजूनही देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञानयुगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा लागेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढावी लागेल. उपजिविकेची साधने तंत्रज्ञानामुळे कमी होऊ लागली आहेत, असेही ते म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...