आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळवड खेळल्यानंतर नदीत उतरलेल्या तिघांचा तापी नदीत बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत दिगंबर पवार, श्रीराम पवार, शशिकांत पाटील - Divya Marathi
मृत दिगंबर पवार, श्रीराम पवार, शशिकांत पाटील

यावल - शुक्रवारी (दि.२)धुळवडीच्या दिवशी तालुक्यातील गिरडगाव येथील दोन आणि किनगाव येथील एका तरुणाचा गुजरात राज्यातील बौधान गाम (ता.मांडवी,जि.सुरत) येथे तापी नदीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी तिघांचे मृतदेह गावी आणून ९.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   


शशिकांत मोतीराम पाटील (२७), दिगंबर पुंडलिक पवार (२५, दोन्ही.रा.गिरडगाव) आणि श्रीराम संतोष पाटील (२४, रा.किनगाव) अशी मृतांची नावे  आहेत. तिघेही   सुरतमधील खासगी कंपनीला कामाला होते. भेस्तान येथे संगम सोसायटीत ते राहत होते.  शुक्रवारी धुळवडची सुटी असल्याने ते तापीनदी काठावरील बौधान गाम (ता.मांडवी) येथे गलतेश्वर महादेव मंदिरात धुळवड खेळण्यासाठी  गेले होते. मात्र, तेथे गर्दी असल्याने तिघे जवळील शानेश्वर महादेव मंदिरावर गेले. ते दर्शनापूर्वी आंघोळीसाठी तापी नदीत उतरले.

 

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. भेस्तान येथील पुरुषोत्तम मुरलीधर पाटील तक्रारीनंतर मृत्यूची नोंद झाले. शनिवारी सकाळी तिघांचे मृतदेह मूळ गावी आणून ९.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  शशिकांत हे विवाहित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा व वृद्ध आई-वडील आहेत. दिगंबर  यांच्या पश्चात आई-वडील आहेत. शशिकांत व दिगंबर हे परिवारातील एकमेव कर्ते होते.

 

कोथळीतील घाटात एक जण बुडाला

मुक्ताईनगर - धुळवडीनंतर कोथळीतील संत मुक्ताई मंदिराच्या घाटावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या मुक्ताईनगरातील प्रशांत सुरेश चव्हाण या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी ही घटना घडली.  प्रशांत सुरेश चव्हाण (१८) असे मृताचे नाव आहे. प्रशांत मित्रांसह होळी खेळून शुक्रवारी सकाळी ९ वाजता कोथळीतील संत मुक्ताई मंदिराच्या घाटावर हातपाय धुण्यासाठी गेला होता. चौघांपैकी कुणालाही पोहता येत नसल्याने ते घाटाच्या पायऱ्यांवर बसून हातपाय धूत होते. या वेळी शेवाळावरून पाय घसरून तोल गेल्याने प्रशांत डोहात पडला. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत प्रशांत पाण्यात बुडाला. सायंकाळी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर  काढण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...