आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • पारा चढलेल्या जलसंपदा मंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता BJP Minister Girish Mahajan Angry On NCP Worker At Raver

पारा चढलेल्या जलसंपदा मंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर- 1, 5 आणि 6 जून असे एकाच आठवठ्यात तीन वेळा झालेल्या वादळाने 1600 हेक्टरवरील केळीचे सुमारे 120 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी या नुकसानग्रस्त भागात वेगवेगळी पाहणी केली.

 

गिरीश महाजन हे नुकसानाचा आढवा घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील हे वारंवार त्यांना मुख्यमंत्री काय मदत देणार? पालकमंत्री कुठे गेले? अशी विचारणा करत होते. यामुळे पारा चढलेेल्या गिरीश महाजन यांनी सोपान पाटील यांना नुकसान पाहणी दौऱ्यातून बाहेरचा रस्ता दखावला.अहिरवाडी-पाडळे शिवारात हा प्रकार घडला.

 

रावेर-यावल तालुक्याला वादळाचा तडाखा बसून केळी उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी (दि.७) रावेर तालुक्यातील निंभोरा, दसनूर, वाघोदा, विटवा, निंबोल, दोधा, नेहता, अटवाडा, अजनाड भागातील नुकसानीचा आढावा घेतला. तसेच सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी. ही मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसेल, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. खान्देशातील केळीवर निपाह वायरसची लागण झाल्याची अफवा पसरवणाऱ्यांना शोधून कारवाई करावी, अशी मागणी खडसे यांनी केली.

 

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, सुनील पाटील, पी.के.महाजन, महेश चौधरी, कैलास सरोदे, शिवाजी पाटील, श्रीकांत महाजन, तहसीलदार विजय ढगे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार उपस्थित होते.

 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वादळग्रस्त विरोदा, सावदा, वाघोदा, अहिखाडी, केऱ्हाळा, पाडळा, अटवाडा, अजनाड, दोधा, नेहता भागातील केळी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. त्वरित पंचनामे करून शासकीय मदत देण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.

 

दरम्यान, मंत्री महाजन हे शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत असताना अहिरवाडी-पाडळे शिवारात राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील हे मुख्यमंत्री काय मदत देणार? पालकमंत्र्यांनी पाहणी का गेली नाही? ते कुठे गेले? अशी वारंवार विचारणा करत होते. याच मुद्द्यावर त्यांची मंत्री महाजन यांच्यासोबत शाब्दिक चकमक उडाली. या वेळी मंत्री महाजन यांनी, शेतकऱ्यांची कामे होऊ द्या. राजकारण करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका, अशा शब्दात सोपान पाटील यांना सुनावले. मात्र, तरीही त्यांच्याकडून विचारणा सुरू असल्याने त्यांना पाहणी दौऱ्यातून अक्षरश: बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सुरेश धनके, माजी आमदार अरूण पाटील, पद्माकर महाजन, भुसावळचे अनिल चौधरी, पी.के.महाजन , सुनील पाटील, नीळकंठ चौधरी उपस्थित होते

नंदकिशोर महाजन यांच्याविरुद्ध तक्रार
पाहणी दौऱ्यात मंत्री गिरीश महाजन गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास नेहता-पातोंडी (ता.रावेर) दरम्यान होते. या वेळी राष्ट्रवादीचे विवरा-वाघोदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोळी यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन (भाजप) यांच्याकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीची मंत्री महाजन यांच्याकडे तक्रार केली. यामुळे वातावरण तापले असताना नंदकिशोर महाजन यांनी शांत बसणे पसंत केले. दरम्यान, सेना-भाजपच्या सबंधावर बोलताना मंत्री महाजन यांनी युती झाल्यास दोघांचा फायदा होईल, असे सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पारा चढलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...