आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंचे भाजप नेत्यांवर तीन आरोप; पक्षपात, चालढकल अन‌् अवहेलना;‘दिव्य मराठी’शी विशेष बातचीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आपल्यावर आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षांपैकी कोणीही आपल्या राजीनाम्याची मागणी केलेली नव्हती. तरीही प्रदेशाध्यक्षांनी आरोप झाल्याचे म्हटले म्हणून राजीनामा दिला. त्यानंतर मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांवरही आरोप झाले. मात्र, आपल्याला जो न्याय दिला गेला तो इतरांसाठी लावला गेला नाही. या बाबतीत पक्षपात करण्यात आला. इतरांना चौकशी करून लगेच क्लीन चिट देण्यात आली. आपल्याबाबतीत मात्र, अकारण दिरंगाई करण्यात येते आहे. आपल्याला स्वपक्षीयांकडूनच भ्रष्ट ठरवले जात असून आपली अवहेलना करण्यात येते आहे, अशी खंत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. ‘दिव्य मराठी’शी काल ते बोलत होते. रावेर येथे केलेल्या भाषणानंतर ‘दिव्य मराठी’नी त्यांच्याशी संपर्क साधला त्या वेळी ते बोलत होते.


‘जे रावेरमध्ये बोललो ते आता राज्यभर बोलत फिरणार आहे’
मी जे रावेरात सांगितले ते आता महाराष्ट्रभर बोलणार आहे, असे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना आज जाहीर केले. रावेरमध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी आपली पुढची रणनीती आणि मनातील खंत स्पष्ट केली. ते म्हणाले की, मला मंत्रिमंडळात घेतले जात नाही याचे मला काहीच दु:ख नाही, पण माझ्यावर लाचलुचपतचे तीन गुन्हे दाखल झाले. वेगवेगळ्या प्रकरणांत चौकशा लावल्या आणि मला भ्रष्ट ठरवण्याचा प्रयत्न केला गेला याचे मला शल्य आहे. मी खरोखरच इतका भ्रष्ट आहे असे जर सरकारला वाटत असेल तर त्यांनी ते पुराव्यांसह सिद्ध करावे आणि कळू द्यावे महाराष्ट्रातील जनतेला नाथाभाऊ काय आहे एवढीच माझी मागणी आहे. सरकारमधील अन्य मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. 


मग का नाही झाल्या त्यांच्या चौकशा?  मला एक आणि दुसऱ्यांना वेगळा न्याय हे कसे चालेल? मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याबरोबर सर्वच पक्ष राजीनामा मागण्यासाठी तुटून पडतात, पण मी राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाने केली नाही, असेही खडसे यांनी सांगितले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेला कोणताही मंत्री एवढे खुलेपणाने सरकारला आव्हान देत नाही, पण मी सरकारला सांगतो की माझी चौकशी करा आणि दोषी असेल तर तुरुंगात पाठवा. 
 
चाळीस वर्षे नाथाभाऊ भाजपत होते. त्यांनी पक्ष वाढवला, शिवसेना असो की कोणताही राजकीय विरोधी पक्ष सर्वच तोफेच्या तोंडी नाथाभाऊ तुम्हाला चालत होते. आता सरकार आले आणि असे काय झाले की नाथाभाऊ एकदम नकोसे वाटायला लागले. हे मला नाही तर साऱ्या महाराष्ट्राला कळू द्या, हे माझे सरकारला आव्हान आहे, असेही एकनाथ खडसे यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.
  
गुन्हा सिद्ध केला तर आयुष्यभर तुरुंगात जायलाही तयार : एकनाथ खडसे
पक्ष सोडण्याची मुळीच इच्छा नाही, परंतु मला पक्षाबाहेर ढकलले जात आहे. पक्ष सोडायला भाग पाडत असाल तर माझ्याकडे पक्ष बदलण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ४० वर्षे पक्षासाठी झटलो. त्यामुळे एखादा आरोप जरी सिद्ध झाला तरी यापुढील आयुष्य तुरुंगात घालवण्यासाठी तयार आहे, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मन मोकळे केले. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे  नेते राजीव पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेतेही उपस्थित होते. त्यात एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, विरोधी पक्षात असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विलासराव देशमुख आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर अनेक मुद्दे आक्रमकपणे मांडले. त्या वेळी जे माझ्याकडे येऊन बसत होते, मी आता अामच्याच लाेकांना गुन्हेगार दिसत आहे.

 

खडसेंची शायरी... ‘रहते थे कभी जिनके दिल में, हम जान से भी प्यारो की तरह, बैठे है उन्ही के कुंचे में हम आज गुनहगारों की तरह’ (रावेरच्या भाषणात)

 

दानवे म्हणतात : नाथाभाऊ बऱ्याचशा चौकशातून बाहेर पडले आहेत. काही विषय बाकी आहेत. त्यातून बाहेर पडले तर नक्कीच स्थान मिळेल.

 

नाथाभाऊ तुमच्यासाठी सर्व दरवाजे खुले- अशोक चव्हाण

नाथाभाऊ खडसे खरे स्वाभिमानी आहेत. परंतु  पक्षातून कोणी ढकलून बाहेर काढेपर्यंत त्यांनी वाट पाहू नये. अडचणीच्या काळात आमच्यासारख्या मित्रांची आठवण काढावी. नाथाभाऊ तुमच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार
अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा भाषणाचा व्हिडिओ आणि संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...