आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापुरात रंगावली नदीला महापूर, 200 घरे वाहून गेली; 3 महिलांसह पाच जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- गुजरात सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरात गुरुवारी रात्री तब्बल १४४ मिमी पाऊस बरसला. त्यामुळे मध्यरात्री २ वाजता रंगावली नदीला महापूर येऊन सुमारे २०० घरे, अनेक वाहने वाहून गेली. या महापुरात तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. १९७६ नंतर प्रथमच अालेल्या या महापुरामुळे नवापूर परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली, तसेच नवापूर तालुक्यातील अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर-सुरत महामार्गावरील वाहतूक रात्रीपासूनच बंद केली हाेती, त्यामुळे सुमारे ७० किलोमीटरपर्यंत वाहनांची भलीमोठी रांग लागली होती. जिल्हा प्रशासनाने मध्यरात्रीपासूनच मदतकार्य सुरू केल्याने अनेकांचे प्राण वाचले. मात्र ५०० घरात पाणी घुसल्याने अनेक संसार उघड्यावर अाले, तर शेकडाे पशुधन पुरात वाहून गेले.


झाडाला लटकल्याने वाचला जीव
नवापूर शहरातील हदगाह परिसरातील सय्यदाबी हसन काकर ही ५० वर्षीय महिला रात्री दोन वाजेच्या सुमारास घरातील समान काढत असताना पुरात वाहून गेली, तर विसरवाडी परिसरात उंचीशेवाडी प्रकल्पाला भगदाड पडल्याने सरपणी नदीला आलेल्या पुरात बालाहाट येथील जामनाबाई लाश्या गावित या महिलेचा मृत्यू झाला. तिचा नवरा झाडाला लटकल्याने सुदैवाने वाचला. खोकसा येथे पाण्यात घर पडून वंतीबाई बोधल्या गावित या महिलेचा मृत्यू झाला. चिंचपाडातही एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. नवापूर शहरातील मीनाबाई कासार आणि वाघाळीपाडा येथील काशीराम गावित हे दोन जण बेपत्ता असून प्रशासन आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. गावातील अनेक लाेक अजूनही बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात येत अाहे.

 

भीषण पुरामध्ये लोखंडी गजांचा आधार सापडल्याने वाचले वीटभट्टीवरील मजुराचे प्राण
पुराचे पाणी घरात शिरले हाेते. मी सामान काढत असताना अचानक लाेंढा अाल्याने वाहून जाऊ लागलाे, मात्र जीवाच्या अाकांताने एका लाेखंडी गजाला घट्ट पकडून धरले. डाेळ्यासमाेर साक्षात मृत्यू दिसत हाेता. नाकातोंडात पाणी जाऊ लागले. जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना मी अल्लाहची प्रार्थना करीत बसलो होतो. त्याने माझी प्रार्थना एेकली अाणि जीव वाचला.
- गफूर शाह अंजन शाह फकीर, वीटभट्टी मजूर.


६ जणांना वाचवण्यात यश
कैलास व शंकर गोसावी या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या भावंडाचे घर व गाेठा नदीलगतच अाहे. त्यात २ गाई व १७ म्हशी हाेत्या. पुराने घराला वेढा घातल्याने त्यांना पडणे व जनावरांना वाचवणे मुश्कील झाले. अखेर गावकऱ्यांनी दाेर बांधून गळ्यापर्यंतच्या पाण्यातून कुटुंबातील ६ जणांना वाचवले. गावातील एक स्काॅर्पिअाे कार पुरात ५ किमीपर्यंत वाहून गेली.


विजेचे १५० खांब कोसळले
धनराट, बोकळझर, पानबारा, खोकसा, चिंचपाडा व धायटा परिसरातील पूल, रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात वीजपुरवठा खंडित आहे. पाच डीपी व १५० आसपास खांब कोसळले. नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून नवापूर परिसरातील शेकडो पशू-प्राण्याची जीवितहानी झाली.

 

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले, सतर्कतेचा इशारा
भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्रीपासून दमदार पाऊस झाला. यामुळे धरणाची जलपातळी वाढल्याने गुरुवारी २४, तर शुक्रवारी ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. विसर्गामुळे तापी नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना तसेच हतनूरच्या बॅकवॉटरमध्ये येणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात प्रथमच दमदार पाऊस झाला. पावसामुळे पातळी वाढल्याने गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत धरणाचे २४ दरवाजे उघडून विसर्ग झाला. रात्रीही पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी सकाळी ७ वाजता ३६ दरवाजे उघडून विसर्ग केला. पाणोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे विसर्ग सुरूच आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, तर हतनूर बॅकवॉटरमध्ये येणाऱ्या रावेर, मुक्ताईनगर आदी तालुक्यांतील गावांनाही सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती उपविभागीय अभियंता एन. पी. महाजन यांनी दिली.  


१.९९ लाख क्युसेक विसर्ग
हतनूर धरणात ताशी १२.३५ दलघमी पाण्याची आवक होत आहे. शुक्रवारी धरणाची पाणी पातळी २१०.९७० मीटर, तर एकूण जलसाठा २३३.५० दलघमी इतका हाेती. धरणात १३३.५० जिवंत जलसाठा आहे. धरणातून प्रतिसेकंद ५ हजार ६६० क्युमेक्स अर्थात १ लाख ९९ हजार ९११.२ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.


मुदखेड : शेतकरी वाहून गेला
नांदेड : मुदखेड तालुक्यातील बोरगाव नादरे येथील शेतकरी प्रभाकर अवधूतराव नादरे (४९) हे गुरुवारी शेतातून सायंकाळी घरी येत असताना दुधनवाडी ते बोरगाव नादरे रोडवरील नाल्याच्या पुरात वाहून गेले. बंधारा ओलांडत असताना पुरामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. तोल जाऊन ते पात्रात पडले. त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, परंतु ते प्रवाहात वाहून गेले. 


नाशिक : २४ धरणांत ६८% पाणी
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत १०० मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत पाणीसाठा ६८% झाला आहे. १३ धरणांतून विसर्गही सुरू आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पाणीसाठा ७० टक्क्यांवर गेला. नाशिकमधून ११ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले. मात्र नंतर पावसाने दडी मारली होती. जायकवाडीत शुक्रवारी २८.६९ पाणीसाठा होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... नवापुरात उडालेल्या हाहाकाराचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...