आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवशीच प्रेयसीने दिला नकार..खान्देश सेंट्रल मॉलच्या छतावर प्रेमवीराचा आत्महत्येचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- प्रेमाच्या अाणाभाका घेऊन चार वर्षांपासून प्रेमसंबध ठेवणाऱ्या प्रेयसीने दुसऱ्याशी गट्टी केली. ही बाब लक्षात अाल्यानंतर हटकल्यानंतर प्रेयसीने त्यालाच रागावले. या प्रकाराने तळपायाची अाग मस्तकात गेलेल्या प्रियकराने खान्देश सेंट्रल माॅलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिस व अग्निशामक विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिताफीने झडप घालून ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. ही घटना साेमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. 


गणेश श्रीकृष्ण पवार (वय २४, रा. नांदगाव खांदेश्वर, जि. अमरावती) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. तर त्याच्याच गावातील रहिवासी असलेली तथा सध्या गणेश कॉलनीत भाड्याच्या घरात राहणारी प्राची (वय २४, नाव बदललेले) असे प्रेयसीचे नाव आहे. तर या दोघांच्या प्रेमसंबधात नंतर 'एन्ट्री' करणारा विलास विभिषण पाटील (वय २४, रा. भोकर भादली, ता. जळगाव) हा आहे. गणेशने बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. चार वर्षाांपासूून त्याचे प्राची सोबत प्रेमसंबध आहेत. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला हाेता. दरम्यान, प्राची ही खान्देश सेंट्रलमधील एका आस्थापनेत नोकरीस आहे. गणेशनेच तिला येथे नोकरीस लावून दिले होते. तर विलास हा देखील याच आस्थापनेत कामाला आहे. चार महिन्यांपूर्वी विलास यानेही प्राचीला प्रप्रोझ केले होते. 'माझ्यावर प्रेम कर अन्यथा मी आत्महत्या करेल,' असे त्याने तिला सांगितले होते. भीतीपोटी प्राचीने त्यालाही होकार दिला. ही बाब माहित पडल्याने गणेश आणि प्राची यांच्यात दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. यानंतर विलास सोबत प्रेमसंबध ठेवणार नाही, असे वचन प्राचीने दिल्यानंतर हा वाद मिटला होता. दरम्यान, सोमवारी गणेशचा वाढदिवस असल्यामुळे तो सकाळी ६ वाजताच अमरावती येथून रेल्वेने जळगावात पोहचला. १० वाजता खान्देश सेंट्रल येथे प्राची आणि त्याची भेट झाली. प्राची अजूनही विलास सोबत बोलत आहे, रविवारी दोघे भेटले होते, अशी माहिती गणेशला मिळाल्यामुळे तो नाराज झाला. त्याने प्राचीसोबत भांडण केले. परंतु, या वेळी प्राचीने सर्वांसमोर गणेशचा पाणउतारा केला. याचा राग आल्यामुळे गणेश खान्देश सेंट्रलच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या खिडकीतून गॅलरीत पोहचला. प्राचीने ही बाब लागलीच सर्वांना सांगितली. ती देखील या गॅलरीत गेली होती. पाण्याची बाटली घेऊन कडा नसलेल्या गॅलरीतून पाय खाली टाकून गणेश बसलेला होता. उडी मारण्याची धमकी देत असताना प्राची त्याला समजावत होती. ही माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांच्यासह कर्मचारी ओमप्रकाश पंचलिंग, नवजीत चौधरी, सुनील पाटील, अमोल विसपुते व अग्निशमन विभागाचे अश्वजित घरडे पथकासह घटनास्थळी पोहचले. सुरक्षेचे उपाय म्हणून २० जणांनी खालच्या बाजूने बॅनर व जाळी पकडून ठेवली होती. अग्निशमन विभागाच्या वाहनाची शिडी उंच करण्यात आली. पथदिवे दुरुस्तीच्या व्हॅनची क्रेनही तयार ठेवण्यात आली होती. दरम्यान, कोसे यांनी पथकासह गॅलरीत जाऊन गणेशच्या विनवण्या केल्या. तरी तो माघारी घेण्यास तयार नव्हता. त्याला बोलण्यात गुंतवून ठेवण्याचे प्राचीला सांगितले. याचवेळी गणेश जवळची पाण्याची बाटली रिकामी झाली. दुसरी बाटली आणून देण्याच्या बहाण्याने कोसे हे गणेशजवळ गेले. कोसे जवळ येताच उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या गणेशच्या शर्टची कॉलर पकडून त्याला मागे खेचले. तोच इतर कर्मचाऱ्यांनी धावत येऊन त्याला उचलले. त्यामुळे अनर्थ टळला. 


माॅलच्या व्यवस्थापकाची हुज्जत
खाली उभ्या असलेल्या जमावाचा जीव भांड्यात पडला. जमावाने पोलिस व अग्निशमन दलाच्या पथकाचे अभिनंदन केले. यानंतर तिघांना शहर पोलिस ठाण्यात आणून गणेशवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, गणेश आत्महत्या करण्यासाठी गॅलरीत गेल्यामुळे पोलिस, अग्निशमन दलासह प्रसार माध्यमांचे छायाचित्रकार घटनास्थळी पोहचले होेते. या वेळी छायाचित्र काढू देण्यास मज्जाव करीत खान्देश सेंट्रल माॅलच्या व्यवस्थापकाने छायाचित्रकारांशी हुज्जत घातली. या प्रकारामुळे या वेळी उपस्थितांनीही तीव्र संताप व्यक्त केला. 


तिघांना दिला 'प्रसाद' 
घटना घडल्यानंतर गणेश, विलास व प्राची या तिघांना शहर पोलिस ठाण्यात आणले होते. पोलिसांनी गणेश व विलास या दोघांना 'प्रसाद' दिला. तर महिला कर्मचाऱ्यांनी प्राचीला 'प्रसाद' दिला. 'प्राचीला मारू नका तिच्या ऐवजी मला मारा,' असे गणेशने पोलिसांना सांगितल्यामुळे पोलिसांच्या संतापात आणखीच भर पडली होती. खान्देश सेंट्रलच्या व्यवस्थापकांना देखील बोलावण्यात आले होते. अखेर गणेशवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर पोलिसांनी प्राचीला मारल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या सरिता माळी ह्या पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्या प्राचीला तेथून अापल्या सोबत घेऊन गेल्या. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... प्रेमाच्या त्रिकोणातून गणेश याने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...