आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य झटके; सरदार सरोवराजवळ भुकंपाचे केंद्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदूरबार - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, धडगाव व तळोदा तालुक्यातील काही गावांत शनिवारी सायंकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५   एवढी नोंदवली गेली असून सरदार सरोवर प्रकल्प परिसरातील केवडिया कॉलनी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.  


तळोदा तालुक्यातील सलसाडी, पाडळपूर, गोपाळपूर, पांडुर्खे, बंधारा, राणीपूर, प्रतापपूर, रांझणी, तळवे, कढेल आदी गावांत  मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. काही गावांतील घरावरील पत्रे हलल्याने नागरिक भयभीत झाले. भूकंपानंतर नागरिक घराबाहेर पडले. धडगाव, शहादा तालुक्यातील काही गावांतही सौम्य भूकंपाचे झटके बसले.या विषयी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही तालुक्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचे सांगितले. मात्र, कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती दिली.    


सरदार सरोवर प्रकल्पाच्या केवडिया कॉलनीपासून ५२ किलाेमीटर परिसरात गुजरात-महाराष्ट्रच्या सीमावर्ती  भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...