आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापार्‍याची रोकड पळविण्याचा प्रयत्न, चोरटे फरार; घटनास्थळी सापडले काडतूस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- अज्ञात चोरट्‍यांनी एका व्यावसायिकाला डोळ्यात मिरची पूड टाकून रोकड पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शहरातील फैजपूर रस्त्यावर ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी संबंधित व्यापाऱ्याचा रस्ता अडवून पैशाची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यावसायिकाने विरोध करीत आरडाओरड केल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.  घटनास्थळी एक काडतूस सापल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात फर्टीलायझरचा व्यवसाय करणारे संभाजी अशोक येवले (वय- 40) हे शॉप बंद करून सुमारे 40 ते 42 हजार रुपये एका पिशवीमध्ये ठेवून घरी जाण्यास निघाले होते. तत्पूर्वी फैजपूर रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावरून दुचाकीत पेट्रोल भरले. हॉटेल भाग्यश्रीजवळ त्यांच्या मागून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकी वाहनावर तिघांनी त्यांचा रस्ता अडवला. एकाने त्यांच्या डोळ्यावर मिरची पावडर फेकली. या प्रकारामुळे येवले घाबरले व दुचाकीवरून खाली कोसळले. तिघांपैकी दोघांनी त्यांच्याजवळील पैशाची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र येवले यांनी त्याला तीव्र विरोध केला. दोघांमध्ये झटापटही झाली. यात संभाजी येवले किरकोळ जखमी झाले आहेत. झटापटीदरम्यान येवले यांनी आरडा-ओरड केल्याने नागरिक एकत्र झाले व नागरिकांना येताना पाहून अज्ञात चोरट्यांनी तेथून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच शहरात एकच खळबळ उडाली. येवले यांनी पोलिस स्टेशन गाठले क्षणाचाही विलंब न करता पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली व त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी सध्या सुरू आहे. घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच यावर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती. उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, नगरसेवक अभिमन्यू चौधरींसह अनेक व्यावसायिकांनी पोलिस स्टेशन गाठून संभाजी येवले यांची विचारपूस केली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा संबंधित घटनेचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...