आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव - जळगावच्या जानकीनगर, तुकारामवाडी परिसरातील बंद घरात देवापुढे लावलेल्या दिव्यामुळे अाग लागून गॅस सिलिंडरचा स्फाेट झाल्याने ४१ दिवसांपूर्वी १५ घरे जळून खाक झाली हाेती. या घटनेची पुनरावृत्ती मंगळवारी सकाळी ९.३० वाजता शिवाजीनगर भागातील भुरे मामलेदार प्लाॅटमधील दालफड परिसरात झाली.
एका बंद घरात देवापुढे लावलेल्या दिव्यामुळे घराला अचानक अाग लागली. अागीमुळे शेजारच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फाेट झाला. यात १२ झाेपड्या जळून खाक झाल्या. यात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
भुरे मामलेदार प्लॉटमध्ये सतीश कंडारे यांच्या मालकीच्या १२ पार्टिशनच्या झोपड्या होत्या. यात ११ कुटुंबे राहत होती. मंगळवारी सकाळीच झाेपडीत राहणारे व हातमजुरी करणारे पुरुष व महिला कामावर गेलेले हाेते. त्यामुळे बहुतेक घरे बंदच होती. तर चेतन भगत हेदेखील सकाळी घरात देवापुढे दिवा लावून बाहेर गेले होते. काही वेळानंतर दिव्यामुळे भगत यांच्या घराला आग लागली. (असा अंदाज आगग्रस्त कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला आहे) त्यामुळे भगत यांच्या घरातून धूर निघत असल्याचे शेजारी राहणाऱ्या मंगलाबाई चंद्रकांत अटोळे यांना दिसले. त्यांनी लागलीच सून व पाच वर्षांचा नातू ओम यांच्यासोबत घराबाहेर पळ काढला.
त्यांच्याशिवाय इतर झोपड्यांमध्ये असलेल्या दोन-तीन जणांनीदेखील बाहेर येऊन मोकळ्या जागेचा आश्रय घेतला. काही मिनिटांतच आगीने राैद्ररूप धारण केले. आगीमुळे आटोळे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. त्याच वेळी काही नागरिकांनी अापल्या घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढल्यानेे माेठा अनर्थ टळला.
आगीत आटोळे यांच्यासह चेतन भगत, रोहिणी सोनार, विष्णू कोळी, गुलाब शेख, संजय मिस्त्री, रफहक शेख, शारदा बिऱ्हाडे, ज्ञानेश्वर पाटील, संजय आटोळे व शैलजा विसपुते यांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात प्राणहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही.
एका घरातील १२ हजार रु. जळाले
आगीत संपूर्ण घर व संसारोपयोगी वस्तूंची डाेळ्यासमाेर राखरांगोळी झाल्यामुळे आगग्रस्त कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. परिसरातील नागरिकांनी त्यांना धीर दिला. मंगलाबाई यांच्या घरात सुमारे १२ हजार रुपयांची रोकड होती, तीदेखील आगीत जळून गेली. तब्बल २.३० तासांनंतर अग्निशामक दलाच्या ३ बंबांनी आग आटोक्यात आणली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.