आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छकुली, चांगला-वाईट स्पर्श तुलाही कळायलाच हवा; अत्याचार रोखण्यासाठी 19 लघुपटांद्वारे जागर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- छकुली, चांगला-वाईट स्पर्श तुलाही कळायलाच हवा. तुझ्या शरीराला विनाकारण स्पर्श करण्याचा कुणालाही अधिकार नाही. एका चिमुकलीला ती समाजसेविका 'चांगल्या-वाईट' स्पर्शासंंबंधात माहिती देत असतानाच तिचे आजी-आजोबा डोळे वटारतात.मात्र मुलीचे पालक आजी-आजोबांना थांबवून त्या मुलीचे समुपदेशन करु देण्यास परवानगी देतात. 


कुठआ-उन्नाव येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना,महिलांचे लैंगिक शोषण आदींमुळे देशभरात चिंता त्याचसोबत संताप व्यक्त होत असताना जळगाव पोलिस महिला-मुलींवरील अत्याचाराविषयी जनजागृती करण्याचे निष्ठेने,नेटाने काम करीत आहेत. वाढत्या गुन्हेगारीबाबत सर्वजण पोलिसांवर खापर फोडून मोकळे होतात. बहुतांश गुन्हे नागरिकांची बेसावधता, निष्काळजीपणा व सतर्कतेअभावी घडतात. वेळीच सावधानता दाखवल्यास गुन्हा घडण्यापूर्वी रोखणे शक्य आहे. याच हेतूने जळगाव जिल्हा पोलिस दलाने बनवलेल्या पोलिस मीडिया व्हॅनद्वारे १९ लघुपटांच्या माध्यमातून जागर करून जळगावकरांना गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या विविध पद्धतींविषयी सावध करीत आहेत.

 

'यम जान दान योजना'
'यम जान दान योजना' ही छोटीशी व्हिडिओ चित्रफीत मनोरंजनातून रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करत आहे. वाहतूक नियमांचा भंग करून यमसदनी गेलेले, यमाला म्हणतात आम्हाला का मारले? एवढ्या कमी वयात आम्हाला येथे का आणले? असे युवक व युवती विचारतात. त्यावेळेस यम त्यांना नियम समजावून सांगत तुमचे आयुष्य चांगले काम करणाऱ्यांना दिले पाहिजेत, असे सांगतात. असे कथानक त्या लघुपटामध्ये आहे. या सर्व चित्रफिती कल्पकतेने बनवण्यात आलेल्या आहेत. पोलिस अधीक्षक यांचा संदेशही त्यामध्ये आहे. 


सायबर क्राईम
त्याचप्रमाणे तुमच्या एटीएम क्रमांक व पासवर्डची माहिती कुणाही देऊ नका. समोर राडा झाला आहे, मी पोलिस अधिकारी आहे. तुमचे दागिने काढून माझ्या रुमालात सांभाळून ठेवा, असे म्हणून दागिने लंपास करणाऱ्या चोरांच्या पद्धतीबाबत अभिनेते मकरंद अनासपुरेंची छोटाशी चित्रफितही महत्त्वाची आहे. खाली पैसे टाकून बॅग लंपास करण्याची चोरट्यांची पद्धत, सायबर क्राइम, महिलांबाबतचे गुन्हे, मुलांचे लैंगिक शोषण, रस्ता सुरक्षा व दहशतवाद हे लघुपटही महत्त्वपूर्ण आहेत. 


जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या संकल्पनेतून ही मीडिया व्हॅन साकारली आहे. पोलिस दलाकडे उपलब्ध असलेल्या वाहनाचा वापर करून ही व्हॅन बनवण्यात आलेली आहे. त्यामध्ये एलईडी पॅनल, चार सीसीटीव्ही कॅमेरे, दोन स्पीकर, अॅम्प्लिफायर, जनरेटर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू लावण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस दलासह राज्याच्या पोलिस दलाने बनवलेले चित्रफिती अाणि लघुपट या व्हॅनच्या माध्यमातून जळगाव शहरात वर्दळीचा भाग, शाळा, महाविद्यालये आदी भागांमध्ये नागरिकांना दाखवण्यात येत असून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येत अाहे. 


चांगल्या, वाईट स्पर्शाबाबत मुलीला माहिती 
अल्पवयीन मुलींना चांगल्या व वाईट स्पर्शाबाबत जागृत करणारी शॉर्ट फिल्मही व्हॅनमधून दाखवण्यात येत आहे. यात एक महिला तिच्या पालकांसमोर अल्पवयीन मुलीला चांगल्या व वाईट स्पर्शाबाबत सांगत असते. प्राण्यांनाही चांगला, वाईट स्पर्श कळतो. तुलाही कळायला हवा. तुझ्या शरीराच्या कपड्यांखाली झाकलेल्या भागांना स्पर्श करण्याचा कुणालाही अधिकार नाही. छकुली, डॉक्टरही तुला पालकांच्या उपस्थितीतच तपासू शकतात. अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीने 'नको तिथे' स्पर्श केल्यास त्याची पालकांना त्वरित माहिती दे, अशा आशयाची माहिती ती महिला मुलीला देते. त्याचवेळी तिचे आजी-आजोबा तेथे येतात. मात्र, ते नजरेनेच या प्रकाराबाबत हरकत घेताना दिसतात. त्यावेळेस पालक आजी-आजोबांना थांबवतात असे त्या लघुपटाचे कथानक आहे. 

 
...तुझ्या सारख्या पुरुषांचे काही खरे नाही 
रेल्वे, बस व रिक्षांमध्ये प्रवास करताना महिला व युवतींना शेजारी बसलेल्या पुरुषांकडून अंगलट करणे, नकोसा स्पर्श करणे व धक्का देणे असे प्रकार सर्रास घडतात. याबाबतही एका व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. रिक्षामध्ये बसलेल्या युवतीशी शेजारी बसलेला युवक अंगलट करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस ती युवती तडकपणे उठून त्याला सुनावते. अशाच महिला जाग्या झाल्या तर तुझ्यासारख्या पुरुषांचे काही खरे नाही, असे ती त्या युवकाला सांगते. त्यानंतर समोरच्या सीटवर बसलेला दुसरा युवक तिच्या धाडसाचे कौतुक करत तिला सॅल्यूट मारतो, असे कथासूत्र त्या लघुपटामध्ये दाखवण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...