आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणूक : भाजप-सेना युतीचे घाेडे पाण्यातच; दाेघांची सर्व जागा लढण्याची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेल्या भाजप व शिवसेनेच्या युतीचे घाेडे अजूनही पाण्यातच अाहे. मुंबईतील बैठकीनंतरही काेणताही निर्णय हाेत नसल्याने युतीचे त्रांगडे सुटलेले नाही. एकीकडे नेते मनाेमिलनाच्या गप्पा मारत असताना मात्र दाेन्ही पक्षाचे पदाधिकारी मात्र स्वबळाची भाषा करीत अाहेत. 'दिव्य मराठी'च्या चर्चासत्रातही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण ७५ जागांवर लढण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केल्याने युती ऐनवेळी फिस्कटणार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. 


महापालिकेच्या १९ प्रभागातील ७५ जागांसाठी रणधुमाळी सुरू झाली अाहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक अाहेत. पालिकेतील सत्ताधारी खाविअा अर्थात शिवसेनेच्यावतीने अद्याप मुलाखती पूर्ण झालेल्या नाहीत. भाजपकडे जागांपेक्षा चारपट उमेदवारांची संख्या अाहे. अशा परिस्थितीत उमेदवारी द्यायची तरी कुणाला, असा प्रश्न नेतृत्वासमाेर उभा ठाकला अाहे. दाेन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहत असल्याची स्थिती असून सत्ता नाही मिळाली तरी चालेल पण युती नकाे, असाच सूर अाजही व्यक्त हाेत अाहे. एकंदर नेत्यांच्या भूमिकेलाही कार्यकर्ते नाकारत असल्याची परिस्थिती जळगावच्या राजकारणात अनुभवास येत अाहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी 'दिव्य मराठी' कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या चर्चासत्राचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अामदार सुरेश भाेळे तसेच खाविअाचे गटनेते सुनील महाजन यांनी युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. अाम्ही संघटनेच्या पातळीवर सर्व जागा लढण्याच्या तयारी असल्याचे सांगत स्वबळाचा नारा दिला अाहे. त्यामुळे भाजप व शिवसेनेच्या युतीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चा अाणि प्रत्यक्षात असलेले राजकीय वातावरण पाहता शेवटच्या क्षणी ही संभाव्य युती फिस्कटण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. 


मिशन फिफ्टी प्लसचे नियाेजन 
भाजपच्या बैठकीत सहा महिन्यांपूर्वीच 'फिफ्टी प्लस'चा निर्णय घेण्यात अाला हाेता. केंद्रात व राज्यात सत्ता मिळाल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थात भाजपने झेंडा फडकवला अाहे. त्यामुळे भाजप जळगावात स्वबळावर का लढत नाही, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत अाहेत. भाजपचे ९० टक्के कार्यकर्ते युती करण्याच्या विराेधात अाहेत. 


पालिका निवडणुकीसाठी पहिला अर्ज दाखल 
महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला. यंदाच्या निवडणुकीत पहिला अर्ज नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी दाखल करत सुरुवात केली अाहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून येत्या पाच दिवसांत अर्जांचा पाऊस पडण्याची शक्यता अाहे. पालिकेच्या निवडणुकीत प्रशासन सज्ज झालेले असताना पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल न झाल्याने सर्वत्र शांतता हाेती. मात्र, दुसऱ्याच दिवशी विचारपूस करण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढली हाेती. दरम्यान गुरुवारी दुपारी प्रभाग २ ब मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या अारक्षित जागेसाठी नवनाथ दारकुंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गत निवडणुकीतही दारकुंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली हाेती. तीन वर्षांपासून भाजपशी जवळीक अालेल्या दारकंुडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने चर्चांना सुरुवात झाली अाहे. 


शिवसेनेसाठी अाजपासून दाेन दिवस मुलाखती 
महापालिका निवडणुकीसाठी भाजपपाठाेपाठ खाविअा अर्थात शिवसेनेच्या वतीने अाजपासून दाेन दिवस मुलाखती घेण्यात येणार अाहेत. खान्देश काॅम्प्लेक्स येथील खाविअाच्या कार्यालयात यानिमित्ताने शुक्रवार व शनिवारी गर्दी पाहायला मिळणार अाहे. भाजप व शिवसेनेच्या युतीबाबत पुन्हा अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले अाहे. भाजपने ७५ जागांसाठी २७३ जणांच्या मुलाखती घेतल्या. एका जागेसाठी ४ ते ५ जणांनी दावा केला अाहे. या संपूर्ण प्रक्रियेत मागे राहिलेल्या खाविअा अर्थात शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व ज्यांनी अर्ज भरून उमेदवारीची मागणी केली अाहे, अशा उमेदवारांच्या मुलाखती ६ राेजी सकाळी ११ वाजेपासून घेण्यात येणार अाहेत. मुलाखतींचा कार्यक्रम खाविअाच्या खान्देश मिल शाॅपिंग काॅम्प्लेक्स येथे हाेणार अाहे. ६ राेजी प्रभाग क्रमांक १ ते ९ साठी तर ७ राेजी प्रभाग क्रमांक १० ते १९ साठी मुलाखती घेतल्या जाणार अाहेत. खाविअाचे अध्यक्ष रमेश जैन, शिवसेना अामदार प्रा. चंद्रकांत साेनवणे, महापाैर ललित काेल्हे, माजी महापाैर नितीन लढ्ढा, माजी महापाैर जयश्री धांडे, गटनेते सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे व करीम सालार यांचे पॅनल मुलाखत घेणार अाहे.