आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत दिवसभरात ६१५पैकी फक्त २१५ अर्जांची छाननी पूर्ण; ६३ ठरले अवैध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल ६१५ उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच हाेती. सकाळी ११ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत ७ प्रभागांतील २१५ अर्जांची छाननी झाली. यात १५२ अर्ज वैध ठरले अाहेत. तर ६३ अर्ज वेगवेगळ्या कारणांमुळे अवैध ठरवण्यात अाले. उर्वरित १२ प्रभागांतील ४०० उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवारी पूर्ण हाेण्याची शक्यता अाहे. पहिल्यांदाच नव्हे तर वर्षानुवर्षे निवडणुकींचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाही अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, ११ हरकतींमुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांची चांगली पंचाईत झाली अाहे. 


महापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ थांबल्यानंतर अाता स्वबळावर लढाईसाठी रणनीती अाखली जात अाहे. त्यापूर्वी छाननीच्या युद्धात काेण टिकते? याकडे सगळ्यांचे लक्ष हाेते. गुरुवारी महापालिकेच्या पाचव्या व सातव्या मजल्यावर दाखल उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाली. 


१७ जुलै : उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठीची अंतिम मुदत 
१८ जुलै : निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी करणे 
१ अाॅगस्ट : सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान 
३ अाॅगस्ट : सकाळी १० वाजेपासून मतमाेजणी प्रक्रीयेस सुरुवात करणे 
६ अाॅगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे 


प्रक्रियेत एकसारखेपणा नाही 
सतरा मजलीच्या दुसऱ्या व पाचव्या मजल्यावर प्रभागनिहाय अर्ज छाननी सुरू होती. परंतु, या प्रक्रियेत एकसारखेपणा नसल्याचे भाजपचे सरचिटणीस विशाल त्रिपाठी म्हणाले. दुसऱ्या मजल्यावर अ, ब, क, ड यानुसार एकेका उमेदवाराला अर्जाची छाननी करण्यासाठी बोलावले जात होते. पाचव्या मजल्यावर मात्र, सर्वच गटांसाठी एकदम बोलावले जात हाेते. 

 

अर्ज अवैधतेचे मुख्य कारण 
- निवडणुकीचा खर्च सादर न करणे 
- दाेन अर्जांवर एकच सुचक, अनुमाेदक 
- नामनिर्देशनपत्राला एबी फाॅर्म न जाेडणे 
- जाेडपत्र न देणे, थकबाकीदार असणे 
- शपथपत्र, घाेषणा पत्रावर स्वाक्षरी नसणे 


काेल्हे खंडपीठात धाव घेणार 
प्रभाग १३ व १४मधून राष्ट्रवादीचे मुविकाेराज काेल्हे यांचा अर्ज बाद ठरवण्यात अाला. पाेटनिवडणुकीत काेल्हे यांनी सीमा भाेळे यांचेविरुद्ध अर्ज दाखल केला हाेता. परंतु, ती निवडणूक बिनविराेध झाली हाेती. काेल्हेंनी त्या काळातील खर्चाचा हिशाेब दिला नसल्याने ते तीन वर्षांसाठी अपात्र अाहेत. हाच मुद्दा छाननीत पुढे अाला. खंडपीठात धाव घेऊ, असे त्यांनी सांगितले. 


एबी फाॅर्म चुकले 
अनुभव असतानाही राजकीय पक्षांकडून एबी फाॅर्मवर वाॅर्डाचा क्रमांक लिहिताना चुुका झाल्याचे उघडकीस अाले. उमेदवारांची घाेषणा करताना 'क' व 'ड'चा उल्लेख केला. परंतु, एबी फाॅर्ममध्ये मात्र वेगळेच लिहिले. त्यामुळेही अर्ज बाद हाेण्याची भीती निर्माण झाली हाेती. प्रभाग क्रमांक ६ मधील 'ब' व 'क' मध्ये अॅड. शुुचिता हाडा यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या एबी फाॅर्ममध्ये खाडाखाेड असल्याची हरकत घेतली हाेती. परंतु, उमेदवारांना निवडणूक लढण्यापासून वंचित ठेवता येणार नाही; या मुद्द्यावर त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात अाले. माजी नगरसेविका मंगला चाैधरींच्या अर्जासंदर्भातील मंगला पाटील यांनी घेतलेली हरकत मात्र, फेटाळण्यात अाली. 

बातम्या आणखी आहेत...