आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाजी-माजी मंत्र्यांचा मतदान केंद्राबाहेर तीन तास ठिय्या; शेवटच्या टप्प्यात पैसे वाटपावरुन वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी साेमवारी जिल्ह्यात मतदान झाले. तब्बल १६ उमेदवार रिंगणात असलेली ही निवडणूक प्रथमच ग्रामपंचायतींपेक्षाही चुरशीची झाली. जळगावातील ४ केंद्रांवर उमेदवारांचे प्रतिनिधी केंद्रबाहेरच मतदारांवर नजर ठेवून हाेते. विशेष म्हणजे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर तब्बल तीन तास मतदान केंद्राबाहेर ठिय्या मांडून बसले हाेते. दरम्यान, केंद्रावर तगडा पाेलिस बंदाेबस्त असताना देखील मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात केंद्रावर वाद झाल्याने तणाव निर्माण झाला हाेता. अरेरावी, धक्काबुक्की, पैशांचे वाटप अाणि थेट पाेलिस कारवाईपर्यंत प्रकरण गेल्याने ही निवडणूक वादाची ठरली. 


विधान परिषदेत बहुमतासाठी सर्वच पक्षांनी विधान परिषदेवर लक्ष केंद्रित केल्याने भाजपने ही जागा विशेष प्रतिष्ठेची केली. काँग्रेस-राष्ट्रवादी अाणि शिवसेनेने देखील या जागेसाठी संपूर्ण ताकद लावली हाेती. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या अाठवड्यापासून पैठणी, सफारी अाणि थेट पैसे वाटपाचे कार्यक्रम सुरू हाेते. सर्व उमेदवार जाेमात असल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी शिक्षक उमेदवारांचे प्रतिनिधी थांबून हाेते. भाजप उमेदवाराची जबाबदारी असलेले पालघर फेम जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शहरातील अामदार सुरेश भाेळे कार्यकर्त्यांसह दुपारी २ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अार. अार. विद्यालयातील केंद्राबाहेर पूर्ण वेळ बसून हाेते. माजी मंत्री गुलाबराव देवकर देखील काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून केंद्राबाहेर थांबून हाेते. जळगावचे उमेदवार शालिग्राम भिरूड हे देखील समर्थकांसह केंद्रावर थांबून हाेते. 


मतदानाची टक्केवारी 
जिल्ह्यातील २१ मतदान केंद्रावर ९१.८९ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात अमळनेर केंद्रावर ९६.१५ टक्के, चोपडा ९४ टक्के, यावल ९५.२० टक्के, रावेर ९३.३८ टक्के, मुक्ताईनगर ९३.५७ टक्के, बोदवड ९६.६८ टक्के, भुसावळ ९१ टक्के, जळगाव ८२ टक्के, धरणगाव ९८ टक्के, एरंडोल ९२.८२ टक्के, पारोळा ९५.९१ टक्के, भडगाव ९५ टक्के, चाळीसगाव ९७ टक्के, पाचोरा ९०.४८ टक्के आणि जामनेर केंद्रावर ९५. ३९ टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १२०५६ इतके मतदार होते. यात पुरुष मतदार ९३६३ तर स्त्री मतदार २६९३ हाेते. यापैकी ९३ टक्के पुरुष मतदारांनी तर ८७.७५ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भामरे यांनी सांगितले. 


सायंकाळी भरला पैशांचा बाजार 
सकाळी अाणि दुपारच्या टप्प्यात मतदानाचा टक्का ३० पेक्षा पुढे जात नव्हता. सायंकाळच्या टप्प्यात थेट केंद्रावरच पैशांचा बाजार भरला. याचवेळी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये पैसे वाटपावरून राडा झाला. पाेलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. दरम्यान, मतदानाची वेळ संपल्यानंतर उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वादाची ठिणगी कायम हाेती. 

बातम्या आणखी आहेत...