आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारकुनाचा मुलगा ‘भाभा’त शास्त्रज्ञ; अमळनेरच्या मयूर पाटीलला सुवर्णपदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या एका दुकानावर कारकुनी काम करणाऱ्या नोकराचा मुलगा मयूर पाटील हा भाभा अणू संशोधन केंद्रात संशोधक झाला आहे. त्याने नुकतेच मोलाच्या संशोधनासाठी दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे.  मयूर भाभा संशोधन केंद्राच्या ‘सेपरेशन ऑफ अक्टीनाइड फ्रॉम स्पेंट फ्युएल अँड आउटस्टँडींग केमिकल सायन्स’ या विषयावरील संशोधन चमूत कार्यरत होता. या संशोधनाबद्दल केंद्र शासनाने त्या चमूतील प्रत्येक सदस्याचा २५ ग्रँमचे सुवर्णपदक देऊन गौरव केला होता. 


भाभा रिसर्च केंद्राचे संचालक कमलेश नीलकंठ व्यास व जैवतंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय सचिव कृष्णस्वामी विजय राघवन यांच्या हस्ते त्यास सुवर्णपदक मिळाले आहे. मयूरचे कुटुंबीय मुळचे शिरपूर तालुक्यातील करवंद या गावचे. बऱ्याच वर्षांपूर्वी गिरणीवर काम करण्यासाठी वडील भगवान यशवंत पाटील यांनी अमळनेर गाठले. मात्र, गिरणी बंद पडल्याने त्यांच्यावर मोठे संकट उभे राहीले.  त्यामुळे ते दुकानावर नोकर म्हणून कामास लागले. भगवान आणि पत्नी शोभा यांना मयूर, विशाल, राहूल नामक तीन अपत्ये आहेत. बिकट परिस्थितीतही त्यांनी तिघांचेही 
शिक्षण केले.

 

असा घडला मयूर
मयूरने अमळनेरच्या सानेगुरुजी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. प्रताप महाविद्यालयातून रसायनशास्त्रात बी.एसस्सी केली. या दरम्यान त्याला माजी प्राचार्य व नॅनो संशोधक डॉ.एल.ए.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. नंतर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून त्याने एम.एस्सीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २००९ मध्ये त्याने भाभा अणु संशोधन केंद्राची परीक्षा उत्तीर्ण केली आणि सध्या तिथे संशोधक आहे. आता तो शास्त्रज्ञ झाला आहे. आज मयूरचे कुटुंब स्वतःच्या हक्काच्या घरात राहत आहे.

 

स्वप्नवत कार्य

अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना माझा मुलगा एवढा चमत्कार करेल, असे स्वप्नात ही वाटले नव्हते. मी आजही फावल्या वेळात नोकराचे काम करीत आहे. अशा परिस्थितीवर मात करुन त्याने मिळवलेल्या यशाचे मला कौतुक आहे. 
-भगवान पाटील, वडी

बातम्या आणखी आहेत...