आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष विचलित करुन कारमध्ये लॅपटॉप चाेरी; रस्त्यावर पैसे पडल्याचे सांगून केली दिशाभूल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कार चालकाला पैसे पडल्याचे सांगून दोन भामट्यांनी कारमधील दोन लॅपटॉप, वायफाय, हार्ड डिस्क व इतर वस्तू लांबवल्या. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम चौकात घडली आहे. या प्रकरणी संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांना रस्त्यावर पैसे टाकल्याचे सांगून लूट करण्याची ही चौथी घटना आहे. 


अशोक बिल्डकॉन कंपनीचे विभागीय व्यवस्थापक पी. बी. नलावडे, सुरक्षा अधिकारी संजय धोंडगे (रा. सटाणा) व अभियंता विजय नंदनवार (रा.नाशिक) हे कारने (क्रमांक एमएच-१५, बीएक्स ७०९४)कामानिमित्त जळगाव येथे आले होते. नलावडे व धोंडगे कामगारांच्या परवानगीच्या कामानिमित्त कामगार आयुक्त कार्यालयात गेलेले होते. रावटर दुरुस्त करावयाचा असल्याने नंदनवार हे चालक सिध्दार्थ पांडे यांच्यासह स्टेडिअम चौक परिसरात मोबाइल सिमकार्ड कंपनीच्या कार्यालयात गेलेले हाेते. नंदनवार कार्यालयात गेल्यानंतर चालक पांडे हे कारमध्येच बसलेले होते. सकाळी ११.३० वाजता एक युवक त्यांच्याजवळ आला. तुमचे पैसे खाली पडले, असे सांगून त्याने चालकाचे लक्ष विचलित केले. त्यामुळे चालक दरवाजा उघडून कारखाली उतरत असताना दोन चोरट्यांनी कारमधील दोन लॅपटॉप, हार्ड डिस्क, वायफाय मोडम, अशोका बिल्डकॉन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, वाहनाचे मूळ कागदपत्र, चेकबुक चोरून नेले. याप्रकरणी नंदनवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले. तसेच चालकाने केलेल्या वर्णनावरून संशयिताचे रेखाचित्रही तयार केले असून पोलिस भामट्याचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...