आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेशबाबाच्या घरात सापडले बिबट्याचे कातडे, हरणाची शिंगे; २ जुलैपर्यंत सुनावण्यात पोलिस कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- समतानगरातील नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी संशयित आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा याच्या घरात बिबट्याची कातडी व हरणाच्या शिंगासह सर्व मनोकामना सिद्धीयंत्र, मंत्र, तंत्र व टोटके नावाचे पुस्तक मिळून आले आहे. त्यामुळे तपासाला पुन्हा नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, आदेशबाबाने गुन्ह्याची अद्याप कबुली दिली नसून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


समतानगरातील एका टेकडीवर १३ जून रोजी सकाळी ७ वाजता तिचा अर्धनग्न अवस्थेत बालिकेच्या मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, या बालिकेच्या केसांचे क्लचर आदेशबाबा याच्या अंगणात सापडल्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी आदेशबाबावर संशय घेतला होता. हे क्लचर देखील पोलिसांनी जप्त केले आहे. आदेशबाबा हा घटनेच्या रात्री बेपत्ता झाल्यामुळे त्याच्यावर संशय अधिकच बळावला होता. तर अादेशबाबाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी १३ दिवसांत त्याच्या घराच्या झडतीसह परिसरातील काही तरुणांची देखील चौकशी केली. आदेशबाबासह काही तरुणांचे डीएनए नमुने घेण्यात अाले आहेत. दरम्यान, मंगळवारी अादेशबाबाला न्यायालयात हजर केले होते. सरकारपक्षाचे वकील केतन ढाके व पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांनी घटनाक्रम व घटनेचे गांभीर्य सांगितले. तसेच आदेशबाबाला ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती त्यांनी केली. तर बचावपक्षाचे वकील विजय दर्जी यांनी आदेशबाबा जखमी असून त्याला उपचाराची गरज आहे. वारंवार रुग्णालयात न्यावे लागणार असल्यामुळे कमीत-कमी पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? असा प्रश्न न्यायालयाने आदेशबाबास विचारला होता. त्यावर आपली काहीच तक्रार नसल्याचे उत्तर त्याने दिले. सुनावणीअंती न्यायालयाने त्यास ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 


विभूती देऊन आजार बरे करण्याचा दावा 
आक्षेपार्ह वस्तू आढळल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे. आपण तंत्र-मंत्र करत नसून केवळ विभुती देऊन लोकांचे आजार बरे करत असल्याची माहिती आदेशबाबा याने दिली आहे. तर हरणाचे शिंग व बिबट्याची कातडी आपल्या गुरूकडून आणली असल्याचे त्याचे म्हणने आहे. 


तांत्रिक तपासावर भर 
पाेलिसांनी तांत्रिक तपासावरदेखील भर दिला आहे. आदेशबाबाच्या रक्त, केस, नखांचे नमुने घेऊन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पीडित मुलीवर अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आदेशबाबाचे डीएनए नमुने हा देखील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. 


अघोरी कृत्य करत असल्याची शक्यता 
गेल्या १३ दिवसांपासून आदेशबाबा पोलिसांच्या ताब्यात आहे. या काळात तपास अधिकाऱ्यांनी त्याच्या घराचा कोपरा न कोपरा ढुंढाळला. त्यात काही आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या अाहेत. यात विशेष म्हणजे बिबट्याची कातडी, हरणाची दोन शिंगे व मनोकामना सिद्धीयंत्र, मंत्र-तंत्र व टोटके नावांच्या पुस्तकांचा समावेश आहे. या वस्तुंवरून आदेशबाबा तंत्र-मंत्राच्या बहाण्याने लोकांची लुबाडणूक करत असावा किंवा जादुटोणा करुन फसवणूक करत असल्याच्या बाबी समोर येत आहेत. या शिवाय ३५ सेंटिमीटर लांबीचा लोखंडी सुरा, दीड फूट लांबीची लोखंडी गुप्ती, गांजा ओढण्याची चिलम, त्याच्या हस्ताक्षरात असलेल्या दोन डायऱ्या, पीडित मुलीचा मृतदेह ज्या पोत्यात आढळून आला होता त्याच ठिकाणी एक माचिसचे कव्हर सापडले आहे, या कव्हरच्या मागे आदेशबाबाच्या हस्ताक्षरात किरण अहिर असे नाव पेनाने लिहिले आहे. एक कॅलेंडर डायरी असून त्यात 'अासन लगाने वाला मंत्र' असे लिहिलेले आहे. या वस्तू ओक्षपार्ह असल्यामुळे पोलिस तपासला गती देखील मिळाली आहे. तसेच आदेशबाबा अघोरी कृत्य करत असल्याची शक्यता वाढली आहे. याशिवाय पीडित मुलगी व आदेशबाबाच्या अंगावरील कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...