आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा हत्‍याकांड: पाचव्‍या दिवशीही गावात सर्वत्र शांतता, वृद्धांचे हाल; संरक्षण राज्‍यमंत्र्यांनी दिली भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर- 5 भिक्षुकांच्या हत्याकांडानंतर राईनपाडा (ता. साक्री) येथे कायदा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पाचव्या दिवशीही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्‍यात आला आहे. दरम्यान आज दुपारी देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज 12 वाजता घटनास्थळाची पाहणी केली. प्रत्यक्षदर्शींशी चर्चा करून त्‍यांनी घटनेबद्दल जाणून घेतले. 

 

यावेळी माजी पंचायत समिती सदस्‍य सखाराम महिपत पवार यांनी, 'आपण जमावास शांत राहण्‍याचे व 5 भिक्षुकांना न मारण्‍याचे आवाहन केले होते. मात्र उलट जमावाने मलाही मारहाण केली', अशी माहिती सुभाष भामरेंना दिली. राईनपाड्यात अद्यापही सर्वत्र शांतता असून बहुतेक घरांना कुलूपच असल्‍याचे दिसून आले. तर हत्याकांडाच्या घटनेनंतर गावातील पुरुष मंडळींनी मुलाबाळांसह गावातून पोबारा केला असून गावातील वृद्ध त्यांच्या परिवाराच्या प्रतिक्षेत आहेत.

 

वृद्धांना मिळाली खाकीची साथ

हत्‍याकांडाच्‍या घटनेनंतर गावात सर्वत्र शांतता आहे. अनेक वृद्धांच्‍या घरी जेवणाचे अतोनात हाल दिसून आले. यामुळे पोलिसांनी गुरुवारी त्‍यांना जेवणाची व्यवस्था करून दिल्याने जिवंतपणी स्वतःच्या घरी नरक यातना भोगणाऱ्या वृद्धांना दिलासा मिळाला आहे.


सुभाष भामरेंनी केले पोलिस दुरक्षेत्र केंद्राचे उद्घाटन 
दरम्यान राईनपाडा येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहोड पोलीस दूरक्षेत्र केंद्राचे उद्घाटन आज संरक्षण राज्‍यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.  त्‍यांनी या केंद्राची पाहणी केली व रोहोड परिसरातील पाड्यांची भौगोलिक परिस्थिती जाणून घेऊन घटनेच्या तपासाबाबत पोलिसांकडून माहिती घेतली. 


आतापर्यंत या हत्याकांडातील प्रमुख 25 संशयिताना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित सर्च संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांचे 5 पथक रवाना करण्‍यात आले आहेत. यावेळी आरोपींचा शोध घेऊन त्यांना शासन होण्यासाठी नागरिकांनीही पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.सुभाष भामरे यांनी केले आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, रोहोडचे सरपंच हिम्मत साबळे, राईनपाड्याचे ग्रामपंचायत सदस्य विश्वास गांगुर्डे, भाजपचे वसंतराव बच्छाव, संजय अहिरराव, मोतीलाल पोतदार, प्रमोद गांगुर्डे उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...