आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीची तस्करी करून लावले लग्न, आईने अवघ्या 80 हजार रुपयात केला सौदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मालेगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईस ८० हजार रुपये देऊन मुलीचे बेकायदा लग्न लावण्याचा गंभीर प्रकार ६ मे राजी रात्री एका रिक्षाचालकाच्या सतर्कतेने उघडकीस आला होता. संशयितांनी केवळ एका स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र लिहून लग्न लावण्याचा घाट रचला होता. याप्रकरणी बालगृहाच्या समितीसमोर चौकशी होऊन   अखेर शनिवारी मुलीच्या आईसह आठ जणांवर मानवी तस्करी व बेकायदेशीररीत्या अल्पवयीन मुलीचे विवाह लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


शेख फारुख शेख अल्लाउद्दीन (रा. मालेगाव), जिगर पिंजारी (रा. मास्टर कॉलनी, जळगाव), सरफराज राठोड व नजमा राठोड (रा.शिवाजीनगर, जळगाव), भानुबाई हासम शहा शामदार, हासन शहा जुम्मा शहा, श्यामदार व धर्मेश नटवरलाल चुडसामा (तिघे रा.राजकोठ) व मुलीची आई या अाठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव शहरातील १५ वर्षीय मुलीच्या मोठ्या बहिणीचे लग्न भुसावळातील तरुणाशी झाले आहे. त्यामुळे भुसावळातच वाहनचालक धर्मेश नटवरलाल चुडासामा (वय ३२, रा.राजकोट) हा एक चांगला मुलगा असून त्याच्यासोबत लहान मुलीचे लग्न लावून द्या, असा प्रस्ताव मध्यस्थी आजम शाह जुम्मा शाह (वय ४५, रा.राजकोट), भानू हसन शहा (वय ५२, रा.राजकोट) यांनी मुलीच्या आईकडे आणला होता. त्यानुसार जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातील एक मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेची मदत घेतली. मुलीच्या आईस ८० हजार रुपये दिले होते. 


ठरल्यानुसार ५ मे रोजी नवरदेव मुलगा धर्मेश, मध्यस्थ आजम शाह, भानू शहा यांनी अल्पवयीन मुलीस मालेगाव येथून ताब्यात घेतले. त्यानंतर जळगावात एका स्टॅम्प विक्रेत्यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्पवर लग्नाचे संमतीपत्र लिहून घेतले. हे संमतीपत्र मुलीस वाचण्यास न देताच तिच्या सह्या घेतल्या. केवळ या संमतीपत्राचा आधार घेत त्यांनी लग्न लावल्याचा बनाव केला होता. याप्रकरणी चौकशीअंती बालनिरीक्षण गृहातील अधीक्षिका जयश्री पाटील यांच्या फिर्यादीवरून शनिवारी मुलीच्या आईसह आठ जणांविरुद्ध मानवी तस्करी व बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


रिक्षाचालकाची सतर्कता 
संशयित सर्वजण ६ मे रोजी जळगावात थांबले होते. ६ मे रोजी रात्री ११ वाजता एका रिक्षातून मुलीस बसस्थानकाकडे घेऊन आले. ती प्रचंड घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखून रिक्षाचालकाने सतर्कता दाखवत जिल्हापेठ पोलिसांना बोलावून घेत सर्वांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांची चौकशी करून मुलीस बालनिरीक्षणगृहात पाठवले होते. तेथील समितीने चौकशी केली. 

बातम्या आणखी आहेत...