आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मुलांचे अपहरण करणारी तरुणी मैत्रिणीच्या शोधात आली थेट जळगावात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव शहरात असलेल्या एका मैत्रिणीचा शोध घेत मुंबईतील मालाड परिसरातील १९ वर्षीय तरुणी बुधवारी मध्यरात्री शहर पोलिस ठाण्यात आली हाेती. तिच्यावर मुंबईत दोन वेळा लहान मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल असून, यात ती डोंगरीच्या बालसुधारगृहातदेखील राहून आली आहे, अशी माहिती पोलिसांना चौकशी केल्यानंतर मिळाली. तिला गुरुवारी दुपारी १२ वाजता तिच्या बहिणीच्या ताब्यात देण्यात आले.

 

शहर पोलिस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजता खांद्यावर सॅक लावलेली १९ वर्षाची तरुणी हीना (नाव बदललेले) आली. रेल्वेने प्रवास करून ती जळगावात पोहोचली होती. आपली पूजा नावाची मैत्रिण जळगावात राहते, तिला शोधण्यासाठी आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तसेच पूजाचा पत्तादेखील विचारला; परंतु पोलिसांना याबाबतीत माहिती नसल्यामुळे त्यांनी माहिती दिली नाही. ठाणे अंमलदार असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक चऱ्हाटे, नाइट ड्यूटीला असलेले मोहसीन बिरासदार, दुष्यंत खैरनार व संजय भालेराव यांना तिच्यावर संशय आला. त्यांनी तिच्या सॅकची तपासणी केली. यात एक ड्रेस, टुथपेस्ट, अंथरुण असल्याचे आढळून आले. तिची चौकशी केली असता तिने चुकीचे नाव सांगितले. अखेर पोलिसांचा संशय जास्तच वाढल्याने त्यांनी तिचा मोबाइल तपासला. त्यात आठ-दहा मोबाइल क्रमांक सेव्ह केलेेले होते. त्यातील 'मोम' नावाने सेव्ह केलेल्या मोबाइल क्रमांकावर फोन केला असता तो तिच्या बहिणीचा नंबर असल्याचे समोर आले.

 

पोलिसांनी तिच्या बहिणीकडे चौकशी केली असता हीना ही तीन-चार वर्षांपासून मुंबईला लहान मुलांचे अपहरण करत हाेती. तिच्यावर अपहरणाचे दोन गुन्हे दाखल अाहेत. अल्पवयीन असताना त्या गुन्ह्यांमध्ये तिला डोंगरी (मुंबई) येथील बाल सुधारगृहात ठेवले होते. गेल्या वर्षीच तिची सुटका झाली असून आता अनेक दिवस घराबाहेर असते. अशी धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हीनाची कसून चौकशी केल्यानंतर तिने खरे नाव अाणि पत्ता सांगितला.


तसेच तिच्या बहिणीने हीनाला एकटीला सोडू नका, अशी विनंती पोलिसांना केली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी ११ वाजता हीनाची बहीण जळगावात पोहोचली. तिच्या ताब्यात हीनाला देण्यात आले, तशी नोंद पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीवर घेण्यात आली आहे. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे तसेच संशय घेतल्याने हीना जळगावात थांबू शकली नाही.

 

हीनामुळे बहीण झाली त्रस्त
हीनावर दोन गुन्हे दाखल आहेत. आई-वडील नसलेली हीना ही मोठ्या बहिणीकडे राहत होती. तिच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे तिच्या बहिणीला देखील त्रास सहन करावा लागत आहे. जळगाव पोलिसांनी हीनास सोडून दिले असते तर ती मुंबईत न जाता पुन्हा दुसऱ्या शहरात जाऊन राहिली असती. म्हणूनच गुरुवारी तिच्या बहिणीने जळगावात येऊन तिचा ताबा घेतला.

 

बातम्या आणखी आहेत...