आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतिपत्रिका अन् क्रीडा गुणांमुळे वाढले टक्के; १६ शाळांमधील १७२ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा अधिक गुण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दहावीचा अाॅनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात शहराचा निकाल ९१.६८ टक्के लागला. ६६ शाळांपैकी १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या १२ एवढी अाहे. गेल्या वर्षी ती नऊ हाेती. १६ शाळांच्या १७२ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक टक्के मिळाले अाहेत. वैयक्तिक गुणांची टक्केवारी वाढण्यामागे गेल्या दाेन वर्षांपासून बाेर्डाने स्वीकारलेले कृतिपत्रिका पॅटर्न व खेळांच्या गुणांची सवलत ही दाेन प्रमुख कारणे असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले. दरम्यान, शानभाग शाळेची विशाखा कुलकर्णी हिला सर्वाधिक ९९.२० टक्के गुण मिळाले. 


दहावीला यंदा शहरातून ७ हजार ३१ विद्यार्थी बसले हाेते. त्यापैकी ६ हजार ४४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांचा ९०.१९ तर मुलींचा ९३.६० टक्के निकाल लागला. यंदाही मुलीच सरस ठरल्या अाहेत. यंदा ८० ते ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले अाहे. या मागे बाेर्डाने वस्तुनिष्ठ प्रश्नांचा पॅटर्न स्वीकारला असल्याने हिंदी, इंग्रजी, मराठी व संस्कृतमध्ये ९२ ते ९८ गुण मिळवणाऱ्यांचे प्रमाण अधिक अाहे. 


पुढील वर्षी घटणार टक्का 
येत्या शैक्षणिक वर्षांपासून १० परीक्षेचा २०-८० हा पॅटर्न बदलणार अाहे. गणित व विज्ञान या विषयांसाठी २०-८० असा पॅर्टन असेल. तर उर्वरित विषयांसाठीची प्रश्नपत्रिका ही १०० गुणांची असेल. त्यामुळे नव्या पॅटर्ननुसारच्या परीक्षा पध्दतीमुळे माेठ्या प्रमाणावर ९० टक्क्यांहून जास्त गुण मिळवणाऱ्यांच्या संख्येचा फुगवटा कमी हाेईल. 


कृति पत्रिकेमुळे गुणांचा फुगवटा वाढला : भंडारी 
स्पर्धा परीक्षेसाठी शालेय शिक्षणातच तयारी करण्याच्या दृष्टीने शिक्षण मंडळाने गेल्या दाेन वर्षांपासून कृतिपत्रिका कार्यक्रम राबवला अाहे. सुमारे २० वर्षांपूर्वी ही कृतिपत्रिका केवळ इंग्रजीसाठी हाेती. ती अाता सर्वच विषयांसाठी अवलंबली अाहे. त्यामुळे ही टक्केवारी वाढली. मात्र, ती घातक असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकार मानतात. या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांचे स्पष्टीकरणात्मक लिखाण करणे बंद हाेऊन वस्तुनिष्ठ पध्दतीने व वैकल्पिक पद्धतीने उत्तरे लिहिण्याची सवय जडते, असे शालेय शिक्षणतज्ज्ञ तथा केसीईचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांचे मत अाहे. 


या शाळांचा निकाल १०० टक्के 
रायसाेनी इंग्लिश मीडियम हायस्कूल, प्राेगेसिव्ह इंग्लिश स्कूल, डी. के. भाेईटे माध्यमिक विद्यालय, संत टेरेसा इंग्लिश स्कूल, उज्ज्वल इंग्लिश स्कूल, बी. यु. एन. रायसाेनी इंग्लिश स्कूल, नगरपालिका माध्यमिक विद्यालय, जिल्हापेठ, अादर्श सिंधी हायस्कूल, बी. यू. एन. रायसाेनी मराठी विद्यालय, माध्यमिक विद्यालय, घनश्यामनगर, अलफईज उर्दू हायस्कूल, विद्या इंग्लिश स्कूल, मेहरुण. 


या शाळांच्या विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण 
कै. ब.गाे. शानभाग विद्यालय (६१), ए.टी. झांबरे विद्यालय (३३), ला.ना. सार्वजनिक विद्यालय (१६), बीयूएन रायसाेनी इंग्लिश मीडियम (१०), उज्ज्वल स्प्रायुटर्स (१०), प्राेग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल (८), इकरा उर्दू हायस्कूल, सालार नगर (६), इकरा उर्दू हायस्कूल, सेमी इंग्लिश (५), अॅग्लाे उर्दू हायस्कूल (५), बीयूएन रायसाेनी मराठी मीडियम (५), अादर्श सिंधी हायस्कूल (३), या दे पाटील माध्यमिक विद्यालय (३), सेंट टेरेसा हायस्कूल (२), मिल्लत हायस्कूल (२), इकरा शाहिन उर्दू हायस्कूल (२), विद्या इंग्लिश मीडियम स्कूल (१). 


जळगाव शहराचा एकूण निकाल ९१.६८ टक्के 
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत अमळनेर तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९३.५९ टक्के लागला. निकालात हा तालुका अव्वल ठरला. जळगाव महानगर ९१.६८ टक्के मिळवून द्वितीय स्थानावर अाहे. बाेदवडचा निकाल सर्वात कमी अर्थात ७१.१८ टक्के लागला. तालुकानिहाय निकालाची टक्केवारी अशी : अमळनेर (९३.५९), भुसावळ (८७.६७), बाेदवड (७१.१८), भडगाव (९०.९८), चाळीसगाव (८६.२९), चाेपडा (९०.१९), धरणगाव (९०.४५), एरंडाेल (८७.११), जळगाव (७९.०१), जामनेर (८७.५०), मुक्ताईनगर (७८.५६), पाराेळा (९१.६१), पाचाेरा (८७.७३), रावेर (८७.५४), यावल (८९.३७), जळगाव शहरात (९१.६८). जिल्ह्यातील ७६९ शाळांच्या ६० हजार ३५८ विद्यार्थी प्रविष्ठ हाेते. यापैकी ६० हजार २४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३० हजार ११३ मुले तर २२ हजार ९४७ मुली उत्तीर्ण झाल्या. 


क्रीडा गुणामुळे टक्का वाढला : तळवलकर 
गेल्या दाेन वर्षांपासून दहावी बाेर्डाच्या निकालात क्रीडा स्पर्धेतील सहभागाचे २० गुण देणे बंद करण्यात अाले हाेते. मात्र, यंदापासून ते पुन्हा देण्यास सुरुवात झाली अाहे. हे देखील यंदाच्या निकालाचा टक्का वाढवण्यात माेठे कारण अाहे. शासनाने अायाेजित केलेल्या व शासनाच्या परवानगी व नियमानुसार क्रीडा संघटनांनी घेतलेल्या शालेय, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नाेंदवलेल्या खेळाडुंनाच या गुणांचा लाभ झाला असल्याचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते क्रीडाशिक्षक प्रदीप तळवलकर यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...