आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांचे वाहन अपघातात चक्काचूर; एक जागीच ठार .

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील तीन व्यावसायिकांच्या वाहनाला मुुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक प्रशांत राठोड हे ठार झाले. तर अन्य व्यावसायिक तथा मल्ल गिरीश चौधरी व शेखर परदेशी जखमी झाले. मालेगाव तालुक्यातील झोडगे शिवारात हा अपघात झाला. घटनेनंतर राठाेड यांच्या निवासस्थानी गर्दी झाली हाेती. तर तिघांचे निकटवर्तीय मालेगावच्या दिशेने रवाना झाले. 

 

शहरातील प्रथितयश व्यावसायिकांमध्ये उल्लेख हाेणारे गिरीश राजाराम चौधरी, प्रशांत पूनमचंद राठोड, शेखर स्वरूप परदेशी हे तिघे कामानिमित्त नाशिकला गेले होते. परत येत असताना झोडगे गावापासून काही अंतरावर असलेल्या लकी गिल नामक ढाब्याजवळ या व्यावसायिकांच्या कारला (एम एच २०/ बीसी २०९५) प्रवासी वाहतूक करणारे लक्झरी वाहन धडकले. या भीषण अपघातात कार रस्त्यावर उलटली. अधिक रक्तस्रावामुळे गंभीर जखमी झालेले प्रशांत राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर चौधरी व परदेशी दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मालेगाव रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चैनीरोडला लागून असलेल्या राठोड यांच्या घराजवळ गर्दी होऊ लागली. तर तिघा व्यावसायिकांचे नातलग व निकटवर्तीयांनी मालेगावकडे धाव घेतली. 


या घटनेत जखमी झालेले परदेशी यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. तर चौधरी यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. तर दुपारी चार वाजता राठोड यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघाली. त्यात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी सहभागी झाले होते. 


तिघांमध्ये हाेती अतूट मैत्री 
अपघातात गंभीर जखमी झालेले गिरीश चौधरी यांची नामचीन मल्ल म्हणून शहरात ओळख आहे. देवपुरातील एका हॉटेलचे ते मालक आहेत. तर शेखर परदेशी यांचा अाग्रा रोडवर कुल्फी व शीतपेय विक्रीचा व्यवसाय आहे. राठोड, चौधरी व परदेशी यांच्यामध्ये व्यावसायिक संबंधापेक्षा कौटुंबिक व सलोख्याचे संबंध होते. तिघे परस्परांच्या मदतीला धावून जायचे; परंतु अपघातात राठोड हे ठार झाले. तर त्यांचे दोन्ही स्नेही चौधरी व परदेशी हे जखमी झाले. 


व्यवसायात घेतली होती भरारी 
राठोड यांचे काही वर्षांपूर्वी चैनीरोड परिसरात हॉटेल होते. ते बंद करून त्यांनी ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय सुरू केला होता. आपले संबंध, मितभाषी स्वभाव आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी या व्यवसायात भरारी घेतली होती. शिवाय कुटुंबप्रमुख म्हणूनही ते कर्तव्य पार पाडत होते. 


सोशल मीडियावरही श्रद्धांजली 
घटनेनंतर सकाळपासून सोशल मीडिया व्हॉट‌्सअॅपवर अपघाताची माहिती, प्रशांत राठोड यांचे छायाचित्र तसेच अपघातग्रस्त वाहनाचे फोटाे व्हायरल झाले होते. शिवाय राठोड यांना श्रद्धांजलीही वाहिली जात होती. इतरांसाठी मदतीला धावून येणाऱ्या राठोड यांच्याबद्दल संवेदनाही व्यक्त केल्या जात होत्या. घटनेमुळे पाचकंदील-चैनीरोड परिसरातील काही व्यावसायिकांनी आपले व्यवहारही बंद ठेवले होते. 

बातम्या आणखी आहेत...