आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसाठी २३० ऐवजी ३०० किमी पाइपलाइन टाकणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - अमृत योजनेतून यापूर्वी शहरात २३० किमी लांबीची पाइपलाइन टाकली जाणार होती. मात्र, भविष्याचा वेध घेवून अतिरिक्त ७० किमी पाइपलाइन वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण ३०० किमी पाइपलाइनमुळे विस्तारीत भागांनाही पाणीपुरवठा करता येईल, अशी अपेक्षा नगराध्यक्ष रमण भोळे यांनी व्यक्त केली. मामाजी टॉकीज रोडवर अमृत योजनेतून पाइपलाइन कामाला मंगळवारी सुरूवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष भोळे म्हणाले की, शहरात माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे अमृत योजना मंजूर झाली. या कामाला पालिकेने गती दिली आहे. मामाजी टॉकिजचा रस्ता गेल्या दहा वर्षांपासून रखडला होता. मात्र अमृत योजनेच्या पाइपलाइनमुळे हे काम थांबले होते. यामुळे आता या रस्त्यावर पाइपलाइन टाकल्यानंतर ट्रिमिक्स पध्दतीने काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यामुळे आगामी पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही. अमृत योजनेत शहरासाठी स्वतंत्र बंधाऱ्याची उभारणी होणार आहे. सध्या पालिका वापरत असलेला बंधारा रेल्वेच्या मालकीचा असल्याने समस्या निर्माण होतात. पालिकेचा व शहरासाठी स्वतंत्र बंधारा निर्माण झाल्यास पाणीप्रश्न कायम स्वरुपी निकाली निघणार आहे. शहरातील विस्तारीत भाग व आगामी भविष्याचा वेध घेऊन पाइपलाइन टाकली जाणार आहे. यामुळे पूर्वीच्या योजनेनुसार २३० किलोमिटर व सध्या ७० किमी अतिरिक्त कामाचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला मंजुरीची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असल्याने अमृतच्या माध्यमातून तब्बल ३०० किमी पाइपलाइनचे काम पूर्ण केले जाईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, युवराज लोणारी, स्वीकृत नगरसेवक मनोज बियाणी, किरण कोलते, प्रा.दिनेश राठी, निर्मल कोठारी, नगरसेविका सविता मकासरे, मुकेश गुंजाळ, महेंद्रसिंह ठाकूर, अमोल इंगळे, बापू महाजन, प्रकाश बतरा, अॅड.बोधराज चौधरी, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर, मुकेश पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, वसंत पाटील, गिरीश महाजन, देवेंद्र वाणी, प्रमोद सावकारे, परीक्षित बऱ्हाटे, राजू सूर्यवंशी, किशोर पाटील, सतीश सपकाळे, रमेश मकासरे, बापू महाजन आदी उपस्थित होते. 


शहरातील टोळीराज संपवले : रमण भोळे 
शहरातील अमृत योजनेच्या कामांबाबत विरोधकांमधून नेहमी अफवा पसरवल्या जातात. या अफवांचा आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी समाचार घेतला. आम्ही शहरातील टोळीराज संपवून शहराचा विकास केला, असे नगराध्यक्षांनी सांगितले. आमदारांनी विरोधकांनी अमृतचे काम बंद झाल्याची अफवा पसरवून विसंगती निर्माण केल्याचे सांगितले. यासह माजी उपनगरध्यक्ष लोणारी यांनी ज्यांना विकासकामे दिसत नाहीत, त्यांनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करुन घ्यावी, असा सल्ला दिला. 


पाणीबचतीचा सल्ला 
शहरात भूजल पातळी खालावली आहे. हतनूर धरणातही कमी पाणी आहे. यामुळे शहरवासीयांनी पाण्याचा जपून वापर करावा. शहरात बोअरिंग आटल्या असतानाही नासाडी कायम आहे. यामुळे आगामी काळात पाण्याची समस्या अधिक जाणवेल. ही समस्या लक्षात घेता अमृत योजना राबविण्यात येत आहे, असे सांगून आमदार संजय सावकारे यांनी पाण्याची बचतीचा सल्ला दिला. 

बातम्या आणखी आहेत...