आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४ वर्षांपूर्वी सेवेतून बडतर्फे; निकालानंतर प्रतीक्षा, झाेटेंच्या आत्मदहन प्रयत्नाने धावपळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- १४ वर्षांपासून तत्कालीन नगरपालिका व सध्याच्या महापालिकेच्या सेवेतून कमी केलेल्या बबन झाेटे यांनी प्रशासनासमाेर वारंवार खेटे घातले. मात्र, उपयाेग झाला नाही. अखेर कामगार न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. तरी नाेकरीची प्रतीक्षा कायम राहिली. त्यासाठी त्यांनी प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. अांदाेलने केली. एकदा तर अास्थापना विभागप्रमुखांना मारहाणही केली. त्यातूनही दिलासा मिळत नाही म्हटल्यावर मंत्रालयासमाेरच अात्मदहन करण्याचा पवित्रा घेतला. मात्र या घटनेने महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली. मंत्रालयातून तातडीने कागदपत्रे मागवल्यामुळे सकाळपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कागदपत्रे शाेधण्यासाठी एकेका अधिकाऱ्यांची दालने पालथी घालावी लागली. 


महापालिकेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा जाच वाढला अाहे. गेल्या महिन्यात एका निवृत्त कर्मचाऱ्याने उपायुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात राॅकेलची बाटली गळ्यात अडकवून अात्मदहनाचा प्रयत्न केला हाेता. त्यानंतर बबन झाेटे यांनी तर अात्मदहनासाठी थेट मुंबई गाठली. त्यामुळे महापालिकेतील प्रशासनाच्या चालढकलीवरही प्रकाश पडला अाहे. मनपाने सेवेतून कमी केलेले कर्मचारी बबन झोटे यांनी महापालिकेतील मागासवर्गीय कर्मचारी सरळसेवा भरतीची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी केली हाेती. बबन झोटे व निर्मला अहिरे, लक्ष्मी वसावे यांना सन २००१मध्ये सेवेतून कमी केले. याप्रकरणी त्यांनी महापालिकेच्या सेवेत नियुक्त करावे, यासाठी निवेदने दिली. आंदोलने केली. त्याचा उपयाेग झाला नाही. म्हणून सन २०१४मध्ये कामगार न्यायालयात दावाही दाखल केला. त्याचा निकाल या कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागला. मात्र आस्थापना  विभागात विस्कळीत कारभार हाेताे. त्याला एन.पी. सोनार हे जबाबदार अाहेत. त्यांच्या कामाची सीआयडी चौकशी करावी, असे निवेदन झाेटे यांनी मंत्रालयात शासनाकडे दिले होते. एक महिन्यात सीआयडी चौकशी करावी. अन्यथा मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मंत्रालयातून दि. २२ मे रोजी महापालिकेकडे कागदपत्रे मागवण्यात अाली; परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे बबन झोटे यांनी साेमवारी मुंबईत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्याने बबन झोटेला ताब्यात घेतले. बबन झोटे यांनी केलेल्या आत्मदहनाच्या घटनेनंतर मंत्रालयस्तरावरून महापालिकेत माहिती मागविल्यानंतर मनपातील आस्थापना विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. बबन झोटे यांच्या प्रकरणाच्या कागदपत्रांची तपासणी करून त्याची माहिती तत्काळ मंत्रालयात नगरविकास विभागाला पाठवण्यात आली. महापालिकेने न्यायालयाचा निर्णयाची माहिती देऊन बबन झोटे व इतर दोन यांच्या तक्रारीबाबत वस्तुनिष्ठ परिस्थिती अवगत करून उपोषण करू नये अशी विनंती केली होती. बबन झोटे यांची मागणी बेकायदेशीर असल्याचे नगरविकास विभागाला मनपा प्रशासनाने कळविले आहे. 


झोटेंकडून यापूर्वीही आंदोलन 
बबन झोटे यांनी महापालिकेत नियुक्तीसाठी वारंवार महापालिका प्रशासन, विभागीय आयुक्त व थेट मंत्रालयापर्यंत निवेदने व पत्रव्यवहार केलेला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने महापालिका आयुक्तांकडे निवेदने व पत्रव्यवहार केला आहे. तर आयुक्तांच्या दालनाबाहेरही आंदोलन केले आहे. तसेच १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा देणारे निवेदनही दिले होते. 


मनपात उपायुक्तांच्या दालनातही आत्मदहनाचा प्रयत्न
महापालिकेत उपायुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात मागील महिन्यात कालबद्ध पदोन्नतीचा फरक मिळावा यासाठी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले होते. शिवाय गळ्यात रॉकेलची बाटलीही अडकविली होती. तेथेच आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही तत्काळ कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन त्याची तेथेच पाण्याने अंघोळ घातली होती. 

 

महापालिकेने पाठविली ही माहिती 
मनपाने नगरविकास विभागाला माहिती पाठविली. त्यात म्हटले अाहे की, बबन यशवंत झोटे व इतर दाेन यांच्यासह ३३ कर्मचाऱ्यांना शासन आदेशानुसार तत्कालीन नगरपालिकेत कायम आस्थापनेवरील मागासवर्गीय अनुशेष पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती १९९०मध्ये दिली; परंतु या नियुक्तीवर मुख्याधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनतर औरंगाबाद खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग केले. त्यावर नगराध्यक्षांनी पारित केलेल्या आदेशावर चार महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यावर विभागीय आयुक्तांनी तत्कालीन नगराध्यक्षांचे आदेश रद्द ठरवले. तर तत्कालीन नगराध्यक्षांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपिल केले; परंतु त्यावर शासनाकडून आदेश मिळाला नाही. यावर झोटे व इतर दोघांना दि.५ जुलै २००१ रोजी तत्कालीन नगरपालिका असताना सेवेतून कमी करण्यात आले आहे. 

 

निकाल विराेधात 
बबन झोटेंसह दोघा जणांनी कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यात बबन झोटे व दोघांच्या पक्षात निकाल दिला होता. या निकालाविरोधात महापालिकेने गुणवत्तेच्या आधारे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला. तर बबन झोटे यांनी यापूर्वीही विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यासाठी निवेदन दिले होते. 


आस्थापना प्रमुखांना मारहाण 
बबन झोटे यांनी वारंवार आस्थापना विभाग प्रमुख नारायण सोनार यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनीच प्रशासनाला खोटी माहिती दिल्याचे व नियुक्त करून न घेत असल्याचे आरोप करून त्यांची चौकशी करण्याचे पूर्वीही निवेदन दिले होते. तर नारायण सोनार यांना एक चापटही बबन झोटे यांनी महापालिकेत मारली होती. 

बातम्या आणखी आहेत...