आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भादली हत्याकांड: अनैतिक संबंध, शेतजमिनीच्या वादातूनच हत्या; पोलिस तपासाचा निष्कर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव  - खान्देश हादरवून टाकणाऱ्या भादली गावातील भोळे कुटुंबियांच्या हत्याकांडास सोमवार, १९ मार्च रोजी वर्ष पूर्ण होत आहे. १९८ लोकांचे जबाब, ८ जणांची पॉलिग्राफ चाचणी, ५०० लोकांचे कॉल डिटेल्स एवढा प्रचंड तपास होऊनही वर्षभरानंतर भोळे कुटुंबियांचे मारेकरी अद्याप सापडले नसून हत्याकांडाभोवतीचे गूढ वलय कायम आहे.

 

अनैतिक संबंध, शेतजमिनीचा वाद, जादूटोणा आदी एक नव्हे अनेक बाजूंनी पोलिसांनी वर्षभर तपास केल्यानंतर अनैतिक संबंध अथवा शेतजमिनीचा वाद यामागे असू शकतो अशा निष्कर्षापर्यंत पोलिस तपास येऊन पोहोचला अाहे. आता वैज्ञानिक पुरावे डोळ्यासमोर ठेवून मारेकऱ्यांना शोधणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्याकांडास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पोलिस तपास अहवाल प्रथमच 'दिव्य मराठी'च्या वाचकांसाठी.

 

भादली येथील प्रदीप सुरेश भोळे (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (३०), मुलगी दिव्या (७) व मुलगा चेतन (३) यांचा खून करण्यात आला आहे. धारदार शस्त्राने प्रदीप यांच्यावर वार, जखम आहे. याचाच अर्थ प्रदीप व मारेकरी यांच्यात काही वेळ झटापट झाली असावी. संगीता यांच्या डोक्यावर व कानामागे असे दोन वार आहेत. तर दिव्या व चेतन यांच्या डोक्यात वार करून कवटी फोडली आहे. प्रदीप भोळे हे २० मार्च २०१७ पासून भादली गावात चायनीजची गाडी सुरू करणार होते. तर ४ मार्च २०१७ रोजीच त्यांच्या शेताचा व्यवहार होऊन महेश पाटील यांनी ५० हजारांचा धनादेश व ३५ हजार रोख भोळे यांना दिले होते. ही रक्कम भोळेंनी आधीच खर्च केली होती. याच आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी तपासलेल्या संशयितांकडून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत, पण मारेकऱ्यांपर्यंत पोहाेचता आलेले नाही.  


टर्निंग पाॅंइट : दारुचे ३ महिन्यांनंतर सेवन
प्रदीप यांनी घटना घडण्याच्या तीन महिन्यांपूर्वी दारू पिणे बंद केले होते. परंतू, १९ मार्च २०१७ रोजी रात्री १० वाजेनंतर त्यांनी जास्त प्रमाणात दारुचे सेवन केले हाेते. त्याच रात्री हे हत्याकांड घडले. त्यामुळे या मागे पैसा किंवा अनैतिक संबंधांचे कारण असू शकतात. प्रदीप रमेश भोळे यांच्याच सोबत दारु पित असे. परंतु, घटनेच्या दिवशी प्रदीप सोबत कोण होते? दारू बंद केलेली असताना देखील त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू का प्यायली? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळालेली नाही.

 

अनैतिक संबंध
प्रदीप हे गावातील एक महिला व तीच्या विवाहीत मुलीशी मोबाईलवरून बोलत होते. या तिघांच्या कॉल डिटेल्सवरून हे स्पष्ट झाले आहे. विवाहित मुलीलाच प्रदीप यांनी घटनेच्या दिवशी रात्री ९ वाजता अखेरचा कॉल केला आहे. तर मृत संगीता हिच्या बाबतीत संशय व्यक्त करून त्या अनुशंगाने देखील तपासणी करण्यात आली. संगीता हिने १८ मार्चला आरोग्य केंद्रातून आपत्तीजनक वस्तू घेतल्या होत्या; पण घटनेनंतर पोलिसांना घर झडतीमध्ये या वस्तू मिळून आल्या नसल्याने हे देखील एक गूढ आहे.


तक्रार पेटीतून प्राप्त निनावी अर्जाने उडाली खळबळ
गुन्ह्याचा तपास लागत नसतानाच अचानकपणे ४ जानेवारी २०१८ रोजी गावात लावलेल्या तक्रार पेटीतून एक निनावी अर्ज मिळाला होता. यानुसार दीपक खडसे या संशयिताने घटनेच्या काही दिवसानंतर एक तलवार व चॉपर विहीरीत फेकल्याचे अर्जात म्हटले होते. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता दीपक याच्या घरचीच ही हत्यारे असून विनाकारण त्रास होऊ नये म्हणून त्याने विहिरीत फेकून दिल्याचे निष्पन्न झाले. या निनावी अर्जामुळे खळबळ उडाली होती.

 

तिघांकडून लपवालपवी; पॉलिग्राफ टेस्टचा रिपोर्ट
घटनेत अलकाबाई दिनकर भोळे, पंकज दिनकर भोळे, ईश्वर चंद्रकांत भोळे, रमेश बाबुराव भोळे, मीनाबाई रमेश भोळे, दीपक भरत खडसे, प्रदीप भरत खडसे, देविदास बुधा कोळी या आठ जणांची पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली आहे. यातील रमेश भोळे, मीनाबाई भोळे व दीपक खडसे हे तिघे काही तथ्ये लपवत असल्याचे पॉलिग्राफच्या अहवालातून समोर आले आहे. तर आता विनायक उर्फ लहानु प्रभाकर ढाके, महेश उर्फ मदन निवृत्ती खडसे, अशोक लक्ष्मण भोळे, प्रकाश राजाराम पाटील, जयवंत प्रेमचंद नारखेडे व विश्वनाथ कौतिक भोळे यांची ब्रेन फिंगर प्रिंटींग (बीएफपी) व लेयर्ड व्हाईस अॅनालिसिस (एलव्हीए) परीक्षण करण्यासाठी न्यायालयात परवानगी मागण्यात आली आहे.

 

३ आयपीएस अधिकाऱ्यांतर्फे चौकशी
गुन्हा घडल्यानंतर राज्यात खळबळ उडाल्याने मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिस दलावर दबाव वाढला होता. त्या अनुषंगाने तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अप्पर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी नीलोत्पल दास या तिन्ही आयपीएस अधिकाऱ्यांनी महिनाभर दररोज भादली, नशिराबाद आदी ठिकाणी जाऊन चौकशी केली. निम्म्यापेक्षा जास्त जणांचे जबाब त्यांच्याच उपस्थितीत घेण्यात आले आहेत. दरोडा सदृश्य परिस्थिती असल्यामुळे अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा शोध घेण्यात आला. परंतू अद्याप तथ्य समोर आले नाही. या तिघांपैकी सुपेकर, मोक्षदा पाटीलांची नंतर बदली झाली.


जादूटोण्याच्या उद्देशानेही चौकशी
नरबळी किंवा अंधश्रद्धेतून हा अपराध घडला असेल असा अंदाज व्यक्त करून भादलीसह परिसरातील पाच जणांची कसून चौकशी करण्यात आली. या गुन्ह्यात संशयित म्हणून पॉलिग्राफ चाचणी केलेल्या प्रदीप खडसे याला घटनेच्या ३ दिवस आधीपासूनगावात प्रेतात्मे व पूर्वज दिसत असल्याची माहिती तपासात समोर आली होती. या शिवाय संशयित म्हणून चौकशी केलेले रमेश भोळे व प्रदीप खडसे या दोघांच्या कुटुंबात सलोख्याचे संबंध होते. घटनेच्या एक दिवस आधी रमेश भोळे हे कुटुंबासह प्रदीप खडसेच्या घरी झोपण्यास गेले होते. तर घटनेच्या दिवशी प्रदीप खडसे हा रमेश यांच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. रमेश भोळे यांचे मृत प्रदीप भोळे यांच्या घराच्या समोर होते. घटनेच्या दिवशी यांच्या घराच्या परिसरात पथदिवे अचानक बंद झाले होते. तर मृत भोळे यांच्या शेजारी राहणारे ईश्वर भोळे व विनायक ढाके हे दोघे घटनेच्या दिवशी त्याच परिसरात एका घराच्या बाहेर ओट्यावर झोपले होते. रात्री १.३० प्रदीप भोळे हा दारू पिऊन तेथे आला. त्याने दगड मारून ईश्वर व विनायक यांना झोपेतून उठवले होते. यामुळे घटनेशी काही जणांचा प्रत्यक्ष संबंध असल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु, चौकशीअंती समाधानकारक माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

 

अनेकांनी जबाब बदलले : भादली हत्याकांड हे अत्यंत शांत डोक्याने व नियोजनबद्ध रित्या केल्याचे समोर आले आहे. अरुंद गल्लीत पार्टीशनच्या एका खोलीत राहणाऱ्या चौघांचा खून झाला आहे. घरात कुजबूज केली तरी शेजारच्यांना आवाज जाईल असे हे घर आहे. गावातील शेकडो लोकांची पोलिसांनी चौकशी केली. गावकऱ्यांकडून तपासात सहकार्य न मिळाल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे. अनेकांच्या तोंडी व लेखी जबाबात तफावत आली. काहींनी पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी जबाब बदलले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. टी. धारबळे यांच्याकडे तपास आहे. दरम्यान, अारुषी तलवार हत्याकांडा प्रमाणे भादली हत्याकांडाचे मारेकरी सापडलेला नाहीत.

 

वैज्ञानिक पुराव्यांमुळे तपासाला दिशा
हा गुन्हा घडून एक वर्ष उलटले आहे. अनैतिक संबध किंवा शेतजमीन खरेदी-विक्रीच्या वादातून हे हत्याकांड झाले असल्याच्या निष्कर्ष निघालेले आहेत. वैज्ञानिक पुराव्यांमुळे तपासाला योग्य दिशा मिळालेली आहे. कलिना येथील वैज्ञानिक प्रयोगशाळेतून ७ जणांची पॉलिग्राफ चाचणी केली आहे. तर आता नव्याने सहा जणांची अहमदाबाद येथे बीएफपी व एलव्हीए चाचणी करण्यात येणार आहे. याच वैज्ञानिक पुराव्यांमुधन मिळणाऱ्या माहितीच्या आधारे लवकरच पोलिस मारेकऱ्यांपर्यंत पोहचतील.
- दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...