आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री १२.३५ नव्हे, ९.३५ वाजता सुटणार भुसावळ-सुरत पॅसेंजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - महाराष्ट्र आणि गुजरात या दाेन राज्यांना रेल्वे मार्गाद्वारे जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून भुसावळ-सुरत पॅसेंजरची ओळख आहे. मात्र, अप ५९०७८ भुसावळ-सुरत पॅसेंजरची वेळ भुसावळ येथून १२.३५ एेवजी रात्री ९.३५ म्हणजे तीन तास अगाेदर करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला अाहे. १० जूनपासून या निर्णयाची अमंलबजावणी हाेईल. वेळेतील बदलाच्या निर्णयामुळे चाकरमान्यांची प्रचंड गैरसाेय हाेणार असल्याने प्रवासी संघटना विराेधाची धार तीव्र करण्याच्या तयारीत अाहेत. 

 

भुसावळ रेल्वे विभागातून अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या साेयीसाठी भुसावळ-सुरत व सुरत-भुसावळ या पॅसेंजर गाड्या धावतात. गुजरात व महाराष्ट्र या दाेन राज्यांना जाेडणारी ही गाडी हजारो प्रवाशांना दिलासा देणारी अाहे. तसेच सध्याच्या गाड्यांची वेळ प्रवाशांच्या साेयीची अाहे. सुरतचा कापड बाजार हा खूप लाेकप्रिय अाहे. भुसावळ विभाग, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दाेंडाईचा येथील हजाराे व्यापारी सुरत येथे खरेदीसाठी ये-जा करण्यासाठी पॅसेंजरला प्राधान्य देतात. दिवसभर कामधंदा अाटाेपल्यानंतर व्यापारी भुसावळ येथून रात्री १२.३५ वाजता सुटणाऱ्या ५९०७८ भुसावळ-सुरत पॅसेंजरने सुरतकडे निघतात. कारण ही गाडी सुरत येथे सकाळी १० वाजता पाेहोचते, ताेपर्यत बाजारपेठा सुरू हाेतात. त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण दूर हाेते. 


या गाडीने गेल्यानंतर एका दिवसात माल खरेदीचे काम हाेऊन व्यापाऱ्यांना तत्काळ दुपारी किंवा रात्री सुटणाऱ्या पॅसेंजरने परतीचा प्रवास करणे साेयीचे हाेते. त्यामुळे सध्याची वेळ ही प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने साेयीची अाहे. मात्र, १० जूनपासून ही गाडी भुसावळातून तीन तास अगोदर (रात्री १२.३५ एेवजी ९.३५ला) निघणार असल्याने या सर्व घटकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जुनीच वेळ कायम ठेवावी, अशी मागणी अाहे. प्रवासी संघटनांचे शिष्टमंडळ डीअारएम यांची भेट घेणार अाहे. 


लाेकप्रतिनिधींची भूमिका 
नरडाणा, धरणगाव, पाळधी, अमळनेर येथून हजाराे प्रवासी दरराेज जळगाव येथे राेजगार व व्यवसायासाठी ये-जा करतात. रात्रपाळी संपल्यानंतर ते रात्री १.०५ वाजेच्या भुसावळ-सुरत पॅसेंजरने घरी परततात. मात्र, १० जूननंतर जळगाव येथून गाडीची वेळ रात्री ९.५० वाजेची झाली तर गैरसाेय हाेईल. शिवाय ही पॅसेंजर गेली तर प्रवाशांना रात्री २.३० वाजता सूरत मार्गावर गाडी अाहे. मात्र, यासाठी त्यांना साडेचार तास प्रतीक्षा करावी लागेल. ही गैरसाेय हाेऊ नये म्हणून लाेकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, असा सूर उमटत अाहे. तूर्त तरी एकाही लोकप्रतिनिधीने हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. 

 

जुनी वेळ कायम ठेवा 
सुरत येथे जाण्यासाठी रात्रीची भुसावळ-सुरत पॅसेंजर सर्वांच्या सोयीची गाडी आहे. तिची वेळ तीन तास आधी केल्यास सर्वांची गैरसोईचे हाेईल. रेल्वे प्रशासनाने प्रवासी, चाकरमानी आणि व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार न करताच हा निर्णय घेतलेला दिसतोय. त्यामुळे गाडीची वेळ पूर्ववत ठेवण्यासाठी विचार करावा. बाळू वाढे, कपडा व्यापारी, फैजपूर 


प्रशासनाकडे दाद मागणार 

रात्रीच्या भुसावळ-सुरत पॅसेंजरची बदललेली वेळ व्यापाऱ्यांच्या गैरसोयीची आहे. दिवसभर काम केल्यानंतर या पॅसेंजरने कमी खर्चात सुरतला जाणे शक्य होते. नवीन वेळेनुसार ही गाडी लवकर सुरतला पोहोचेल. त्यामुळे तेथून पुढे जाणाऱ्या अन्य गाड्यांची कनेक्टीव्ही मिळणार नाही. जुनी वेळ कायम ठेवण्यासाठी दाद मागू. राजेश भराडिया, उपाध्यक्ष, खान्देश रेल प्रवासी मंच 


पश्चिम रेल्वेने घेतलेला निर्णय 

भुसावळ येथून रात्री १२.३० वाजता निघणाऱ्या भुसावळ-सुरत पॅसेंजरची वेळ पश्चित रेल्वे विभागाने बदलली आहे. त्यांच्या सुचनेनुसार आपण हा बदल कळवला आहे. वेळ बदलल्याने ही गाडी सुरत येथे लवकर पोहोचेल. -नरपतसिंग, वरिष्ठ परिचलन व्यवस्थापक, भुसावळ 

बातम्या आणखी आहेत...