आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - शहरात आता सोनसाखळी लांबविणाऱ्या टाेळीमध्ये तरुणीचा देखील समावेश आहे. सोमवारी दुपारी १.३० वाजता भिकमचंद जैननगरात घरासमोर दुचाकी लावत असलेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोनसाखळी दुचाकीस्वार तरुण-तरुणीने ओढून लंपास केली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग केला; परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले असले तरी त्यांच्या दुचाकीचा क्रमांक मिळाला आहे. त्यानुसार पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
ओरिऑन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या सोनल गणेश सोमाणी (वय ३७, रा. भिकमचंद जैननगर) या शाळेतून आल्या होत्या. त्यांनी मुलाला घरी सोडल्यावर शेजारील ओम सोमाणी या मुलाला सोडण्यासाठी त्यांना जायचे होते. त्यामुळे त्या घरासमोर दुचाकी लावत होत्या. या वेळी त्यांच्या घराशेजारील एस. के. अपार्टमेंटसमोर २० ते २२ वर्षे वयोगटातील तरुण व तरुणी उभे होते. त्यांच्याजवळ दुचाकी होती. तरुणीने हिरव्या रंगाचा पटीयाला ड्रेस घातलेल्या होता. ती चेहऱ्याला स्कार्फ बांधत होती. शारीरिक ठेवण ही शेजारील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेसारखी होती. त्यामुळे सोमाणी यांना तिच महिला असावी, असे वाटले. थोड्याच वेळात तो युवक व युवतीने दुचाकीवर येऊन सोमाणी यांची सोनसाखळी लांबवले. या घटनेबाबत त्यांनी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसही दुचाकीस्वारांच्या मागावर गेले होते. नागरिकांनी पाठलाग करून दुचाकीच्या मिळवलेल्या क्रमांकाच्या आधारे शहर पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर,धर असे बोलला
दुचाकी घेऊन येत असताना तरुण धर, धर असे तरुणीला बोलला. त्यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणीने सोमाणी यांच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्याची साेनसाखळी ओढली. त्यानंतर त्यांनी लगेच दुचाकीवर पळ काढला. सोमाणी यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिक जमा झाले. त्वरित सोमाणीसह नागरिकांनी त्या दुचाकीस्वार तरुण व तरुणीचा पाठलाग केला; पण दुचाकीस्वार चोरटे प्रारंभी रेल्वे गेट, ख्वाजामियॉ चौक, कोर्ट चौक व नंतर स्वातंत्र्य चौकातून पसार झाले. नागरिकांनी चोरट्यांच्या दुचाकीचा एम.एच.१९ बी.के.८७७० हा क्रमांक लिहून घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.