आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस व्यापाऱ्याची हत्या; सुपारी देणाऱ्या व्यापाऱ्यासह तीन दोषी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळू पाटील - Divya Marathi
बाळू पाटील

जळगाव- २५ लाख रुपयांच्या व्यवहारातून आपल्याच सहकारी व्यापाऱ्याची सुपारी देऊन हत्या करणारा कापूस व्यापारी आणि इतर दोन जणांना न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले. तीन वर्षांपूर्वी एरंडोल तालुक्यातील या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडवली होती. या तिघांनाही ५ मे रोजी शिक्षा ठोठावली जाणार आहे. तीन वर्षांपूर्वी ३० जानेवारी २०१५ रोजी ही हत्या झाली होती. या खटल्यात पेट्रोल पंपावरील मुलाची साक्ष निर्णायक ठरली. त्याने मृत व्यापारी आणि एका हल्लेखोरास अखेरचे पाहिले होते. 


बाळू रामू पाटील (वय ४३, रा.जंहागिरपुरा, एरंडोल) असे हत्या झालेल्या कापूस व्यापाऱ्याचे नाव आहे. पाटील यांच्या खूनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने सुपारी देणारा व्यापारी सचिन आनंदा मराठे ( वय ३४,रा.विद्यानगर,एरंडोल) त्याचे साथीदार नागराज उर्फ पप्पू सुधाकर महाजन (वय २८, रा.जहांगिरपुरा, एरंडोल) आणि पंकज सुरेश धनगर (वय २८, रा.चौधरीवाडा, एरंडोल) या तिघांना दोषी धरले आहे. 


मृत बाळू पाटील व सचिन मराठे दोघे जण कापूस व्यापारी.मृत बाळू पाटील यांच्याकडून मराठे याने २५ लाख रुपये घेतले होते. मराठे यास पैसे देणे जीवावर आल्यामुळे त्याने थेट पाटील यांची हत्या करण्याचे ठरवले. त्यासाठी मराठेने नागराज व पंकज यांना ४ लाख रूपयांची सुपारी दिली. त्यातील २० हजार रूपये सुरूवातीला दिले होते. उर्वरीत रक्कम काम झाल्यानंतर देण्यात येणार होती. ३० जानेवारी २०१५ रोजी दुपारी पाटील घराबाहेर पडले. याच रात्री नागराज व पंकज या दोघांनी एरंडोल तालुक्यातील विखरण शिवारात पाटचारीच्या शेजारी नेऊन दांड्याने मारहाण केली, दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून फेकून दिला होता.


पेट्राेलपंपावरील मुलाची साक्ष ठरली निर्णायक 
३० रोजी रात्री विखरण शिवारातील पेट्रोल पंपावर नागराज व मृत पाटील हे दोघे दुचाकीने आले होते. त्यांनी दुचाकीत ५० रुपयांचे व बाटलीत ५० रुपयांचे पेट्रेाल घेतले होते. यानंतर पाटील यांचा मोबाइल बंद झाला होता. पेट्रोल पंपावर काम करणारा संदीप भिला पाटील याने नागराज व मृत पाटील यांना शेवटचे पाहिले होते. त्याने ही महत्त्वपूर्ण साक्ष न्यायालयात दिली. त्याची साक्ष खटल्याच्या कामात महत्त्वपूर्ण ठरली अाहे. तसेच ३० रोजी पाटील यांचा मोबाइल बंद होण्याच्या आधी त्यांना नागराज व पंकज यांचे फोन आले होते. या संदर्भात संबधित तीन वेगवेगळ्या मोबाइल कंपनीच्या नोडल ऑफीसर्सच्याही साक्ष न्यायालयात झाल्या. या महत्त्वाच्या साक्षी न्यायालयाने ग्राह्य धरल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...