आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिलादिन विशेष: अडगळीच्या साहित्यासाठी 'हिरकणी' कक्षांचा उपयोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या आणि कामानिमित्त येणाऱ्या महिलांना आपल्या तान्हुल्याला स्तनपान करता यावे म्हणून शासनाने 'हिरकणी' कक्षांची स्थापना केली आहे. मात्र, या हिरकणी कक्षांची स्थिती अत्यंत ढासळली असून ते अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी त्यांचा वापर होत आहे. त्यामुळे हे कक्ष नुसते नावालाच उरले आहेत. स्तनपान हा नवजात बालकाचा पोषणाचा मूलाधार आहे.

 

हे हेरून ज्या-ज्या ठिकाणी महिला कामानिमित्ताने मोठ्या प्रमाणात एकत्रित येतात अशा ठिकाणी शासनाने स्तनपानासाठी "हिरकणी' कक्षांची स्थापना केली आहे. यात शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व बसस्थानक यांचा समावेश आहे. मात्र, आज या तिन्ही ठिकाणच्या हिरकणी कक्षांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे.

 

बसस्थानकातील कक्ष धूळखात
बसस्थानकात जिल्ह्यातीलच नव्हे तर विविध प्रांतांतील प्रवाशी महिलांचा वावर असतो. एसटीने प्रवास करणाऱ्या मातांना आपल्या तान्हुल्यांना स्तनपान करता यावे, यासाठी एसटी महामंडळाने आपल्या प्रत्येक बसस्थानकात सन २०१३मध्ये हिरकणी कक्षाची स्थापना केली. मात्र, बसस्थानकातील हिरकणी कक्षेची अवस्था पाहून एखाद्या मातेला वाटलं तरी ती येथे आपल्या तान्हुल्याला दूध पाजू शकत नाही, येवढी येथील कक्षाची वाईट अवस्था झाली आहे. या कक्षेला प्रत्यक्ष भेट दिली असता येथे लाइट व फॅनची देखील व्यवस्था नाही. या कक्षामध्ये बसस्थानकाला झाडू मारण्यासाठी असलेले खराटे, पाट्या, कर्मचाऱ्यांचे कपडे व डबे पडलेले अाहेत. मातांना येथे आपल्या तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी व्यवस्थित बाक देखील नव्हता. दोन धुळीने माखलेल्या खुर्च्या त्यावर कोणातरी परुषांचे कपडे व दोन जेवणाचे डबे दिसून आले. या कक्षाचे छतदेखील बंदिस्त नव्हते, अशी दयनीय अवस्था या हिरकणी कक्षाची झाली आहे. त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे.  


जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात निवडणुकीचे साहित्य
तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी १ सप्टेंबर २०१६ रोजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गाजावाजा करून 'हिरकणी' कक्षाची स्थापना केली होती. मात्र, दीड वर्षातच हा कक्ष बंद पडून येथे निवडणुकीसंदर्भातील साहित्य ठेवण्याचा स्ट्राँग रूम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी व कामानिमित्त येथे येणाऱ्या मातांना आपल्या नवजात बाळांसाठी आडोसा शोधावा लागतो.

 

महिला दिनी एसटी आगारातील कक्षाचे सुशोभिकरण करणार
महिला दिनानिमित्त एसटी आगारातील हिरकणी कक्ष सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या हिरकणी कक्षाची साफसफाई करण्यात येऊन माता व तान्हुल्या बालकाला उत्साही वातावरण तयार करण्याचा आमचा मानस आहे. आगारात जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातील कानाकोपऱ्यातून माता महिला येथे येत असतात. त्यामुळे महिला दिनाचे औचित्य साधून या कक्षेचा कायापालट व आरोग्य शिबिर घेण्याचे आमचे नियोजन असल्याचे एसटी आगारातील सूत्रांनी सांगितले.

 

जिल्हा परिषदेतील कक्षही नावालाच
जिल्हा परिषदेत पार्किंगलगत एका रूममध्ये तत्कालीन सीईओ अस्तिककुमार पांडे व डेप्युटी सीईओ नंदकुमार वाणी यांनी सन २०१६मध्ये "हिरकणी' कक्षाची स्थापना केली होती. मात्र, आज हा हिरकणी कक्ष वापराविना कायम बंदच असतो. या कक्षाची पाहणी केली असता येथील खुर्च्या व सोपा ठेवला होता. या कक्षेचा उपयोग नसल्याने अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी वापर केला जात आहे. या कक्षेत लहान बाळांसाठी असलेला पाळणा व खेळण्याचे साहित्य देखील आहे. मात्र, हे सर्व अडगळीच्या ठिकाणी ठेवले आहे. या पाळण्याचा व खेळण्यांचा कधी उपयोग झाला असेल असे वाटत नाही.

 

बातम्या आणखी आहेत...