आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाईला 80 हजार रुपये देऊन अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा डाव उधळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मालेगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईला ८० हजार रुपये देऊन बेकायदेशीरपणे लग्न लावण्याचा गंभीर प्रकार रिक्षाचालकाच्या सतर्कतेने रविवारी रात्री जळगावात उघडकीस आला. संशयितांनी केवळ एका स्टॅम्प पेपरवर संमतिपत्र लिहून लग्न लावण्याचा घाट रचला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. तर जळगावातील एका मॅरेज ब्युरोच्या महिला व मुलीच्या आईसही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पैसे घेऊन मुलीचे लग्न लावून देणारे हे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात अाहे. 


मालेगाव शहरातील १५ वर्षीय मुलीच्या मोठ्या बहिणीचे लग्न भुसावळातील तरुणाशी झाले आहे. त्यामुळे भुसावळातच वाहनचालक धर्मेश नटवरलाल चुडासामा (वय ३२, रा.राजकोट) हा एक चांगला मुलगा असून त्याच्यासोबत लहान मुलीचे लग्न लावून द्या, असा प्रस्ताव घेऊन मध्यस्थी आजम शाह जुम्मा शाह (वय ४५, रा.राजकोट), भानू हसन शहा (वय ५२, रा.राजकोट) मुलीच्या आईकडे आले होते. यासाठी त्यांनी जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातील एक मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेची मदत घेतली; परंतु धर्मेश हा राजकोटचा नसून भुसावळचा असल्याची खोटी माहिती त्यांनी मुलीच्या आईस दिली होती. त्यासाठी त्यांनी मुलीच्या आईस ८० हजार रुपये दिले होते. ठरल्यानुसार ५ मे रोजी नवरदेव मुलगा धर्मेश, मध्यस्थ आजम शाह, भानू शहा यांनी अल्पवयीन मुलीस मालेगाव येथून ताब्यात घेतले. त्यानंतर जळगावात एका स्टॅम्प विक्रेत्याकडून १०० रुपयांच्या स्टॅम्पवर लग्नाचे संमतिपत्र लिहून घेतले. हे संमतिपत्र मुलीस वाचण्यास न देताच तिच्या सह्या घेतल्या. केवळ या संमतीपत्राचा आधार घेत त्यांनी लग्न लावल्याचा बनाव केला होता. यानंतर ६ मे रोजी सर्वजण जळगावात थांबले होते. रविवारी रात्री ११ वाजता धर्मेश व शाह बंधू मुलीस एका रिक्षातून बसस्थानकाकडे घेऊन आले. तिला दोन दिवसांपासून भुसावळ येथे घेऊन जाण्याच्या नावाने ते जळगावातच फिरवत होते. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखून रिक्षाचालकाने तिला धीर दिला. तिची विचारपूस केली. पोलिसांना बोलावू का? असे विचारले. ती रिक्षाचालकाशी बोलत असताना तिघांनी तिला बोलण्यास मज्जाव केला. यामुळे काहीतरी गैरप्रकार असल्याचे रिक्षाचालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने जिल्हापेठ पोलिसांना संपर्क करून बोलवून घेतले. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच तिघांना ताब्यात घेतले. त्यांना पाेलिस ठाण्यात अाणून त्यांची पाेलिसांनी कसून चाैकशी केली. 


खिडकीतून फेकले कागद 
तिघांना पाेलिस ठाण्यात अाणल्यानंतर त्यांनी पाेलिसांची नजर चुकवत सोबत असलेले कागदपत्र पोलिस ठाण्यातील खिडकीतून बाहेर फेकून दिले होते. एका कर्मचाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने बाहेर जाऊन कागद आणले. यात १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विवाहित मुलीची संमती, तिचा शाळा सोडल्याचा दाखला असे कागदपत्र होते. मुलीचा जन्म २००३ साली झाला आहे. म्हणजेच ती १५ वर्षांची आहे. तर संमतीपत्रावर तिचे वय २२ असल्याचे लिहिले होते. ही बनवेगिरी लपवण्यासाठी कागदपत्र फेकल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आराक तपास करत आहेत. 


...तर 'त्या' अाईवरही दाखल हाेऊ शकताे गुन्हा 
तिघा संशयितांनी जळगावातील शिवाजीनगरात असलेल्या एका मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेची मदत घेतल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी रात्रीच या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर सोमवारी मुलीच्या आईसदेखील बोलावण्यात आले होते. या दोघांची चौकशी करून त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. 

बातम्या आणखी आहेत...