आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - शहरात सोमवारी रात्री ८ वाजता अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जाेरदार हजेरी लावली. पाऊस व साेसाट्याचा वारा सुरू होताच अर्ध्या शहराचा वीजपुरवठा खंडीत झाला. रात्री ११.३० वाजेनंतर काहीभागात वीजपुरवठा बंद हाेती. शिवाजीनगरात शॉर्टसर्किटमुळे डीपीने पेट घेतल्याने हा परिसर रात्री उशीरापर्यंत अंधारात हाेता. तसेच अनेक ठिकाणी वृक्ष काेसळले, हाेर्डिंगची माेडताेड हाेऊन ते जमिनीवर पडले. गटारीत तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसाेय झाली. वाल्मिनगरात वादळामुळे जिन्याची भिंत पत्र्याच्या घरावर काेसळल्याने पत्र्याखाली दबून चिमुरडीचा मृत्यू झाला. एेन उन्हाळ्यात अालेले अवकाळी संकट जळगावकरांना 'तापदायक' ठरले.
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात साेमवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण हाेते. त्यामुळे उन्हाची तीव्रता ही कमी जाणवत हाेती. सायंकाळी जामनेर, बाेदवड, चाेपडा भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर रात्री ७.३० वाजेपासून शहरात वादळाने तडाखा दिला. वादळामुळे भवानीपेठ, नवीपेठ भागातील माेठ्या वृक्षांच्या वाळलेल्या फांद्या रस्त्यावर पडल्या.
वाल्मीकनगरात भिंत काेसळल्याने
पत्र्याखाली दबून चिमुरडीचा मृत्यू
वाल्मीकनगरात बांधकाम मजूर बंटी बाेरसे हे राहता. साेमवारी रात्री ८ वाजता वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घरातील वीज बंद असल्याने बंटी बाेरसे, पल्लवी बाेरसे त्यांची मुलगी माेनिका (वय अडीच वर्षे) अाणि मुलगा साेहम (वय १ वर्षे) हे घरातच बसले हाेते. रात्री ८.१५ वाजता वादळामुळे वाल्मिकनगरात राजू बाेरसे यांच्या जिन्याची भिंत बंटी बाेरसे यांच्या पत्र्याच्या घरावर काेसळली. या वेळी घराच्या एका काेपऱ्याला बसलेल्या माेनिकाच्या अंगावर पत्रा पडल्याने ती त्याखाली दाबली गेल्याने गंभीर जखमी झाली. तिला नागरिकांनी तत्काळ पत्रा बाजूला सारून बाहेर काढून तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले; परंतु माेनिकाच्या डाेक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाला.
कमाल आणि किमान तापमानात घट
साेमवारी झालेल्या अवकाळी पाऊस मंगळवारी उत्तर महाराष्ट्र तर बुधवारी विदर्भात हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला अाहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी २१ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचे सावट कायम राहील. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण कायम अाहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हलका पाऊस पडल्याने कमाल आणि किमान तापमानात घट झाली अाहे. ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून जळगावकरांची काहीशी सुटका झाली.
पाऊस सुरू हाेताच फीडर ट्रीप
वादळी वाऱ्यासह पावसामुळे अर्ध्या शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. शास्त्री टॉवर, फॉरेस्ट कॉलनी, रिंगरोड , जुने जळगाव, खोटेनगर परिसरातील फीडर ट्रीप झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. काही ठिकाणी तांत्रिक दोषामुळे वीजपुरवठा खंडीत झाला हाेता. रात्री उशीरापर्यंत वीज दुरुस्तीची कामे सुरू हाेती. यासह तालुक्यातील आसोदा, ममुराबाद परिसरातही वीज गूल झाली होती.
येथे हाेती वीज बंद
शिवाजीनगर, गणेश काॅलनी, पिंप्राळा, शिव काॅलनी, खाेटेनगर, मेहरूण, हरिविठ्ठल, जुने जळगाव, नवीपेठ, भवानीपेठ, अयाेध्यानगर, एमअायडीसी, खेडी.
पाणीपुरवठा अनिश्चित
वादळामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, उमाळा जलशुद्धीकरण केंद्र तसेच गिरणा टाकी येथील वीज पुरवठा सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेपासून खंडित झाला होता. तो रात्री उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे मंगळवारी होणारा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता डी. एस. खडके यांनी दिली.
डीपीने घेतला पेट
पाऊस थांबल्यानंतर शिवाजीनगरात पाेलिस चाैकीजवळ असलेल्या डीपीने पेट घेतला. परिसरातील बंटी तिवारी, अमित राठाेड, पप्पू राठाेड, राजू मराठे, प्रणव राणा, संदीप पवार, दिव्येश चाैधरी या तरुणांनी डीपीची अाग विझवली. सुरत रेल्वेलाइनचे काम सुरू असल्याने अाणि शिवाजीनगर रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने महापालिकेचा अग्निशमन बंब शिवाजीनगरात पाेहाेचण्यास वेळ लागला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.