आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामखेड हत्याकांड: अडीच महिन्यांपूर्वीच रचला होता योगेशच्या हत्येचा कट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड- जामखेड दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड (२२ वर्षे, तेलंगशी, जामखेड) याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, सायबर विभाग व जामखेड पोलिसांनी बुधवारी रात्री ही संयुक्त कारवाई केली. गोविंदने अडीच महिन्यांपूर्वीच हत्येचा कट रचला होता. त्यासाठी मध्य प्रदेशात जाऊन त्याने दोन गावठी कट्टे खरेदी केले होते. 


जामखेड येथे २८ एप्रिलला सायंकाळी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. गोविंद गायकवाड, विजय सावंत व आणखी एक अल्पवयीन अशा तिघांनी मिळून योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची हत्या केली. घटना घडल्यानंतर तिघे पसार झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पंधरा पथके रवाना झाली होती. दरम्यान, आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी जामखेडचा माजी सरपंच कैलास विलास माने, त्याचा भाऊ प्रकाश विलास माने, दत्ता रंगनाथ गायकवाड (मुख्य आरोपी गोविंदचे वडील), सचिन गोरख जाधव, बापू रामचंद्र काळे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी हत्याकांडातील प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तिघा आरोपींनी अडीच महिन्यांपूर्वीच हत्येचा कट रचला होता. त्यासाठी गाेविंदने स्वत: मध्य प्रदेशात जाऊन दोन गावठी कट्टे खरेदी केले होते. मृत योगेशशी आरोपींचा जुना वाद होता. डिसेंबर २०१६ पासून त्यांच्यातील वैर वाढत होते. त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. त्यातूनच गोविंदने योगेशला संपवण्याचा निर्णय घेतला. तो अडीच महिन्यांपासून योगेशला जीवे मारण्याची संधी शोधत होता. अखेर २८ एप्रिलला त्याला ही संधी मिळाली. योगेश आपल्या मित्रांबरोबर हॉटेलसमोर गप्पा मारत बसला होता. दुचाकीवर आलेल्या या तिघा आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. योगेशवर गोविंदने गोळ्या झाडल्या, तर राजेशवर अल्पवयीन आरोपीने गोळ्या झाडल्या. तशी कबुली गोविंदने पोलिसांसमोर दिली. 


तीन वेळा केला मारण्याचा प्रयत्न 
गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांनी योगेशला ठार मारण्याचा कट रचला होता. अडीच महिन्यांपासून ते योगेशच्या मागावर होते, परंतु त्यांना योग्य संधी मिळत नव्हती. योगेशला त्याची भनकही लागली नाही. घटनेच्या दिवशी शनिवारी आरोपी योगेशच्या मागावर होते. सकाळपासून ते संधीची वाट पाहत होते. दोन वेळा त्यांनी योगेशला ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची संधी हुकली. अखेर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामखेड-बीड रस्त्यावरील चहाच्या हॉटेलसमोर बसलेल्या योगेशवर त्यांनी गोळ्या झाडल्या. 


फरार आरोपीचा शोध सुरू 
जामखेड हत्याकांडातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली. विजय सावंत हा आरोपी फरार असून तो लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल. तिघांनी मिळून हा गुन्हा केला असून एक आरोपी अल्पवयीन असून तो अवघा १७ वर्षांचा आहे. गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. मुख्य आरोपी गोविंद याला अटक करण्यात आल्याने त्याच्याकडून अधिक माहिती समोर येणार आहे. गुन्ह्यात वापरलेले गावठी कट्टे हस्तगत करायचे आहेत.
- रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक. 


वर्षभरापूर्वी झाली होती हाणामारी 
डिसेंबर २०१६ मध्ये आरोपी गोविंद गायकवाड याच्याकडून एका वृध्दाच्या अंगावर पाणी उडाले होते. या वृध्दाने गोविंदला खडे बोल सुनावले. त्यानंतर गोविंदने वृध्दास मारहाण व शिवीगाळ केली. या वृध्दाने झाला प्रकार योगेशला सांगितला. त्यानंतर योगेशने मित्रांसह गाेविंदला मारहाण केली. तोडगा निघाल्याने हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला नाही. मात्र, या घटनेनंतर योगेश व आरोपींत वारंवार खटके उडत होते. काही दिवसांपूर्वी योगेश व गोविंदचे भांडण झाले होते. त्यामुळेच गोविंदने योगेशला संपवण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...