आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णाच्या मृतदेहाची विटंबना, डॉ. जपसरे विरोधात गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट - मृत्यू झालेल्या रुग्णाला अकोला येथे रेफर करण्याच्या प्रकरणात अकोटमधील डॉ. कैलास जपसरे याच्या विरोधात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. कैलास जपसरेला अकोट शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याला अकोला येथे जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.

 

या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रभुदास गुलाबराव तेलगोटे, वय ६३ वर्षे, रा. रेल्वे क्वॉर्टर अकोट यांनी ५ मे रोजी फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा मृतक मनोज प्रभूदास तेलगोटे याला डॉ. कैलास जपसरेच्या रुग्णालयात २१ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल केले होते. त्यापूर्वी अकोला रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉ. दीपक लोटे यांनी उपचार केले होते. डॉ. जपसरेच्या दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू होते. २२एप्रिल २०१८ रोजी मृतक मनोजची प्रकृती गंभीर झाल्यावरसुद्धा डॉक्टरांनी कल्पना दिली नाही, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

 

२२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.२० वाजता माझ्या मुलाचा म्हणजे मनोजचा मृत्यू झाल्यावरसुद्धा डॉ. जपसरे याने त्याला ऑक्सिजन लावून अकोला येथे पाठवले. २२ एप्रिल रोजी अंदाजे ७.३० ते ८ च्या दरम्यान अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये मृतक मनोजला नेण्यात आल्यावर त्याचा इसीजी काढण्यात आला. त्यानंतर तो मृत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

 

मनोजचा मृत्यू झाल्यावरसुद्धा तशी कल्पना न देता डॉक्टरांनी त्याला अकोला येथे पाठवले. त्यामुळे त्याच्या मृतदेहाची विटंबना झाल्यामुळे डॉक्टरांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. अशा फिर्यादीवरून डॉ. कैलास जपसरेच्या विरोधात भादंविच्या २७९,३६८,४७१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्याला अटक करून न्यायालयात नेले असता त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे त्याची जेलमध्ये रवानगी केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उप निरीक्षक आशिष शिंदे यांनी केला.

 

गंभीर कृत्य
रुग्ण दगावल्यावरसुद्धा त्याला अकोला येथे पाठवणे हा गंभीर प्रकार आहे. सखोल तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गजानन शेळके, ठाणेदार, शहर पोलिस स्टेशन अकोट

 

बातम्या आणखी आहेत...